एक सळसळता गिर्यारोहक

604

>> प्रकाश कामत

काहीही घडलं तरी आत्मविश्वास गमवायचा नाही हा अरुणचा उपजत स्वभाव होता. चाळीस वर्षांहून अधिक काळ सह्याद्रीची दरीखोरी सळसळत्या उत्साहानं ढुंढाळणारं अरुण सावंत नावाचं वादळ त्याच्या अंतिम इच्छेप्रमाणेच सह्यगिरीच्या अंकावर कायमचं विसावलं. ज्या कोकणकडय़ावर रेस्क्यू ऑपरेशन राबवून अरुणनं तीस वर्षांपूर्वी इतिहास निर्माण केला होता त्याच कोकणकडय़ावर त्याचा अपघाती मृत्यू व्हावा हे केवळ दुर्दैवीच!

‘कोकण कडय़ाच्या परिसरात गिर्यारोहक अरुण सावंत बेपत्ता’ गिर्यारोहकांच्या एका ग्रुपवर आलेला मेसेज वाचून होतो ना होतो तोपर्यंत त्याच ग्रुपवर, अरुण सावंत यांचे प्रेत सापडल्याचा मेसेज आला आणि काळजात चर्रर झालं. अरुणची प्रस्तरारोहणातील क्षमता आणि डोंगरात सावधतेनं वावरण्याची, काम करण्याची पद्धत जवळून पाहिलेली असल्यामुळे पहिला मेसेज वाचून ‘अरुण सुरक्षित परत येईल’ असा वाटलेला विश्वास दुसऱया मेसेजमुळे
कायमचा संपला.

1974-75च्या आसपास अरुणची डोंगरभटकंती आणि गिर्यारोहण सुरू झालं. सुरुवातीला हॉलीडे हायकर्स, गिरिविहार या संस्थांच्या प्रस्तरारोहण आणि हिमालयीन मोहिमांमधून त्यांचा सहभाग असायचा. पुढे गुहा संशोधनाची सुरुवात करून अरुणनं ‘केव्ह एक्सप्लोरर्स’ची स्थापना केली. माझी आणि अरुणची भेट झाली ती 1985 साली डय़ूक्स नोजच्या रॅपलिंग शिबिराच्या वेळी. त्याच वर्षी एप्रिल महिन्यात केव्ह एक्सप्लोर्सनी अरुणच्या नेतृत्वाखाली खंडाळा घाटातून दिसणाऱया डय़ुक्स नोजची चढाई मोहीम यशस्वी केली होती. तोपर्यंत ‘डय़ुक्स’ अजिंक्य होता. डय़ूक्सच्या माथ्यावरून खाली बेस कँपला रॅपलिंग करत खाली येत असताना अरुणला ‘सर्व’ सामान्यांना रॅपलिंगचा आनंद देण्यासाठी, कॅम्प-शिबीर घेण्याची कल्पना सुचली, आणि आपल्या सहकारी-मित्रांना बरोबर घेऊन 1985 च्या नोव्हेंबर महिन्यात अरुणने डय़ुक्सवर पहिला रॅपलिंग कॅम्प भरविला. त्या शिबिरात शालेय विद्यार्थ्यांपासून वृद्ध महिला-पुरुषांपर्यंत आणि धडधाकट माणसांपासून अपंग तरुणांपर्यंत शेशंभर माणसांनी दोराच्या साहाय्यानं कातळ कडा उतरण्याचं धाडस केलं होतं. मीही एक शिबिरार्थी असल्यामुळे त्या शिबिराच्या वेळी मला अरुणमधील दक्ष नेतृत्व जवळून पाहाता आलं.

पाच दिवसांच्या रॅपलिंग कॅम्पमध्ये अरुणच्या देखरेखीखाली रॅपलिंगसाठी वापरल्या जाणाऱ्या उपकरण-साहित्याची रोजच्या रोज तपासणी केली जायची. गिर्यारोहणाच्या तंत्राची माहिती असलेल्या तयारीच्या गिर्यारोहकानं रॅपलिंग करीत मार्गाची पाहाणी केल्यानंतरच नव्यानं रॅपलिंग करणाऱया शिबिरार्थीला विलेचा रोप लावून डय़ुक्सच्या माथ्यावरून सोडलं जायचं. अशा पद्धतीनं त्यानंतर केव्ह एक्सप्लोरर्संनी कोणत्याही अपघाताविना अनेक शिबिरं पार पाडली. त्या यशात अरुणच्या दक्षतेच्या आग्रहाचा मोठा वाटा होता, हे निःसंशय. गिर्यारोहणाच्या संबंधी सामान्य लोकांच्या मनात असलेली प्रतिकूलता कमी व्हावी यासाठी सुरुवातीच्या काळात अरुणने ‘क्लब’च्या माध्यमातून मुंबईत अनेक ठिकाणी रॅपलिंग, व्हॅलीक्रॉसिंगसारखे कार्यक्रम केले. वर्तमानपत्रात गिर्यारोहण उपक्रमांची नुसती बातमी येऊन चालणार नाही तर सविस्तर लेखातून हा खेळ ती माहिती वाचकांपर्यंत पोहोचावी असं अरुणला सतत वाटायचं. ‘साप्ताहिक विवेक’मध्ये गिर्यारोहणावरील ‘धाडस’ हे माझं सदर सुरू होण्यास अरुणच कारणीभूत झाला होता. त्यातील लेखांसाठी अरुण सतत मला गिर्यारोहण क्षेत्रातील घडामोडींची माहिती द्यायचा. त्याचबरोबर स्वतः पुढाकार घेऊन अरुणनं अनेक संस्था-क्लब्सशी मला जोडून दिलं होतं.
1986चं कोकणकडा रेस्क्यू ऑपरेशन हे महाराष्ट्राच्या गिर्यारोहण इतिहासातील महत्त्वाची घटना मानायला हवी. तोपर्यंत पश्चिमेच्या वाऱ्यांना थोपवीत उभ्या असलेल्या हरिश्चंद्रगडावरील कोकणकडय़ाच्या उंचीचा थांग लागला नव्हता. ऐन पावसाळय़ात ऑगस्ट महिन्यात अथांग दरीत अरविंद बर्वेनं उडी घेतली. पंधरा दिवस मुंबई-पुण्याच्या गिर्यारोहकांनी शोध घेण्याचा कसून प्रयत्न केला, पण धो धो कोसळणाऱया पावसानं त्यांच्या कार्यात अडसर निर्माण केला. पंधरा दिवसांनी ते माघारी फिरल्यानंतर अरुणनं कोकणकडय़ावर जाण्याचा निर्णय घेतला. ‘केव्ह’च्या सदस्यांबरोबर अन्य संस्था क्लब्सच्या गिर्यारोहकांना बोलावून घेतलं. कोकणकडय़ाच्या उंचीचा अंदाज बांधून टोडी कंपनीकडून दोन हजार फुटांचा रोप खरेदी केला. दक्षताचे तत्कालिन संपादक अरविंद पटवर्धन यांनी दिलेल्या पोलिसांच्या मोठय़ा गाडीतून टीम हरिश्चंद्रगडावर पोहोचली. दुसऱया दिवशी शोधमोहीम सुरू झाली. दोराच्या सहाय्याने अरुण माथ्यावरून कडय़ाच्या तळाकडे निघाला. एक तास वीस मिनिटांनंतर त्याचे पाय कडय़ाला लागले. त्यानंतर अभिजित पाटील आणि संजय रांगणेकर अरविंदच्या शवावशेषांपर्यंत पोहोचले. सगळे उपचार पूर्ण केल्यानंतर तळाच्या गिर्यारोहकांच्या मदतीनं, दुसऱया दिवशी अरविंद बर्वेचं शव सावर्णेला आणण्यात आलं.

अजिंक्य डय़ूक्स नोजचं प्रस्तरारोहण आणि कोकणकडय़ावरचं रेस्क्यू ऑपरेशन हे अरुणच्या कारकीर्दीतील मैलाचे दगड ठरले. सुरुवातीच्या काळात अरुण हिमालयातील फ्रेंडशीप, लडाख, मनाली, भागीरथी अशा शिखर मोहिमांमध्ये सहभागी होता. मात्र डय़ूक्सनंतर त्यानं सह्याद्रीच्या परिसरातील गुहा शोधन प्रस्तारारोहणावरच आपलं लक्ष केंद्रित केलं. त्यानं ‘केव्ह’तर्फे सप्तशृंगीच्या ध्वज डोंगराची काळोख्या रात्रीत केलेली चढाई, दौलताबादच्या किल्ल्यातील मौत का कुवाचा शोध, देहूजवळ असलेल्या भालचंद्राच्या डोंगरावरील गुहा शोधन या आणि अशा अनेक मोहिमा राबविल्या आणि यशस्वीही केल्या. काहीही घडलं तरी आत्मविश्वास गमवायचा नाही हा अरुणचा उपजत स्वभाव होता. डय़ूक्सच्या शेवटच्या टप्प्यात चढाई करत असताना अरुणची कातळ दगडावरची पकड सुटली आणि तो शंभर फूट खाली घसरला. दुसऱया स्थानावर असलेल्या सतीश आंबेकरचं प्रसंगावधान आणि डोक्यावर असलेलं हेल्मेट यामुळे त्यावेळी अघटीत घडलं नाही. पण त्या प्रसंगानं अरुण डगमगला नाही. दुसऱया दिवशी पुन्हा चढाई करून अरुणनं डय़ूक्सचा माथा गाठलाच.

सहय़ागिरीच्या रांगेतील दऱयाखोऱयांत मुक्त संचार करून कडय़ा-सुळक्यांचा, कातळभिंतीचा शोध घेत धाडसी उपक्रम आयोजित करणाऱया अरुणच्या वेगाला त्याचं वयही कधी आवर घालू शकलं नाही. नव्या दमाच्या नव्या पिढीला सोबत घेऊन त्यानं आपले धाडसी प्रयोग-उपक्रम सुरूच ठेवले आणि शनिवारी 18 जानेवारीला अघटित घडलं. चाळीस वर्षांहून अधिक काळ सह्याद्रीची दरीखोरी सळसळत्या उत्साहानं ढुंढाळणारं अरुण सावंत नावाचं वादळ त्याच्या अंतिम इच्छेप्रमाणेच सह्यगिरीच्या अंकावर कायमचं विसावलं. ज्या कोकणकडय़ावर रेस्क्यू ऑपरेशन राबवून अरुणनं तीस वर्षांपूर्वी इतिहास निर्माण केला होता त्याच कोकणकडय़ावर त्याचा अपघाती मृत्यू व्हावा हे केवळ दुर्दैवी आणि दुर्दैवीच!

अरुणचा मृत्यू ‘अपघात’ म्हणून सोडून देण्यासारखा निश्चितच नाही. एकटय़ा अरुण सावंतचाच नाही तर मागील पाच पंचवीस वर्षात अनिलकुमार, अरुण सामंत, संजय बोरोले आणि कितीतरी गिर्यारोहकांचे मृत्यू ‘अपघाती’ म्हणूनच नोंदविले गेले, सांगितले गेले आहेत. महत्त्वाचं म्हणजे कोणताही अतिरेक न करता तंत्रशुद्ध क्लायबिंग करणारे गिर्यारोहक अशीच त्या सर्वांची गिर्यारोहणाच्या क्षेत्रात ख्याती होती. म्हणूनच वाटतं ‘अपघात हा शेवटी अपघातच असतो’ असं म्हणत त्यांच्या जाण्याकडे पाहिलं जाऊ नये. ‘अपघात’ म्हटला तरी त्यामागे काही ना काही कारण हे असतंच. तसंच ‘मृत्यू’च्या कोशात ‘विनाकारण’ हा शब्द कधीच नसतो. म्हणूनच गिर्यारोहकांच्या या अपघाती मृत्यू घटनांची कारणं शोधून त्यावर चर्चा व्हायला हवी, आघाडीच्या गिर्यारोहक संस्थांनी पुढाकार घेऊन त्या घटनांवर परिसंवाद घडवून आणायला हवेत. अशा चर्चा परिसंवादाच्या कार्यक्रमांतून बाहेर आलेले सत्य आणि त्यावर झालेलं विचारमंथन यामुळे सतत मोहिमा, शिबिरं, कॅम्प आयोजित करणाऱया गिर्यारोहक संस्थांना संभाव्य अडचणी अडथळय़ाची माहिती मिळेल आणि भविष्यातील उपक्रमाची आखणी निर्धोक करण्याची दिशाही मिळेल.

अरुण सावंतच्या जाण्यानं गिर्यारोहणातील चैतन्यमय व्यक्तिमत्त्व कायमचं हरवलं हे मात्र सत्य आहे, कटू सत्य आहे.

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या