आबदार

>> आसावरी जोशी, [email protected]

ज्येष्ठ कलावती लीला गांधी. नुकताच त्यांना महाराष्ट्र चित्रपट महामंडळाचा चित्रभूषण पुरस्कार जाहीर झाला त्यानिमित्ताने त्यांच्याशी गप्पा…

त्यांच्या पदन्यासावर कथ्थकच्या शास्त्राrयतेचे संस्कार आहेत. त्यामुळे त्यांची लावणी नेहमीच आबदार आणि डौलदार राहिली. लीला गांधी… ठसठशीत आणि सणसणीत बांधा. तशाच भेदक पण तितक्याच लोभस नृत्यमुद्रा. लावणीच्या दिलखेचक अदा. मोहक हावभाव आणि या साऱया आविर्भावातूनही सहज जाणवणारा, डोकावणारा शालीन… प्रेमळ चेहरा. आज वय ऐंशीच्या पुढे असतानाही चेहऱयावरील गोडवा, प्रेमळ हसू आणि लोभसपणा तसाच आहे. नुकताच लीलाताईंना महाराष्ट्र चित्रपट महामंडळाचा ‘चित्रभूषण’ पुरस्कार जाहीर झाला आणि हे निमित्त फुलोराने टिपले. अशा छान व्यक्तिमत्त्वाला आपल्याकडे आणण्याचे.

कथ्थक आणि लावणीचा सहज मेळ साधला त्यांनी आपल्या नृत्यशैलीतून. माझी आई माझी पहिली गुरू. कलेचे संस्कार मला तिच्याकडून मिळाले. मी काहीतरी वेगळे करावे यासाठी तिने मला कथ्थक शिकायला पाठवले. प्रसन्न हसत लीलाताई सांगत होत्या. भगवानदादांच्या कार्यक्रमाला छोटी लीला गेली आणि एका भावगीताला सहज लावणीचा साज चढविला. मला जसे सुचले तसे मी करत गेले. दादांनी लगेच त्यांच्या ‘रंगिला’ चित्रपटात मला छोटीशी भूमिकाही दिली. तेथे राजाभाऊ ठाकूर यांनी माझे नृत्य पाहिले आणि मला पुण्याला बोलावून घेतले. तेथे ‘रेशमाच्या गाठी’ या चित्रपटासाठी लीलाने स्वतःच नृत्य बसविले आणि ते सादरही केले. मी जाणीवपूर्वक लावणी केली नाही, ती आपसूक माझ्यातून व्यक्त होत गेली. 12 वर्षे कथ्थक शिकूनही त्यांच्यावर कथ्थकचा फारसा प्रभाव नव्हता पण त्यातील लयबद्धतेने पायावर भरीव संस्कार झाले होते. त्यातून छोटय़ा लीलाची स्वतःची नृत्यशैली फुलली आणि मग त्या स्वयंस्फूर्ततेतून त्यांची स्वतःची लावणी खुलत गेली.

अनंतराव माने माझे या क्षेत्रातील गुरू. त्यांनी लीलाताईंच्या नृत्यकलेवर पूर्ण विश्वास दाखवत आपल्या चित्रपटांतील नृत्यदिग्दर्शनाची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्याचा निर्णय घेतला आणि लीलाताईंनीही हा विश्वास सार्थ ठरवत ‘सांगत्ये ऐका’च्या बुगडीला लावण्याची झळाळी चढविली. त्यानंतर लीला गांधी हे नाव आदबशीर लावण्यांसाठी फार आदराने उच्चारले जाऊ लागले. लावणीविषयी बोलताना लीलाताई सांगतात की, ही नृत्यकला आपल्या मातीची शान आहे. फडावरची लावणी ही उत्स्फूर्तपणे सादर होते तर चित्रपटात आम्ही प्रत्येक अंगावर मेहनत घेतो. पण कोणत्याही लावणीचा आत्मा हा एकच असतो. हेच तत्त्व मी माझ्यात नेहमीच जागते ठेवले.

लीलाताईंनी कधीच अमुक एका भूमिकेसाठी हट्ट धरला नाही. आपल्या नृत्याशी प्रामाणिक राहत जी भूमिका वाटय़ाला आली तिला पूर्ण न्याय देऊन त्या प्रत्येक व्यक्तिरेखेत आपल्या नृत्याने रंग भरले. शिवाय जोडीला त्यांचा लीला गांधी नृत्यदर्शन हा कार्यक्रमही होताच. पुढे गुडघेदुखीमुळे लीलाताई या चमचमत्या दुनियेपासून लांब राहिल्या. याविषयी बोलताना त्या अगदी समाधानी आणि तृप्त होत्या. अतिशय विचारपूर्वक मी हा निर्णय घेतला. आमचा बसवाहतुकीचा व्यवसाय होता. माझे यजमान त्यात होते. मानाची मीठभाकर घरात येत होती. मग मी थांबण्याचा निर्णय घेतला. आज माझ्या तिन्ही मुली आपापल्या संसारात, उद्योग व्यवसायात सुखी आहेत. मला माझ्या मुलींना या क्षेत्रात आणायचेच नव्हते. जाणीवपूर्वक मी त्यांना लांब ठेवले. माझी एक मुलगी डेण्टिस्ट आहे. प्रत्येकीने आपले आवडते क्षेत्र निवडले आहे.

तरीही आजतागायत लीलाताईंची प्राणप्रिय लावणी त्यांच्या मनात सतत जागती आहे. लावणी ही आपली लोककला आहे. महाराष्ट्राच्या मातीतील. आज तिचे स्वरूप खूप बदललेले आहे. पूर्वी आम्हा नर्तिकांना समाजात मान नव्हता. नाचनारीण असा उल्लेख केला जायचा.

शिवाय पैसेही खूप तुटपुंजे मिळायचे. पण आज परिस्थिती बदलली आहे. लोककलावंतांना आज समाजात मान मिळतो. ही लावणीच तिच्या प्राचीनतेमुळे त्यांना प्रतिष्ठा मिळवून देते आहे. मग या लावणीचा मानही राखला जायला हवा. तिचे शुद्ध स्वरूप कायम राहायला हवे. चित्रपटात लावणी येणे ही गोष्ट ठीक आहे पण लावणीत चित्रपट येऊ देऊ नये असे प्रांजळपणे लीलाताई सांगतात.

आज लावणी चित्रपटात केवळ एका डान्स आयटमपुरतीच मर्यादित राहिली आहे, यावर लीलाताई पूर्ण सहमत झाल्या. लावणीची अभिजातता दाखवणारा चित्रपट यायला हवा आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे पोषाख. लावणीसाठी नेसली जाणारी साडी ही फार रुबाबदार आणि संपूर्ण अंग झाकणारी असते. पण आजच्या लावणीच्या पोषाखाचा तो रुबाब हरविला आहे असे सांगून लीलाताई खंतावतात. आजच्या तरुण कलावंतांसाठी देवाच्या दयेने सहज व्यासपीठ उपलब्ध होते. आम्ही अगदी मातीच्या ढेकळावरही नृत्य सादर केले आहे. त्यामुळे आज लावणीला मिळणारी प्रतिष्ठा प्रत्येक नव्या कलावंताने जपली पाहिजे. गुडघेदुखीमुळे आपण शिष्य घडवू शकलो नाही याची खंतही लीलाताईंना आहे. पण तरीही आज त्या त्यांच्या जगात सुखी समाधानी आहेत.

त्यांना प्रत्यक्ष भेटता आले नाही. फोनवरूनच सगळ्या गप्पा झाल्या. पण त्यांच्या आवाजाच्या चढउतारावरून त्यांच्या मनातील सच्चे भाव आणि सगळ्या प्रश्नांना मनःपूर्वक दिलेली उत्तरे सहज जाणवत होती. कोणतीही तक्रार नाही. नव्याचे कौतुक. पुरस्कार- सन्मानांनी अजूनच उठावदार झालेली विनयशीलता. या साऱया पार्श्वभूमीवर ठसठशीतपणे उठून दिसत होते ते लावणीवरचे प्रेम आणि तिच्याविषयी असलेले सुस्पष्ट विचार. भलेही आज त्या प्रत्यक्ष पदन्यास करीत नसल्या तरी लावणीचे लावण्य त्यांनी अगदी जीवापाड जपले आहे, सांभाळले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या