नांदी होऊ द्या! रंगभूमीची आर्त हाक

>> अभिजित झुंजारराव

गेले दीड वर्षाहून अधिक काळ मराठी नाटय़सृष्टी अभूतपूर्व संकटाला सामोरी जात आहे.  व्यावसायिक, प्रायोगिक, समांतर अशा सर्व प्रकारच्या रंगभूमीला याची झळ बसली आहे. शासनाच्या सर्व अटी, शर्थींचे पालन करीत नाटय़प्रयोग सादर केले जातील; मात्र आता नाटय़क्षेत्राकरील निर्बंध उठवा आणि रंगभूमी सुरू करा, अशी मागणी या क्षेत्रातील प्रत्येक घटकाकडून जोर धरत आहे. 

कोविड महामारी सुरू होऊन आता दीड वर्षाचा काळ लोटला आहे. लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर आपली जी संभ्रमित अवस्था होती तीच आताही आहे. हे संकट ओढवल्यानंतर त्यातून मार्ग काढण्याचे अनेकविध प्रयत्न झाले. पण त्यातून बाहेर पडणं अजूनही आपल्याला शक्य झालेलं नाही आणि इतक्यात ते होईल असं वाटत नाही.

हे क्लेशदायक आहे. सध्याच्या घडीला भविष्याबाबत कुठलीच रूपरेषा आपल्याला आखता येत नाही. अभूतपूर्व अशी ही परिस्थिती आहे आणि या परिस्थितीला कसं समोर जायचं
हा यक्षप्रश्न आपल्यासमोर आहे.

कोरोनाचा सगळ्यात मोठा फटका नाटय़क्षेत्राला बसला आहे. रंगभूमी, नाटय़कला किंवा एकूणच परफॉमिंग आर्ट यांना याची प्रचंड झळ बसली. कारण सर्वात आधी बंद होणारं व सरतेशेवटी सुरू होणारं क्षेत्र हे परफॉमिंग आर्ट किंवा नाटय़क्षेत्र असेल. याआधी या क्षेत्राबाबत असं कधीच घडलं नव्हतं. संपूर्ण लोकडाऊनच्या काळात या रंगकर्मींनी शांत राहून शासनाच्या नियमांचे पालन केले, परंतु आता हा संयम ढासळावा अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. कारण येत्या काळातही लॉकडाऊनशिवाय पर्याय नाही हे स्पष्ट दिसत आहे. इतका मोठा काळ रंगभूमीपासून दूर राहणं आता केवळ अशक्य असल्याचं लक्षात येत आहे. मग या परिस्थितीवर उपाय शोधत सुवर्णमध्य काढणं आणि सर्व काही पूर्ववत व्हावं यासाठी प्रयत्न होणं गरजेचं आहे.

म्हणूनच आम्हाला ‘रंगभूमी सुरू करा’ ही मोहीम हाती घ्यावी लागत आहे. हे केवळ एका कुणासाठी नसून सगळ्या समष्टीचं आहे. यात बोलणारा कुणीतरी एक असेल पण आम्ही सगळे मिळून आवाज देऊ पाहत आहोत. हा आवाज शासनापर्यंत कधीतरी पोहोचवणं गरजेचं होतं आणि तेच आम्ही सगळे मिळून करत आहोत. शासनाच्या सर्व अटींचे पालन करतच रंगभूमी सुरू व्हावी, अशी आमची शासनाला विनंती आहे.

रंगभूमी मग ती व्यावसायिक, प्रायोगिक, समांतर, सांगीतिक वा बालरंगभूमी असो, त्यासाठी खूप मोठी यंत्रणा राबत असते. असंख्य माणसं झटत असतात. कष्ट घेत असतात. त्यांच्या मदतीनेच ही रंगभूमी उभी आहे. मराठी रंगभूमीने अशी अनेक संकटं याआधीही झेलली आहेत. त्यामुळे या संकटाने ती संपणार आहे असं नाही. पं. सत्यदेव दुबे म्हणतात, ‘नाटक मर नाही सकता.’ खरंच आहे ते. नाटक जिवंत राहणारच आहे. जोपर्यंत माणसामाणसामध्ये संवाद आहे तोपर्यंत नाटय़कलेला मरण नाही.

प्रायोगिक, हौशी व समांतर रंगभूमीच्या क्षेत्रात सातत्याने कार्यरत असल्याने तिथल्या काही गोष्टीबाबत मत मांडू शकतो. रंगभूमीवर तरुण वर्ग खूप कष्ट घेऊन या क्षेत्रात पाय रोवू पाहत असतो. याचबरोबर त्यांचं एक भावनिक नातं या रंगभूमीशी, सादरीकरणाशी जोडलेलं असतं. या क्षेत्रात काम करताना संवेदनशील असण्याची स्वाभाविकता त्यांच्यात रुजलेली असते. त्यामुळेच या संपूर्ण काळात रंगभूमीपासून दूर गेल्याचं, मानसिक कुतरओढ झाल्याचं चित्र या तरुण वर्गात काही अंशाने दिसत आहे. त्यांची मानसिक अस्वस्थता त्यांच्या नाटय़ अभिव्यक्तीसाठी नक्कीच पोषक नाही. याबरोबरच जगण्यासाठी, चरितार्थ चालवण्यासाठी दुसऱ्या पर्यायांचा अवलंब करणंही जड जात आहे. या तरुण वर्गाला, रंगकर्मींना उभारी देणं ही सध्याची गरज आहे आणि त्यासाठी योग्य पावले उचलणे गरजेचे आहे. अन्यथा हा तरुण वर्ग कायमचा या क्षेत्रापासून दुरावू शकतो. रंगभूमी सुरू होण्याबाबत शासनाने आखून दिलेल्या चौकटीत काम करण्याची आमची तयारी आहे. प्रायोगिक रंगभूमीबाबत 50 लोकांच्या उपस्थितीत सादरीकरणाची परवानगी मिळावी, अशी आमची मागणी आहे. केवळ रंगकर्मींचं मन:स्वास्थ्य टिकून राहावं यासाठी हा प्रयत्न नसून रसिक प्रेक्षकांसाठीही हा मानसिक दिलासा ठरेल. सध्या प्रेक्षकांपुढे अनेक डिजिटल पर्याय आहेत परंतु नाटक ही प्रत्यक्ष सादर होणारी, पाहता येणारी, जिवंत कला आहे. तो रसरशीत जिवंतपणा इतर कुठल्या माध्यमात खचितच अनुभवता येतो.

प्रेक्षकांना कायमच आपलंसं वाटणारं हे माध्यम आहे. कोविडच्या काळात जिथं माणसं एकमेकांपासून तुटत आहेत तिथे नाटक माणसामाणसांमधलं भावनिक आदानप्रदान कायम राखू शकतं यावर आम्हा रंगकर्मींचा ठाम विश्वास आहे. सध्याच्या काळात मनस्वास्थ्य टिकवणारं हेच खरंखुरं माध्यम आहे. म्हणूनच रंगभूमी सुरू होणं गरजेचं आहे. सांस्कृतिकदृष्टय़ा संपन्न असणं ही कोणत्याही समाजाची खरी ओळख असते. ही ओळख कायम राखणं ही आपलीच जबाबदारी आहे.

कलेबाबत रेनेसान्स काळाचा नेहमीच उल्लेख केला जातो. महायुद्धाची बसलेली झळ फुंकर मारून कमी करण्याचा प्रयत्न करणारा हा काळ असंच म्हणावं लागेल. या काळात माणसाला जगायला, अभिजातता टिकवायला मदत केली ती या काळात बहरलेल्या कलाविश्वाने. कोरोनानंतरचा काळही असाच म्हणावा लागेल. आपण सगळेच याची झळ अनुभवत आहोत आणि यातून बाहेर पडण्यासाठी नाटय़विश्व कायम रसिकांसोबत राहील.

समाजावर ज्या ज्या वेळी संकट येतं तेव्हा रंगभूमी, रंगकर्मी समाजासाठी कायम उभा राहतो. दुर्दैवाने आज रंगभूमीवर संकट आलं आहे आणि त्यासाठी प्रेक्षकांनी रंगभूमीसाठी उभं राहण्याची गरज निर्माण झाली आहे. शासनाने प्रायोगिक तत्त्वावर काही नाटय़गृहं सुरू केल्यास याबाबतचा निश्चित अंदाज येईल आणि त्यानुसार नियमांची अंमलबजावणीही करता येईल. म्हणूनच शासनाने यासाठी किमान एक पाऊल पुढे टाकणं गरजेचं आहे.

ज्यावेळी एखादं नाटक उभं राहत असतं तेव्हा कलाकाराची खऱ्या अर्थाने जडणघडण होत असते. नाटक म्हणजे समाजाचेच एक जिवंत चित्र. कलाकार या माध्यमातून घडत राहतो. घडणं हीच रंगकर्मींची खरी भूक असते. मग तो दिग्दर्शक, कलाकार, लेखक, तंत्रज्ञ असो वा रंगमंचाच्या मागे काम करणारा कलाकार असो. नाटक घडणं ही या सगळ्यांसाठीच कार्यशाळा असते. लॉकडाऊनच्या या काळात या सगळ्या गोष्टींना जसे रंगकर्मी मुकले आहेत तसेच प्रेक्षक म्हणून आपणही दुरावलो आहोत. आपली सांस्कृतिक भूक भागवली जात नाही त्यामुळे एक खिळखिळेपण आलेलं आहे आणि यासाठी नाटक हाच मुख्य उपाय ठरू शकतो. कला आपल्याला समृद्ध करते. समृद्धीची ही देवाणघेवाण नाटकाच्या माध्यमातून होणं निश्चितच उपयोगी ठरेल.

समाजाचं प्रतिबिंब आपण नाटकात पाहत असतो. समाजाला दिशादर्शक असं बरंच काही रंगभूमीवर घडत असतं. समृद्ध आणि सकस जगणं हवं हे अभिव्यक्तीतून साकार होतं आणि त्यासाठी नाटकासारखं सर्वांपर्यंत पोहोचणारं दुसरं माध्यम नाही. यासाठी एक उदाहरण सांगतो. ब्रिटनमध्ये निर्बंध हलवताना सर्वप्रथम थिएटर आणि ऑपेरा हाऊस सुरू केले गेले. नागरिकांच्या सांस्कृतिक भुकेची काळजी तिथल्या शासनाने घेतली. यात कोरोनासंदर्भातील नियमांना कोणतीच सूट देण्यात आली नव्हती. हे आपणही स्वीकारायला हरकत नाही.

सध्या आपण बाहेर जी गर्दी पाहतो त्या तुलनेत नाटय़गृहांमध्ये येणारी गर्दी निश्चितच नियंत्रित असेल. शिवाय स्वच्छतेबाबतचे इतर नियम लागू आहेतच. रंगभूमीच्या सुरू होण्याने अनेकांचे संसार चालणार आहेत. घरं उभी राहणार आहेत. कलाकारांनासुद्धा चरितार्थ चालवावा लागतो. त्यादृष्टीने प्रयत्न व्हायला हवेत.

150 वर्षांची समृद्ध परंपरा असलेली मराठी रंगभूमी ही हिंदुस्थानातच नव्हे, तर जगात नावलौकिक मिळवून आहे. म्हणूनच पुरोगामी महाराष्ट्रात सर्वप्रथम रंगभूमी सुरू झाल्यास हा सकारात्मक निर्णय घेतला गेल्यास देशातील सांस्कृतिक क्षेत्रासाठी ते आदर्शवत मॉडेल ठरेल.

आपण तिसऱ्या लाटेच्या उंबरठय़ावर आहोत हे जरी मान्य केलं तरी कधीतरी हे सर्व सुरू करावंच लागणार आहे. ते आताच शिस्तबद्ध रीतीने सुरू केल्यास येत्या काळात कितीही कठीण परिस्थिती आली तरी त्यातून आपण तरून जाऊ हा विश्वास रंगकर्मी, प्रेक्षक आणि एकूणच सर्व समाजात निर्माण होण्यास हातभार लागेल. कोविडपश्चात काळात एकमेकांच्या हातात हात धरून नाटकवाली मंडळी गौरवशाली मराठी रंगभूमीची परंपरा अभिमानाने पुढे नेतील याबाबत मी आशावादी आहे. पण त्यासाठी शासनाच्या मदतीची नितांत गरज आहे. साहित्य, कला या सांस्कृतिक गोष्टींबाबत महाराष्ट्र अग्रेसर राहिला आहे. त्यामुळेच यादृष्टीने एक पाऊल पुढे टाकत रंगभूमी सुरू करा हा आग्रह रंगभूमीच्या प्रत्येक घटकाच्या वतीने मी करतो. पुरोगामी महाराष्ट्राने कलेच्या या माध्यमाची ही आर्त हाक ऐकावी ही अपेक्षा आहे.

[email protected]

(लेखक मराठी रंगभूमीकरील प्रयोगशील नाटय़ दिग्दर्शक व अभिनेता आहेत.)

(शब्दांकन: शुभांगी बागडे)

आपली प्रतिक्रिया द्या