
>> अश्विन बापट
पुण्याचा युवा उद्योजक हर्षवर्धन पटवर्धनने उभारला लोकप्रिय ब्रॅण्ड.
कोल्हापुरी चप्पल म्हटलं की, विशिष्ट रंग, डिझाईन आणि त्याचा ‘कर्र कर्र’ असा येणारा आवाज. पुण्याच्या हर्षवर्धन पटवर्धन या युवा उद्योजकाने याच कोल्हापुरीच्या कक्षा रुंदावण्यासाठी वाट चालण्याचं ठरवलं आणि पावलं टाकली. आज त्याचा ‘चॅपर्स’ हा ब्रँड लोकप्रिय होतोय.
कोल्हापुरी चपलेला आधुनिक टच देण्यासाठी हर्षवर्धन पटवर्धनने यावर बरेच संशोधन केले. आग्रा, कोलकाता, चेन्नई, कानपूर अशा विविध ठिकाणी त्याने भेटी देत याबद्दलची तपशीलवार माहिती घेतली. स्वतःची क्रिएटिव्हिटी त्यात समाविष्ट केली. याच्या रंगांमध्ये आणि बांधणीच्या स्टाईलमध्येही वैविध्य आणलं. त्याच वेळी त्या चपलेचा टिकाऊपणाच्या निकषावर चाचणी घेतली. मग कधी चपलेसह मैदानात धावणं असेल नाहीतर टेकडी सर करणं असेल, यामुळे चपलांचा दर्जा, त्याची क्षमता या सगळ्याची चाचपणी झाली. हर्षवर्धनने 2015 मध्ये चॅपर्स ब्रँड सुरू केला. 2017 ला कर्वे रोडवर पहिलं आऊटलेट सुरू केलं. आज नऊ वर्षांनी त्याची एकटय़ा पुण्यात चार आऊटलेट्स आहेत.
दिवसाला त्याच्या पुण्यातील वर्कशॉपमध्ये सुमारे दीडशे जोडय़ा चप्पल-बूट यांचं उत्पादन होतं. चॅपर्सच्या लाल, पिवळ्या, हिरव्या, अगदी काळ्या रंगाच्या चपलांनादेखील चांगली मागणी आहे. हर्षवर्धनकडे आज 25 पूर्णवेळ आणि 10 ते 12 वेळ पार्टटाईम स्टाफ आहे.
पुण्याशिवाय नाशिकमध्येही एक दुकान त्याने सुरू केलंय. याशिवाय नगर, सोलापूर, मुंबई, ठाणे, वाशी यांसारख्या ठिकाणी सुमारे 30 रीटेलर्सकडे त्याची उत्पादनं विक्रीसाठी जातात. राज्याबाहेरचा विचार केल्यास दिल्ली, गुजरात, हैदराबादमधून ऑनलाइन ऑर्डर्सचं प्रमाण खूप आहे. दुबईतही त्याच्या उत्पादनांची विक्री होते, तर सुमारे 30 देशांमध्ये इंडिव्हिज्युअल ऑर्डरमुळे त्याची प्रॉडक्ट्स पोहोचलीत. जगातल्या प्रत्येक देशात आपलं एक तरी आऊटलेट असावं, हे स्वप्न घेऊन आपण वाटचाल करणार असल्याचं हर्षवर्धनने आवर्जून सांगितलं.
या उत्पादनांकरिता लागणारा कच्चा माल मुख्यत्वे चेन्नई-बंगळुरू रोडवर विक्रीसाठी उपलब्ध असतो, तिथून आणला जातो. चपलांमध्ये सध्या तो थर्मोप्लॅस्टिक पॉलियुरिथिनच्या सोलचा वापर करतो. कोणतंही उत्पादन नव्याने लाँच होणार असेल तर मी ते स्वतः महिनाभर वापरून पाहतो, जेणेकरून त्याच्या दर्जाची, गुणवत्तेची चाचणी मी करू शकेन, असं हर्षवर्धनने आवर्जून सांगितलं.
सध्या ग्राहकांसाठी त्याने व्हर्च्युअल कस्टमायझेशन प्लॅटफॉर्म सुरू केलाय. ही सुविधा पुण्यातील एकाच आऊटलेटमध्ये आहे. जिथे जाऊन तुम्ही टचस्क्रीनवर तुमच्या निवडीनुसार डिझाईन, रंग सिलेक्ट करू शकता. त्यात ऑनलाइन बदल करू शकता आणि लगेच ऑर्डरही करू शकता.
सेलिब्रेटींनाही भुरळ
सचिन, सेहवाग, धोनी, युवराजसारख्या क्रिकेटर्सना त्याच्या चपला पसंतीला उतरल्यात. अनेक सेलेब्रेटी चॅपर्सच्या चपला, बूट वापरतात. याशिवाय वॉलेट्स, बेल्ट्सची सिलेक्टिव्ह उत्पादनेही त्यांची खासीयत आहे. आजपर्यंत 20 कोटी रुपयांच्या चपलांची विक्री झालीय. तसंच यंदा चार कोटींच्या टर्नओव्हरचं लक्ष्य पार होईल, असा हर्षवर्धनला विश्वास आहे.
(लेखक एबीपी माझाचे सीनिअर प्रोडय़ूसर-सीनिअर न्यूज अँकर आहेत.)


























































