मुद्दा – गडकिल्ल्यांचे सुलभीकरण

>> दि. मा. प्रभुदेसाई

गडकिल्ल्यांच्या संवर्धनावर आता मुख्यमंत्री सचिवालयाचा वॉच असणार आहे. महाराष्ट्रातील हे गड-किल्ले, लेणी, कातळशिल्पे आज शेकडो वर्षे निसर्गाचे तडाखे खात अजूनपर्यंत आपले अस्तित्व टिकवून आहेत. काही बाबतीत मानवही त्यांचा विध्वंस करीत असतो. खूप वर्षांपूर्वी वाचले होते की, सिंधुदुर्गासारख्या जलदुर्गाचे बुरूज, काही तटबंदींचे चिरे ढासळलेले आढळले. कोणीही सहज म्हणेल एवढी वर्षे लाटांचे तडाखे खाल्ले मग पडले तर काय आश्चर्य? पण त्यामागचे कारण लाटा नसून तेथील कोळी बांधव होते. त्यांच्या जाळय़ांना लावायला शिशाच्या गोळय़ा लागतात. म्हणून गडाच्या पायाच्या चिऱयांत ओतलेले शिसे त्यांनी खोदून काढले होते.

अशा या परिस्थितीत हे गडकिल्ले कितीही दुरुस्त केले तरी किती दिवस तग धरतील, असाही प्रश्न मनात उभा राहतो. पण त्यांचे जतन आणि संवर्धन केलेच पाहिजे. कारण ते अक्षरशः महाराष्ट्राच्या आणि लाक्षणिक अर्थाने हिंदुस्थानच्या स्वातंत्र्याचे केवळ साक्षीच नसून कर्तेही आहेत.

मी रायगडला आजपर्यंत 4-5 वेळा गेलो असेन. 1960-62 च्या सुमारास गेलो असेन. त्यावेळी आजच्यासारखी परिस्थिती नव्हती. फारशी माहिती नसायची. चुकलो तर भ्रमणध्वनी नसायचे. पं. महादेवशास्त्राr जोशी यांनी लिहिलेल्या ‘महाराष्ट्राची धारातीर्थे’ या पुस्तकाचे दोन भाग उपलब्ध होते. 12-15 वर्षांत त्या माहितीवर आम्ही बरेच गडकिल्ले फिरलो. तर रायगडावर गेलो तेव्हा वर चिटपाखरू नव्हते. सर्वत्र अगदी महाराजांच्या सिंहासनावर जगदीश्वराच्या देवळावर, कुत्र्याच्या समाधीवर सर्वत्र आमच्या उंचीची झुडपे आणि गवत उगवले होते. नांगप्पा शेट्टी ज्याने रायगडावरची घोडय़ावर बसून दुकानातील सामान खरेदी करण्यासाठी उंच बाजारपेठ बांधली असे म्हटले जाते. त्याच्या नावाचा तेथे असलेला मोठा दगड सोडाच, पण ती बाजारपेठही गवतात बुजली होती. (त्यावेळी खुद्द रायगडावर एक लुंगीवाला (दाक्षिणात्य).

नंतर एक-दोनदा गेलो तेव्हा फारसा फरक जाणवला नव्हता, पण रायगडावर जायला रोपवे बांधावा म्हणून हालचाल चालू झाली होती. तेथील मतनोंदणी वहीत ‘रोपवे बांधून रायगडाचा पिकनिक स्पॉट बनवू नका’ असे माझे मत मी त्यावेळी नोंदवले होते.

काही वर्षांपूर्वी गेलो तेव्हा रोपवे चालू झाला होता. वर एक पत्र्याची धर्मशाळा बांधली होती. पाण्याचे नळ, स्वच्छतागृहे बांधली होती आणि एक हॉटेलही झाले होते. हल्ली काही किल्ल्यांवर आम्हाला दारूच्या बाटल्या मिळाल्या होत्या.

‘शिवनेरी’सारख्या सोप्या गडावरसुद्धा ‘रोपवे’ची योजना आली. त्यावेळी मी लेख लिहून ‘गडकिल्ल्यांचे सुलभीकरण नको’ हे मत मांडले होते. गडकिल्ल्यांच्या अवघडपणातच त्यांचे ‘अभेद्यपण’ होते. नाही तर आज काय हेलिकॉप्टरमधून कोणीही किल्ल्यावर उतरू शकतात. कोणीही चालक नसलेले ‘ड्रोन’ किल्ला उद्ध्वस्त करू शकते. ‘राजगडा’वरील बालेकिल्ला पावनखिंड अशा ठिकाणी असलेले थोडेसे मावळे शेकडो, हजारो शत्रूसैन्याला कसे नामोहरम करतात ते आज ते ठिकाण तसेच असेल तर कळणार ना? रात्रीच्या अंधारात कठीण कडा उतरून गेली म्हणून राजांनी सत्कार करून रायगडाला बुरूज बांधून हिरकणीचे नाव अजरामर केले. पण त्यापूर्वी तो कडा तासून असा गुळगळीत केला की त्यावर कीडामुंगीही फिरणार नाही. खूप देशी-परेशी पर्यटक यावेत, आपला इतिहास सर्वांना कळावा ही अपेक्षा योग्यच आहे, पण त्यासाठी गडकिल्ल्यांचे सुलभीकरण नको. ज्यांना रोपवे हवा ते आज नवीन तंत्रज्ञानामुळे घरबसल्याही सर्व गडकिल्ले पाहून त्यांचे ज्ञान मिळवू शकतात.

 

आपली प्रतिक्रिया द्या