
>> दयानंद पाटील
मुंबईच्या पश्चिम रेल्वे, मध्य रेल्वे आणि हार्बर रेल्वे अशा तिन्ही उपनगरीय रेल्वे विभागात लोकल गाडय़ांना प्रचंड गर्दी आपणास पाहण्यास मिळते. प्रवासी अगदी दरवाज्याच्या पायरीवर लोंबकळत उभे राहून प्रवास करत असतात. यात पुरुष प्रवासी तर असतातच आणि महिला प्रवासीसुद्धा असतात. अशा परिस्थितीत आपण पाहत आहोत की, प्रवासी तोल जाऊन चालत्या लोकलमधून खाली पडून जखमी होत आहेत, तर काही प्रवासी मृत्युमुखी पडतात. अशाप्रकारे अनेक अपघात या उपनगरीय विभागात घडत आहेत याचे गांभीर्य प्रशासनाने ओळखून मुंबईकरांना सर्व वातानुकूलित लोकल देण्याचा आणि तेही भाडेवाढ न करता देण्याचा एक मास्टर प्लॅन सरकारकडे असल्याचे फडणवीस म्हणाले होते. त्यापाठोपाठ मुंबईसाठी 238 नव्या एसी लोकल गाडय़ा मंजूर करण्यात आल्याची घोषणा रेल्वेमंत्र्यांनी केली होती. आता सरसकट सर्वच लोकल वातानुकूलित होणार असल्याची आनंदवार्ता मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली. तसेच सर्व लोकल वातानुकूलित करताना कोणतीही भाडेवाढ केली जाणार नाही, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी गेल्याच जून महिन्यात जाहीर केले होते.
आता राहिला प्रश्न या सर्व 238 लोकल किती वर्षात येतील आणि त्यानंतर सर्व लोकल वातानुकूलित होतील तेव्हा तिकिटाचे दर आता सामान्य लोकलच्या द्वितीय श्रेणीच्या तिकीट दराइतके आकारले जातील, असे प्रथमदर्शनी दिसून येते. जरी टप्प्याटप्प्याने आल्या तरी कमीत कमी पाच वर्षे लागू शकतात आणि तोपर्यंत बऱ्याच लोकल वातानुकूलित झालेल्या असतील आणि त्याचे भाडे आता जे वातानुकूलित लोकलचे आहे ते प्रवाशांकडून स्वीकारून झालेले असणार. डहाणू, वैतरणा प्रवासी सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून रेल्वे प्रशासनास विनंती आहे की, सर्व लोकल वातानुकूलित झाल्यानंतर त्याचे भाडे सामान्य साधारण लोकलच्या द्वितीय दर्जाच्या भाडय़ाप्रमाणे आकारले जाणार असे बोलले जाते. त्यापेक्षा आत्तापासूनच वातानुकूलित लोकलचे भाडे सामान्य साधारण लोकलच्या द्वितीय भाडय़ाप्रमाणे आकारावे, जेणेकरून प्रवाशांच्या तक्रारींचा सामना करावा लागणार नाही की, सामान्य लोकलच्या जागी वातानुकूलित लोकल का सुरू करता? वातानुकूलित लोकल असल्याने प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आणि सोयीसाठी उपयुक्त असणार. त्यामुळे भाडे संपूर्ण सध्याच्या सामान्य लोकलच्या भाडय़ाइतके जरी कमी नाही केले तरी खालीलप्रमाणे अंदाजे दर ठेवल्यास प्रवासी नक्कीच नाही म्हणणार नाहीत.
– चर्चगेट-मरीन लाइन्स सामान्य लोकलचे सध्याचे एकेरी भाडे 5 रुपये आहे ते वातानुकूलित लोकलचे 10 रुपये करा, जे वातानुकूलित लोकलचे आता 35 रुपये घेतले जाते.
– चर्चगेट-मरीन लाइन्स सामान्य लोकलचे सध्याचे एक महिन्याचे पासचे भाडे 100 रुपये आहे ते वातानुकूलित लोकलचे 300 रुपये करा, जे वातानुकूलित लोकलचे आता 620 रुपये घेतले जातात.
– विरार ते चर्चगेट सामान्य लोकलचे सध्याचे एकेरी भाडे 20 रुपये आहे ते वातानुकूलित लोकलचे 50 रुपये करा, जे वातानुकूलित लोकलचे आता 115 रुपये घेतले जाते.
– विरार ते चर्चगेट सामान्य लोकलचे सध्याचे एक महिन्याचे पासचे भाडे 315 रुपये आहे ते वातानुकूलित लोकलचे 950 रुपये करा, जे वातानुकूलित लोकलचे आता 2205 रुपये घेतले जातात.
येत्या 26 जानेवारीपासून विरार-चर्चगेट दरम्यान 12 वातानुकूलित लोकलच्या फेऱ्या सुरू झाल्या आहेत, प्रवाशांच्या अपेक्षा आहेत, डहाणू लोकलच्या किमान काही साधारण फेऱ्या आणि 15 डब्यांची डहाणू लोकल तरी सुरू करण्यात याव्यात. डहाणूसाठी वातानुकूलित लोकलची आवश्यकता नाही.






























































