
>> डॉ. मुकुंद कुळे
परंपरा मोठी जिवट आणि चिवट असते. विठ्ठलभक्तीची परंपरा अशीच आहे. ती उभ्या महाराष्ट्राला बांधून ठेवणारी लोकधारा आहे. अर्थात या लोकधारेला पंढरपुरात विटेवर उभ्या असलेल्या विठुरायाच्या अवघ्या अडीच फुटांच्या मूर्तीचं भावबळ आहे आणि त्यामुळेच विठुरायाच्या मूर्तीच्या मूळ रूपाचा शोध घ्यायला कुणी धजावत नाही. अर्थात तसे प्रयत्न आजवर झालेच नाहीत असे नाही. किंबहुना पंढरपुरात उभ्या ठाकलेल्या विठोबा मूर्तीच्या अल्याड-पल्याड नेमकं काय दडलंय त्याचा संशोधकांचा शोध शतकानुशतकं सुरूच आहे. त्याचं कूळ आणि मूळ संशोधकांना आव्हान देत आहे. आजच्या आषाढी एकादशीच्या निमित्ताने या अधिष्ठानाच्या मूर्तीस्वरूपाचा, शोधाचा घेतलेला वेध.
आज आषाढी. तिकडे पंढरपुरात विठ्ठलाच्या भक्तीला, प्रेमाला नुसतं उधाण आलं असेल. जातीधर्माच्या पार पलीकडे गेलेला हा देव. अर्थात त्याला जातीधर्मात अडकविण्याचे प्रयत्न झालेच नाहीत असं नाही, पण माणूसपण सोडून त्याने काही म्हणून लावून घेतलं नाही अंगाला. जसा ज्याचा भाव तसा त्याला तो दिसला. तुम्ही कुणी का असाना किंवा स्वतला कुणी का मानाना, मी प्रत्येकाचा आहे हा विठोबाचा भाव कधीही ढळला नाही. एवढा मोकळाढाकळा असल्यामुळेच हा विठोबा गेली शेकडो वर्षे महाराष्ट्राचे उपास्य दैवत म्हणून ठामपणे उभा आहे. इतर कितीही देवदेवता असोत, महाराष्ट्राच्या भावभक्तीच्या लाटा उसळतात आणि शांत होतात त्या याच्याच चरणी…
मराठी मनावर विठ्ठल रूपाचं हे कसलं गारूड आहे त्याचा पुरता उलगडा अद्याप झालेला नाही, कदाचित होणारही नाही. कारण विठ्ठलाशी असलेलं जनमानसाचं हे नातं भावनिक आहे. परंपरा मोठी जिवट आणि चिवट असते. विठ्ठलभक्तीची परंपरा अशीच आहे. ती उभ्या महाराष्ट्राला बांधून ठेवणारी लोकधारा आहे. अर्थात या लोकधारेला पंढरपुरात विटेवर उभ्या असलेल्या विठुरायाच्या अवघ्या अडीच फुटांच्या मूर्तीचं भावबळ आहे आणि त्यामुळेच विठुरायाच्या मूर्तीच्या मूळ रूपाचा शोध घ्यायला कुणी धजावत नाही. अर्थात तसे प्रयत्न आजवर झालेच नाहीत असे नाही!
किंबहुना पंढरपुरात उभ्या ठाकलेल्या विठोबा मूर्तीच्या अल्याड-पल्याड नेमकं काय दडलंय त्याचा संशोधकांचा शोध शतकानुशतकं सुरूच आहे. त्याचं कूळ आणि मूळ संशोधकांना आव्हान देत आहे. कारण पंढरपुरातल्या विठोबा मूर्तीवर शिव किंवा वैष्णव या देवताकुळांचा कुठलाच ठसठशीत किंवा ठळक प्रभाव आढळून येत नाही. नाही म्हणायला विठोबाच्या कमरेवर ठेवलेल्या डाव्या हातात शंख आहे, तर उजव्या हातात कमलनाल. तसंच विठोबाच्या मस्तकावरील मुकुटात संतांपासून अनेकांना शिवलिंगाचंही दर्शन घडलेलं आहे. परंतु दिवंगत इतिहास संशोधक ग. ह. खरे यांच्यासारख्या कोरीव लेख व मूर्तिशास्त्राच्या जाणकाराला मात्र पंढरपुरातली ही मूर्ती अर्वाचीन वाटते. तसंच ती शैव आणि वैष्णव प्रभावापासून दूर असल्याचं त्यांचं मत आहे.
मात्र विठ्ठल शैव असो वा वैष्णव वा आणखी कुणी, विठ्ठलाच्या मूर्तीची उभी राहण्याची ढब मात्र एकमेव आहे. बहुतेक देवदेवतांच्या शिल्पांचीही उभी ठेवणच असते. परंतु विठोबा सोडून कुठल्याच देवतेचे हात कटीवर म्हणजे कमरेवर नाहीत आणि ही घडणच विठोबाचं वेगळेपण सूचित करते. “महाराष्ट्रात किंवा दक्षिण भारतात जिथे जिथे विठ्ठलाच्या मूर्ती आढळतात, त्या सर्वच कमरेवर हात ठेवलेल्या आहेत आणि उभ्या राहण्याच्या या विशिष्ट शैलीमुळेच विठोबाचं आद्यरूप प्रतीत होतं,’’ असं मत दिवंगत संशोधक माणिक धनपलवार यांनी व्यक्त केलं आहे. कारण इतर वैदिक किंवा पौराणिक देवतांप्रमाणे विठोबा सालंकृत किंवा बहुर्भुज नाही. त्यामुळे विठोबाचं आजचं दृश्यरूप हे त्याच्या मूळ रूपाचंच प्रतीक आहे आणि या मूळ रूपाचा शोध घ्यायला गेलं की, पंढरपूरच्या विठोबाचं एक वेगळंच रूप समोर उभं ठाकतं. त्याच्या सांस्कृतिक उन्नयनाची कथाच आपल्यासमोर उलगडत जाते. मग विठोबा केवळ वैष्णवधर्माचा महाराष्ट्रातला मूलाधार उरत नाही, तर तो खराखुरा बहुजन समाजाचा देव ठरतो. आज वारीत सर्वधर्मसमभावाचं जे चित्र पाहायला मिळतं किंवा सर्व जातीपातींचे संत विठ्ठलाला भजायला लागले त्याचं मूळ त्याच्या या आद्यरूपातच आहे.
काय आहे विठोबाचं आद्यरूप? विठोबाच्या या आद्यरूपाविषयी सांगताना माणिक धनपलवार ‘श्रीविठ्ठलदैवत ः एक चिंतन’ या आपल्या संशोधनपर पुस्तकात लिहितात, ‘लढाईत मरण पावलेल्या वीरांचे स्मारकस्तंभ पूर्वकाली उभारीत. महाराष्ट्र, कर्नाटक, तामीळनाडू या प्रांतात असे अनेक शिलास्तंभ आढळतात. गाईंच्या रक्षणार्थ मंगळवेढय़ाच्या ग्रामसीमेवर विठ्ठल नावाचा गोपालक धारातीर्थी पडला. या पुरुषाच्या स्मृत्यर्थ जो वीरगळ उभारण्यात आला तेच विठ्ठलाचे मूळ रूप. विठ्ठल, विष्णू किंवा कृष्णाचे रूप मानला गेला असला तरी विठ्ठल कटीवर हात ठेवून उभा आहे, याला मूळ वीरगळाचा आधार असावा. कटीवर हात ठेवून उभे राहण्याची धाटणी हे निर्भयतेचे द्योतक आहे. चालून येणाऱया शत्रूला सामोरे जाण्याचा किंवा प्रतिपक्षाला आव्हान देण्याचा हा पवित्रा असून वीराच्या संदर्भात तो समुचित ठरतो.’
मध्ययुगात महाराष्ट्रात नावारूपाला आलेलं विठोबा हे दैवत मूळ वीरगळ स्वरूपातील असावं याचा पहिला जाहीर उच्चार महानुभाव पंथाचे संस्थापक चक्रधर स्वामी यांनी केला आहे. यावरून भडखांब म्हणजे वीरगळ हे आजच्या विठोबा मूर्तीचे आद्यरूप असावे असे काही संशोधकांचे म्हणणे आहे. विशेषतः महानुभाव साहित्याचे संशोधक, अभ्यासक असलेल्या शं. गो. तुळपुळे यांनी चक्रधरांच्या एका लीळेच्या आधारे पंढरपुरातील विठ्ठल मंदिरातील चोखोबांच्या पायरीजवळ जो वीरगळ आहे, तेच विठोबाचं आद्यरूप असल्याचं मत मांडलं होतं.
मात्र आजचं विठोबा हे दैवत वीरगळातूनच उन्नत झालेलं असावं यावर सर्वच संशोधकांचं एकमत नाही. विशेषतः महाराष्ट्रात दैवतशास्त्राची मांडणी करणाऱया रा. चिं. ढेरे यांना वीरगळापासून विठोबा दैवताची निर्मिती ही उपपत्ती मान्य नाही. आपल्या ‘श्रीविठ्ठल ः एक महासमन्वय’ या ग्रंथात ते म्हणतात, ‘एखाद्या वीरगळाची प्रतिष्ठा श्रेष्ठ दैवतापर्यंत वाढणे संभवनीय आहे. उद्या तसे प्रबळ पुराव्यांनी सिद्ध झाले तरी महाराष्ट्राचे जीवन उजळणारी विठ्ठलाची शतकाशतकांची महती मुळीच उणावणार नाही, परंतु वीरगळ ते वरिष्ठ दैवत ही त्याची विकसन प्रक्रिया विश्वसनीय प्रमाणांनी दाखविण्याचे दायित्व स्वीकारणे आवश्यक आहे.’
वीरगळ हे विठोबाचं आद्यरूप असावं ही विकसन प्रक्रिया ढेरे यांनी नाकारली आहे. मात्र विठोबा हा गोपजनांचा देव आहे हे रा. चिं. ढेरे यांनी आपल्या पुस्तकात पुराव्यानिशी सिद्ध केलं आहे. ‘श्री विठ्ठल हा मूलतः गोपजनांचा देव आहे. दक्षिणेत संचार करणाऱया अथवा अर्धसंचारी व अर्धस्थिर अशा स्थितीत जगणाऱया गवळी, धनगर, गोल्ल, कुरुब यांसारख्या गाई-गुरे, शेळ्या-मेंढय़ा पाळणाऱया जमातींचा तो देव आहे,’ असं ढेरे म्हणतात. डॉ. ढेरे यांच्या मते, ‘विठ्ठल-बीरप्पा या धनगर, गवळ्यांसारख्या गोपजनांच्या जोडदेवांपैकी एक असलेला विठ्ठल हे पंढरपूरच्या विठ्ठलाचे आदिरूप होय.’ तसंच आंध्र, कर्नाटक, महाराष्ट्रात ज्यांनी विशेष कर्तृत्व गाजवलं ती राजघराणी या धनगर, गवळी समाजांतूनच उन्नत पावलेली होती. ढेरे यासंदर्भात यादव, होयसळ या राजघराण्यांचा उल्लेख करतात.
मात्र ‘गोपजनांचा देव ते महाराष्ट्राचं लौकदेवत विठोबा’ हा विठोबाचा प्रवास साधा सोपा नव्हता. किंबहुना तो हेतपुरस्सर घडवला गेला. रा. चिं. ढेरे यांनी ही प्रक्रिया ‘श्रीविठ्ठल ः एक महासमन्वय’ या ग्रंथात सविस्तर उलगडली आहे. ते म्हणतात, ‘समाजातील जो शास्त्राr, पंडितांचा वर्ग अगोदर विठ्ठलविमुख होता किंवा विठ्ठलाविषयी उदासीन होता, त्याला जेव्हा विठ्ठलाच्या अपरंपार लोकप्रियतेने चक्रावून टाकले तेव्हा त्या वर्गाला विठ्ठलाचा स्वीकार करणे आणि त्याला आपल्या प्रतिष्ठेला साजेशी शास्त्रप्रतिष्ठा देणे भाग पडले. यातूनच लोकमानसात रूजल्या, फुललेल्या कथा व गाथांना पुराणरूप देण्यासाठी त्यांनी ‘पांडुरंगमाहात्म्या’ची संस्कृतात रचना केली.’
आज आपल्या समोर जो विठोबा आहे, तो हाच वैदिकीकरण केलेला आहे. विठोबाच्या आद्यरूपाचा शोध घेतानाच त्याच्या विठोबा या नावाचाही शोध घेण्याचा प्रयत्न संशोधकांनी केलेला आहे. त्यात ‘संमत’ विचाराचा (संस्कृत, मराठी, तामीळ हा अनुबंध) पाया महाराष्ट्रात घालणाऱया विश्वनाथ खैरे यांनी ‘विठोबा’ या नावाचा घेतलेला मागोवा लक्षणीय आहे. विठोबा या देवतेचा किंवा या देवनामाचा मराठी, तामीळ अनुबंधातून संबंध जोडताना खैरे यांनी विठू या तामीळ शब्दाचा अर्थच कमरेवर हात ठेवून उभा असलेला असा असल्याचं म्हटलं आहे.
विठोबाच्या आद्यरूपाचा शोध घेताना त्याच्या विठोबा किंवा विठ्ठल या मूळ नामाचाच कायम आधार घेतला जातो. मात्र त्याच वेळी ‘पांडुरंग’ या त्याच्या उपनामाकडे संशोधकांचं कळत-नकळत दुर्लक्ष झालेलं दिसतं. परंतु या ‘पांडुरंग’ नामाचा आधार घेऊनच संशोधक संजय सोनवणी यांनी विठोबाच्या मूळ रूपाचा उलगडा करण्याचा प्रयत्न केला आहे. पांडुरंग हे विठोबाचं उपनाम असून त्याचा संबंध पौंड्र वंशाशी असल्याचं ते सांगतात. ‘विठ्ठलाचा नवा शोध’ या संशोधन पुस्तिकेत ते म्हणतात, ‘पांडुरंग, पुंडरिक, पंढरपूर आणि पौंड्रिक क्षेत्र या व्यक्ती/स्थलनामांतच श्री विठ्ठलाचे मूळ चरित्र दडलेले आहे. श्री विठ्ठल म्हणजे अन्य दुसरे कोणी नसून पौंड्र या प्राचीन पशुपालक समाजातील एक महान शिवभक्त होता व त्यालाच आज आपण पांडुरंग किंवा विठ्ठल म्हणून पुजतो. पुंडरिक हा शब्द पौंड्रिक या शब्दाचे सुलभीकरण आहे. त्यामुळे मूळ ‘पौंड्र’ कोण होते या प्रश्नाचा शोध घेणं आवश्यक होतं.’
आज सात-आठशे वर्षे झाली तरी विठोबाच्या मूळ स्वरूपाचा शोध अजून सुरूच आहे. महाराष्ट्रातील भागवत किंवा वारकरी संप्रदायाने आणि या संप्रदायात होऊन गेलेल्या संतांनी विठोबाचं ‘राजस-सुकुमार’ रूप पाहिलं आणि ते शब्दांकित केलं. संतांच्या विठोबाच्या या रूप व नाममाहात्म्यात महाराष्ट्र आजही न्हाऊन निघतो आहे. त्यामुळेच महाराष्ट्राचं सामाजिक, सांस्कृतिक आणि धार्मिक संचित आजही विठ्ठल या साडेतीन अक्षरांत दडलेलं आहे. किंबहुना मराठी समाजमनाच्या सांस्कृतिक प्रेरणा आणि धारणांच्या मुळाशी आजही पंढरपूरचा विठोबाच दडी मारून बसलेला आहे. त्यामुळेच महाराष्ट्र म्हणजे विठ्ठल आणि विठ्ठल म्हणजे महाराष्ट्र हे समीकरणच झालं आहे!
z [email protected]
(लेखक लोककला, साहित्य, संस्कृती या विषयांचे अभ्यासक आहेत.)