
पहलगाम येथील दहशतवादी हल्ला आणि ऑपरेशन सिंदूरमुळे भारत-पाकिस्तानमध्ये तणाव वाढला असतानाही दोन्ही देशांतील व्यापार कायम आहे. उलट 2024-25 या वर्षात दोन्ही देशांतील व्यापार आधीच्या वर्षांच्या तुलनेत वाढल्याचे आकडेवारीतून समोर आले आहे.
‘ऑपरेशन सिंदूर’नंतरही मे महिन्यात व्यापार सुरूच होता. तिसऱ्या देशांच्या माध्यमातून हा व्यापार झाला. आर्थिक वर्ष 2025 च्या पहिल्या 11 महिन्यांत भारतातून पाकमध्ये होणारी निर्यात 211.5 दशलक्ष डॉलर्सवर पोहोचली. ही निर्यात मागील आर्थिक वर्ष 2024 मध्ये 207 दशलक्ष डॉलर्स होती, तर आर्थिक वर्ष 2023 मध्ये ती 190 दशलक्ष डॉलर्सपर्यंत होती, असे वृत्त पाकिस्तानी वृत्तपत्र ’द डॉन’ने स्टेट बँक ऑफ पाकिस्तानच्या आकडेवारीचा हवाल्याने दिले आहे.
विशेष म्हणजे मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात संघर्ष सुरू असताना पाकिस्तानने भारतातून 15 दशलक्ष डॉलर्सच्या वस्तू आयात केल्या. गेल्या वर्षी याच महिन्यात नोंदवलेल्या 17 दशलक्ष डॉलर्सच्या वस्तूंपेक्षा हे प्रमाण किंचित कमी होते.




























































