मंथन – रिलॅक्स आयुष्य जगा!

>> डॉ. रोहन जहागीरदार

हिंदुस्थानात आत्महत्या करणाऱयांची संख्या खुनामुळे होणाऱया मृत्यूंपेक्षा पाचपट अधिक आहे. मानसिकदृष्टय़ा खचलेल्या व्यक्तीला कुटुंबाच्या, मित्रांच्या प्रेमाची, समजूतदारपणाची गरज असते, परंतु आज कुटुंब संस्था बेघर बनत चालली आहे; तर मित्र-मैत्रिणींशी असणारा संवाद सोशल मीडियामुळे कमी होत चालला आहे. याचे दूरगामी परिणाम जाणवत आहेत. या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे.

छोटय़ा पडद्यावरील अभिनेत्री तुनिषा शर्मा हिने अलीकडेच शूटिंगच्या सेटवरच आत्महत्या केली. या घटनेमुळे मनोरंजन विश्वासह संपूर्ण सांस्कृतिक विश्वात आणि समाजात खळबळ माजली. यामागील कारणाच्या जाण्याऐवजी मानसोपचारांच्या अंगाने अशा आत्महत्यांच्या घटनांकडे पाहताना काही प्रमुख बाबी लक्षात येतात आणि त्या जाणून घेणे गरजेचे आहे. कोणतीही व्यक्ती आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलताना त्याच्या मनात पराकोटीचे नैराश्य दाटलेले असते ही बाब उघड आहे.

अलीकडच्या काळात आत्महत्येचा मार्ग पत्करून जीवनाचा शेवट करण्याचं प्रमाण वाढत चाललं आहे. धक्कादायक बाब म्हणजे, मागील काळात शेतकऱ्यांच्या आत्महत्या मोठय़ा प्रमाणावर होताना दिसून आलं होतं, पण आता विद्यार्थी, नवविवाहित तरुण-तरुणी, मध्यमवयीन स्री-पुरुष, वृद्ध आदी सर्वच स्तरांत आणि वयोगटात आत्महत्यांचं प्रमाण वाढत आहे. समाजात स्वतःची प्रतिमा असणाऱया, वलयांकित व्यक्तींच्या आत्महत्या जेव्हा घडतात तेव्हा त्याची चर्चा अधिक प्रमाणात होताना दिसते. प्रत्यक्षात ती प्रातिनिधिक उदाहरणं असतात. त्यांना असणाऱया वलयांमुळं ती चर्चेत येतात; पण ते हिमनगाचं टोक आहे असं म्हटल्यास आजच्या परिस्थितीत ते गैर ठरणार नाही.

मुळात, नैराश्य अर्थात डिप्रेशन हे आज जगापुढील एक आव्हान बनत चालले आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, अमेरिका आणि चीननंतर हिंदुस्थान हा जगातील तिसऱया क्रमांकाचा नैराश्यग्रस्त देश आहे. आपल्या देशात 20 पैकी एक व्यक्ती नैराश्याने पछाडलेली असल्याचे समोर आले आहे. देशात 20 कोटी लोक कोणत्या ना कोणत्या मानसिक आजाराने पछाडलेले असल्याचे एका पाहणीतून दिसून आले आहे. नैराश्याच्या समस्येवर योग्य वेळी उपचार घेतले गेले नाहीत तर त्याची परिणती अंतिमतः जीवन संपवण्यात होताना दिसते.

हिंदुस्थानात आत्महत्या करणाऱयांची संख्या खुनामुळे होणाऱया मृत्यूंपेक्षा पाचपट अधिक आहे. राष्ट्रीय क्राइम रिकॉर्ड ब्युरोच्या अहवालानुसार 2019 मध्ये 1.39 लाख लोकांनी आत्महत्येचा मार्ग पत्करत आपली जीवनयात्रा संपवली. यामध्ये 18 ते 45 वयोगटातील व्यक्तींचे प्रमाण होते तब्बल 67 टक्के ! आत्महत्या करणाऱ्यांमध्ये सुशिक्षित लोकांची संख्या सतत वाढतच चालली आहे. जागतिक आरोग्य संघटनेने आत्महत्यांवरील अहवालात म्हटले आहे की, दरवर्षी आठ लाख लोक आत्महत्या करीत आहेत. त्यापैकी जवळपास 21 टक्के लोक हिंदुस्थानातील आहेत. त्यातही 15 ते 29 वर्षे वयोगटातील तरुण-तरुणींचे प्रमाण प्रचंड मेठे आहे. याचाच अर्थ नवी उमेद, ऊर्जा, उत्साह आणि स्वप्ने पाहण्याच्या, स्वप्नपूर्तीसाठी समर्पण भावाने योगदान देण्याच्या वयात आज बहुतांश तरुण जीवनापासून पलायन करताहेत. महानगरे, मोठी शहरे यांसोबतच लहान शहरे, एवढेच नव्हे तर गावपातळीवरही अशा घटनांची संख्या सतत वाढतच चालली आहे.

आज जीवनशैलीच नव्हे, तर एकूणच सभोवतालचं वातावरण बदलत चाललं आहे. या बदलत्या काळात ताणतणावांनी प्रत्येकाला ग्रासलं आहे. पूर्वीच्या काळीही ताणतणाव होते; पण त्यांचं स्वरूप वेगळं होतं. दोनवेळचं अन्न मिळवायचं,  कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडायच्या यातून येणारा ताण पूर्वी पाहायला मिळायचा. आज तशी स्थिती नाही. पण त्यातून काही नवे प्रश्न निर्माण झाले आहेत. माझ्याकडे 8-20 वर्षे वयोगटातील काही तरुण समुपदेशनासाठी येतात. त्यांना या वयात महिन्याला 50-60 हजार रुपये पगार असतो. त्यांच्यावर कोणत्याही काwटुंबिक जबाबदाऱया नसतात. अशा वेळी त्यांना या पैशांचं काय करायचं हे कळत नाही. यातून बऱ्याचदा ते व्यसनांकडे वळतात. एन्जॉयमेंट किंवा आनंद मिळवण्याच्या नावाखाली व्यसनं करणं ही जणू सध्या लाटच आली आहे.

आत्महत्या करण्याची कारणं प्रत्येक ठिकाणी भिन्न असतात. त्यामुळंच या प्रश्नाचा विचार करताना तो सर्वंकषरीत्या करायला हवा. सर्वप्रथम आत्महत्या करणाऱया व्यक्तीला मानसिक आजार जडला होता का हे पहावं लागतं, पण बऱ्याचदा आपण अन्य घटकांचाच ऊहापोह अधिक करतो. सामान्यतः नैराश्य, स्क्रिझोफेनिया, पर्सनॅलिटी डिसऑर्डर या तीन मानसिक आजारांमध्ये अशा प्रकारचं पाऊल उचलण्याचा प्रयत्न होताना दिसतो.

आज ताणतणाव कसा हाताळायचा यापेक्षा तो कशामुळे निर्माण होतोय हेच अनेकांना कळेनासे झाले आहे. याचं मूळ कारण आहे मोकळ्या संवादाचा अभाव. एकमेकांशी आपण बोललोच नाही, आपल्या भावना मोकळेपणानं व्यक्तच केल्या नाहीत तर त्यातून मनावरचं दडपण वाढत जातं. याबाबत आपण दीर्घकाळ कोणतेही उपाय केले नाहीत तर त्यातून नैराश्य किंवा डिप्रेशनची स्थिती येते. त्यामुळं मोकळेपणानं संवादाची प्रक्रिया वाढीस लागणं अत्यंत आवश्यक आहे. आपण घरात पत्नीशी, मुलांशी बोलतो त्याला संवाद म्हणत नाहीत. संवाद हा इंटरऑक्टिव्ह किंवा परस्परांच्या विचारांची देवाणघेवाण करणारा, परस्परांचे विचार समजून घेणारा असला पाहिजे. आज तोच हरपत चालल्यामुळं ताणतणाव वाढत आहेत.

आणखी एक मुद्दा म्हणजे अलीकडील काळात नात्यांची ऊब हरपत आहे. पूर्वी आपण मामाकडे जायचो, काकांकडे, आत्याकडे जायचो. आज नात्यांमध्ये तशी जवळीक राहिलेली नाही. परिणामी लोकांचं अवलंबित्व ‘पीअर ग्रुप’वर म्हणजे मित्र, ऑफिसमधील सहकारी यांच्यावर वाढतं आहे, पण इथं आपण स्पर्धकही असतो. या स्पर्धात्मकतेमुळे या नात्यांमध्ये आत्मपेंद्रीपणा असतो. स्वतःचा फायदा पाहिलाच पाहिजे; पण अशा प्रकारचं स्पर्धकतेचं नातं असल्यामुळं एकटेपणा वाढत जातो.

– सर्वसामान्यांनी दररोज येणाऱ्या ताणतणावांचं व्यवस्थापन कसं करायचं, ताणाचा सामना कसा करायचा आणि तणावमुक्त जीवन कसं जगायचं हे जाणून घेऊ या. यासाठी मी नेहमीच सांगत आलो आहे की, आयुष्यात रुटिन, रिस्पॉन्सिबलिटी आणि रिलॅक्सेशन या तीन ‘आर’चा समतोल साधता आला पाहिजे. यातील कोणतीही एक गोष्ट 100 टक्के केली तर आयुष्य यशस्वी होत नाही. उदाहरणार्थ, जबाबदाऱयांचा विसर पडून केवळ रुटिनमध्येच गुंतून पडून चालणार नाही. त्याचप्रमाणे केवळ मुलाबाळांच्या जबाबदाऱ्यांचं ओझं आहे म्हणून रिलॅक्सेशन न घेता सतत धावूनही चालणार नाही. अशाच प्रकारे कोणतीही जबाबदारी न घेता केवळ रिलॅक्सेशन म्हणजेच आराम करूनही चालणार नाही. तीनही गोष्टींमध्ये समतोल साधणं आवश्यक आहे. दुसरी गोष्ट म्हणजे आज सर्वांना सर्वच गोष्टी सुलभरीत्या उपलब्ध आहेत. मात्र या भौतिक गोष्टींमध्ये सुख कधीच नसतं. अन्यथा आपण सुपर मार्केटमधून सुख विकत घेतलं असतं. म्हणूनच आपल्या स्वतःला आनंद कशात वाटतो हे ओळखून घ्यावं. तुम्हाला एखादं गाणं ऐकण्यात आनंद असेल आणि दुसऱ्याला हजार रुपये खर्च करण्यात आनंद वाटत असेल तर हे दोन विभक्त विचार आहेत. तुम्ही जर उद्या त्या व्यक्तीप्रमाणे हजार रुपये खर्च करायला जाल तर त्यातून आनंद मिळेलच याची कोणतीही शाश्वती नाही. म्हणून आपल्याला आनंद कशात वाटतो ते जाणून घ्या आणि त्याचप्रमाणं आयुष्य जगा. आयुष्य खूप सुंदर आहे. त्याचा आनंद घेण्यासाठी सकारात्मक बना. विचारांची सकारात्मकता अनेक अशक्य गोष्टी साध्य करण्यास कामी येते. जगण्याची ऊर्मी देते.
(लेखक मानसोपचार तज्ञ-समुपदेशक आहेत)