कमनशिबी शरद हजारे

>> द्वारकानाथ संझगिरी

शरद हजारे गेला. परवाच करसन घावरीने फोन करून सांगितलं, ‘काल एस्केला पाहून आलो. फक्त हाडं दिसतात.’ माझी त्याला पाहायला जायची हिंमत झाली नाही. धडधाकट पाहिलेल्या माणसाला अशा अवस्थेत पाहावत नाही.

धोनी युगातला क्रिकेट फॅन मला विचारेल ‘कोण हे सद्गृहस्थ?’ अगदी माझ्या पुढच्याही पिढीच्या कपाळावर प्रश्नचिन्ह दिसेल. आम्ही विजय हजारेंना विसरलोय, तर शरद हजारे कुणाच्या खिसगणतीत असणार? पण आजच्या पिढीला सांगावंस वाटतंय त्याच्याबद्दल म्हणून मी लिहितोय. एका वाक्यात सांगू? हिंदुस्थानी संघासाठी अनेक उत्तम यष्टिरक्षक खेळले. त्यांच्यातल्या अनेक यष्टिरक्षकांपेक्षा तो जास्त चांगला होता, पण तरीही हिंदुस्थानसाठी खेळला नाही. कारण? नशीब, गॉडफादर नसणं.

तो यष्टिरक्षणाची असामान्य कला वरतून घेऊन आला. इथे त्याने नरेन ताम्हाणेंना द्रोणाचार्य मानलं. तो स्वतः एकलव्य झाला. या द्रोणाने त्याच्याकडे अंगठा मागितला नाही. तो नियतीने मागितला. त्यामुळे अर्जुनाची प्रतिभा असून तो अर्जुन झाला नाही. तो मुंबईसाठी दहा वर्षे खेळला. हिंदुस्थानी संघात तो एकदा 1969 साली चौदा खेळाडूंत होता. दरवाजा समोर होता. बेल वाजवली होती, पण दरवाजा बंद राहिला तो कायमचा.

ती 1969 ची कसोटी ऑस्ट्रेलिया विरुद्ध चेन्नईला होती. फरुख इंजिनीअर प्रमुख यष्टिरक्षक हा ‘खो’ द्यायला उभा. हिंदुस्थानी संघाचा कर्णधार होता टायगर पतौडी. त्या मॅचसाठी त्याचा रूमपार्टनर होता वेंकटराघवन. तो चेन्नईचा. त्यामुळे तो रात्री घरी जायचा. रूममध्ये हा एकटा. पतौडी त्याला विचारायचा, ‘सोबतीसाठी रूमवर झोपायला येऊ?’ शरद तेव्हा सर्वात लहान. टायगरने असं विचारणं म्हणजे माडाने वाकून गवताला विचारणं होतं ‘सोबत देऊ का?’

मॅचच्या आदल्या दिवशी पतौडीने फरुखला सांगितलं जरा प्रसन्ना, वेंकट, बेदीला कीपिंग कर. फरुखने कंबर दुखत असल्याचं कारण दिलं. पतौडी शरदला म्हणाला, ‘जा पॅड बांध अणि कीपिंग कर.’ खेळपट्टी भिंगरी होती. चेंडू मनमानी करत होता. शरदने असं यष्टिरक्षण केलं की, खेळपट्टी त्याला वश आहे असं वाटावं. उधळलेल्या घोडय़ावर सहज मांड टाकून लगाम हातात घ्यावेत तसे उधळलेल्या चेंडूचे लगाम त्याने ग्लोव्हजमध्ये घेतले. पतौडी वेडा झाला. फरुखची कंबर अचानक बरी झाली. पतौडीने खवचटपणे फरुखला सांगितलं, ‘जा विश्रांती घे. उद्या तूच खेळशील. शांत झोप.’ त्यानंतर एक वर्षात हिंदुस्थानी संघ वेस्ट इंडिजला गेला. फरुख गेला नाही. शरदसुद्धा गेला नाही. गेले कृष्णमूर्ती आणि जिजिभॉय.

त्या दोघांच्या हातावर अचानक रेष उमटली, पण फक्त तेवढीच, पण शरदच्या हातावरची रेष पुसली गेली ती कायमची. त्याची गुणवत्ता पुसायची ताकद मात्र कुणात नव्हती. वेगवान गोलंदाजीला तो सरळ स्टंपजवळ उभा राहायचा. त्यानेच एक किस्सा सांगितला. दादर युनियन विरुद्ध हिंदू जिमखाना अशी मॅच होती. सुनील गावस्कर बॅटिंग करत होता. त्याला गोलंदाजी करत होता उमेश कुलकर्णी. त्या वेळचा वेगवान गोलंदाज. सुनीलला क्रिजच्या बाहेर उभे राहायची सवय होती.

शरद थेट स्टंपजवळ उभा राहिला. वेगवान गोलंदाजाला ते आवडत नाही. त्याच्या वेगाचा अवमान केल्यासारखा वाटतो. त्याने उमेश कुलकर्णीला समजावलं, ‘हीच संधी आहे. एकदा तो सेट झाला की संपलं.’ उमेशने इनस्विंग टाकला. शरदने स्टंप केला अणि मग त्याच्या डोळय़ाचं पातं लवलं. एका स्पर्धेत सरावाच्या वेळी वेंगसरकरने सुरींद्र खन्ना या यष्टिरक्षकाला प्रदीप सुंदरमच्या गोलंदाजीवर नेटमध्ये कीपिंग करायला सांगितलं. खन्ना त्यावेळी हिंदुस्थानसाठी खेळला होता. सुंदरम देशातला सर्वात वेगवान गोलंदाज होता. खन्ना नाही म्हणाला. दिलीप वेंगसरकर म्हणाला, ‘एस्के, पॅड लाव.’ शरद निवृत्त झाला होता, पण त्याने पॅड लावले. कीपिंग केली. ती पाहून खन्ना हबकला.

त्याला कल्पना नव्हती की, एस्केचा दर्जा काय आहे. एस्के म्हणाला, ‘काळजी करू नकोस, उद्या तूच खेळणार आहेस. मी थोडा सराव केला.’ शरदच्या किती कथा सांगायच्या? शरद वयाच्या 64 व्या वर्षी स्टार क्लबसाठी चक्क कांगा लीग खेळला. किती दमछाक झाली असेल आणि त्या कांगा लीगच्या खेळपट्टय़ा! त्याला का आमंत्रण दिलं? कारण 64 वर्षांच्या शरदएवढा चांगला यष्टिरक्षक त्यांच्याकडे नव्हता. हे खेळाडू काळाच्या ओघात विसरले जाणार म्हणून त्यांच्या कर्तृत्वाच्या चौथऱ्यावर एक आठवणींची पणती लावली. नशिबाने एकदा तरी हात त्याच्या खांद्यावर ठेवला असता तर तिथे दीपमाळा पेटल्या असत्या.