वैविध्यपूर्ण भूमिकांना पसंती

>> गणेश आचवल

या वर्षी अनेक विविध विषयांवरचे मराठी चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. नुकताच आय प्रेम यूअसे वेगळे शीर्षक असणारा मराठी चित्रपट प्रदर्शित झाला आहे. यामध्ये सखाही प्रमुख भूमिका करणारा अभिनेता म्हणजे अभिजित आमकरएक प्रॉमिसिंग चेहरा.

 अभिजित गिरगावातील आर्यन हायस्कूल मराठी माध्यम शाळेतील विद्यार्थी. शाळेपासूनच त्याला नृत्याची आवड होती. के. सी. कॉलेजमध्ये असताना अनेक एकांकिका स्पर्धा, तसेच कॉलेजचे स्नेहसंमेलन, फॅशन शो अशा विविध उपक्रमांत अभिजितचा कायम सहभाग असायचा. कॉलेजमध्ये असताना तो नृत्यसुद्धा आवडीने करत होता आणि त्याचे नृत्य पाहूनच त्याला ‘माझे मन तुझे झाले’ नावाच्या मालिकेत प्रमुख भूमिका मिळाली आणि ही भूमिकादेखील एका डान्सरची होती. मग त्याने ‘अरे वेडय़ा मना’ मालिकेत काम केले. झी मराठीवरील ‘नकटीच्या लग्नाला’मध्येदेखील तो होता. गिरगाव ऍप या डिजिटल पोर्टलसाठी ‘सेलिब्रेटी बाप्पा’ या मालिकेत तो सूत्रसंचालक होता. चित्रपट या माध्यमात काम करण्यासाठी अभिजित खूप प्रयत्न करत होता आणि एका ठिकाणी ऑडिशन दिल्यानंतर त्याला त्याच्या आयुष्यातील पहिला मराठी चित्रपट मिळाला आणि तो म्हणजे ‘एक सांगायचंय.’

अभिजित म्हणतो, ‘‘यामध्ये माझी पोलीस अधिकाऱयाच्या मुलाची भूमिका होती आणि माझ्या वडिलांची भूमिका के. के. मेनन हे सुप्रसिद्ध अभिनेते करत होते. पहिल्याच चित्रपटात एवढय़ा मोठय़ा अभिनेत्याबरोबर काम करताना खूप गोष्टी शिकता आल्या.’’

 त्यानंतर अभिजितने ‘टकाटक’ हा मराठी चित्रपट केला. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर प्रचंड यश मिळाले. या चित्रपटाकरिता त्याला काही पुरस्कार सोहळय़ात नामांकनदेखील मिळाले होते. मग त्याच पठडीतल्या भूमिका अभिजितकडे येऊ लागल्या. त्याला वैविध्यपूर्ण भूमिका करायच्या होत्या आणि मग ‘आय प्रेम यू’सारखा चित्रपट त्याला मिळाला. तो म्हणतो, ‘आय प्रेम यू’ या शीर्षकात गंमत आहे. यात मी ‘सखा’ ही प्रमुख व्यक्तिरेखा साकारली आहे. हा खरं तर दुसऱयांवर अवलंबून असणारा आहे. त्याला निर्णय घेता येत नाहीत, पण जेव्हा त्याच्या आयुष्यात एक मुलगी येते आणि मग त्याचे आयुष्य नेमके काय वळण घेते, हे यात मांडले आहे, पण ही फक्त प्रेमकथा नसून त्यात ‘सखा’ या व्यक्तिरेखेचे आपल्या आईवर असणारे प्रेम, निसर्गावर, मित्रांवर, कलेवर असणारे प्रेम अशा सर्व छटा यात आहेत. या चित्रपटाच्या निमित्ताने एका दाक्षिणात्य अभिनेत्रींबरोबर मी यात काम करत आहे.

येत्या काही महिन्यांत अभिजितचा ‘भ्रम’ हा मराठी चित्रपट प्रदर्शित होईल आणि योगेश भोसले दिग्दर्शित एका मराठी चित्रपटातदेखील त्याची भूमिका आहे. चांगल्या भूमिकेच्या शोधात कलाकार असतात. एका विशिष्ट इमेजमध्ये न अडकता वैविध्यपूर्ण भूमिका करण्याची त्याची इच्छा आहे.