धागा जुळला

>>गणेश आचवल

आपल्या देशात सण, उत्सव आणि चित्रपट यांचं जवळचं नातं आहे. मुख्य म्हणजे प्रत्येक सणावर आधारित अनेक भावगीतं आणि चित्रपट गीतं यांनी ती संस्कृती जपली आहे, असं म्हणता येईल.

रक्षाबंधन म्हटलं की बहीण-भावाच्या नात्यावर आधारित अनेक गाणी आठवतात. तुम्हाला ‘रेशम की डोरी’ चित्रपट नक्की आठवत असेल. त्यात अभिनेते धर्मेंद्र यांच्यावर चित्रित झालेलं ‘बहना ने भाई की कलाई से प्यार बाँधा है’ हे सुमन कल्याणपूर यांच्या स्वरातील गीत आहे. तसेच ‘छोटी बहन’ नावाचा चित्रपट आला होता. त्यात लता मंगेशकर यांच्या स्वरात ‘भैया मेरे राखी के बंधन को निभाना, भैया मेरे छोटी बहन को न भुलाना’ हे गीत आहे. या गीताला शंकर-जयकिशन यांचे संगीत आहे. 1962 साली ‘अनपढ’ नावाचा एक चित्रपट आला होता. त्यात ‘रंग-बिरंगी राखी लेके आई बहना, राखी बँधवा ले मेरे वीर’ हे लतादीदी यांच्या स्वरातील गीत असून ते संगीतकार मदन मोहन यांनी स्वरबद्ध केले आहे.

अभिनेत्री वर्षा उसगावकर यांच्यावर चित्रित झालेले ‘तिरंगा’मधील ‘इसे समझो ना रेशम का तार भैया, मेरी राखी का मतलब है प्यार भैया’ हे गीत साधना सरगम यांनी गायले आहे. डॉक्टर श्रीराम लागू, राजकिरण यांच्यावर चित्रित झालेले ‘मेरी बहेना ये राखी की लाज तेरा भैया निभायेगा’ हे गीत ‘घरद्वार’ या चित्रपटातील आहे. ही काही गाणी हिंदी चित्रपटातील झाली.

आता थोडेसे मराठी चित्रपटांविषयी बोलूया. सुमन कल्याणपूर यांनी ‘धाकटी बहीण’ या चित्रपटासाठी ‘धागा जुळला, वेडय़ा बहिणीला भाऊ मिळाला’ हे रक्षाबंधनावरील गीत गायले आहे. बहीण-भावाच्या नात्याविषयी भावना व्यक्त करणारे आणि खास करून द्रौपदी आणि श्रीकृष्ण यांचे नाते उलगडणारे गीत ‘भरजरी ग पितांबर दिला फाडून, द्रौपदीसी बंधू शोभे नारायण’ हे आशा भोसले यांच्या स्वरात आहे. हे गीत राष्ट्रपती सुवर्णपदक विजेत्या ‘शामची आई’ या चित्रपटात आहे. ‘माहेरची साडी’ हा तर बहीण- भावाचे नाते सांगणारा चित्रपट. त्यात भावाची भूमिका अजिंक्य देव तर बहिणीची भूमिका अलका कुबल आठल्ये यांची होती. त्यात सुरेश वाडकर यांच्या स्वरातील एका लग्नसोहळ्याचे गीत आहे. ‘सासरला ही बहीण निघाली भावाची लाडी, नेसली माहेरची साडी’ या गीताचे शूटिंग भोर येथे झाले होते. ‘नणंद भावजय ’ हा चित्रपटसुद्धा लोकप्रिय झाला होता. त्यात ‘मायेची सावुली आनंदी बाहुली, आहे गुणाची मोठय़ा मनाची, जाई जशी माझी ताई’ हे गीतसुद्धा बहीण-भावाच्या नात्याविषयी आहे. ‘धर्मकन्या’ चित्रपटात ‘गोड गोजिरी लाज लाजरी ताई तू होणार नवरी’ हे ताईच्या लग्नाविषयीचे गीत आहे.

भावा-बहिणीचे नाते अनेक बालगीतातूनसुद्धा उलगडले गेले आहे. ‘नको ताई रुसू कोपऱयात बसू, येऊ दे ग गालात खुद्कन हसू’ असेल किंवा ‘गोरी गोरी पान फुलासारखी छान दादा मला एक वहिनी आण’ ही गाणी अनेक दशके रसिकांच्या मनावर राज्य करत आहेत. बहीण-भावाच्या नात्यावर भाष्य करणारा ‘रक्षाबंधन’ हा चित्रपट रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर या वर्षी प्रदर्शित होत आहे. यात एक भाऊ आणि त्याच्या चार बहिणींची गोष्ट आहे. यात भावाच्या भूमिकेत अक्षय कुमार आहे. थोडक्यात काय तर आपल्या चित्रपटसृष्टीने नाती जपली आणि नात्यांवर आधारित चित्रपटही निर्माण केले.