
>> हर्षवर्धन दातार
अनेक चित्रपटांतून कथा पुढे नेण्यासाठी किंवा प्रसंगाला अनुरूप म्हणून रेल्वेचा उपयोग केलेली अनेक गाणी आपल्याला आढळतात. कृष्ण-धवल चित्रपटातील रेल्वे गाडीतील आणि गाडीच्या तालावर बेतलेल्या गाण्यांच्या प्रवासाला निघत अशाच काही गाण्यांचा प्रवास आज करूया.
सर्व पिढय़ांची आणि वयोगटाची सीमारेषा ओलांडणारा सार्वत्रिक आवडीचा विषय म्हणजे ‘रेल्वे.’ देशाच्या कानाकोपऱयात पसरलेल्या आणि ठिकाणांना जोडणाऱया रेल्वे मार्गाच्या निकषांवर हिंदुस्थानी रेल्वे ही जगात चौथ्या क्रमांकावर आहे. चित्रपटांतसुद्धा रेल्वे हा एक आवडीचा विषय असून एका संपूर्ण चित्रपटासह अनेक कथा, प्रसंग, गाणी रेल्वेच्या पार्श्वभूमीवर बेतलेली आहेत. आपल्यापैकी अनेकांची पहिली ओळख ‘झुक झुक अगीनगाडी, धुरांच्या रेषा हवेत काढी’ या बालगीतातून झाली. आगगाडी घाटातून मार्गस्थ होत असताना गाडीची चाक आणि रूळ यांच्या ‘कशासाठी-पोटासाठी, खंडाळय़ाच्या घाटासाठी’ लयबद्ध जुगलबंदीवर आपण ताल धरला. ‘आशीर्वाद’मध्ये (1968) अशोककुमारनी गायलेले आणि त्यांच्यावरच चित्रित झालेले ‘रेलगाडी रेलगाडी, बीचवाले स्टेशन बोले रुक रुक’ हे गाणे आपल्या मनावर आणि जाणिवांवर कायमचे कोरले गेले. हे गाणे म्हणजे त्या काळातला ‘रॅप’ प्रकार. हूपकल, दिंडीगल अशा अनेक गमतीदार स्टेशनांची नावे या गाण्याचे वैशिष्टय़च.
पुढे अख्ख्या महाराष्ट्राचे दैवत पु.ल. देशपांडेनी ‘काही अप काही डाऊन’ या अप्रतिम व बोलक्या लेखातून स्थायीभाव असलेल्या आपल्या वैशिष्टय़पूर्ण विनोदी कोपरखळीसह कधी काळजाला स्पर्श करणाऱया, तर कधी अंतर्मुख करणाऱया व अनेकदा वाचकांच्या चेहऱयावर ओळखीची स्मितरेषा उमटवणाऱया लिखाणातून समग्र रेल्वे भावविश्व, त्याच्या अंतर्भाव असलेल्या इंद्रधनुषी विरोधाभास – विसंगतीसह आपल्यापुढे उभं केलं. स्टेशन मास्टर, पोर्टर, थोडा वेळ एकत्र प्रवास करणारे, पण नंतर वेगवेगळय़ा दिशांना मार्गस्थ होणारे प्रवासी, हमाल, गार्ड, फलाटावरचा सूरदास, खोमचे वाला, फलाटावर कायम वास्तव्याला असलेला कुत्रा अशा अनेक व्यक्तिरेखांचे दाटणारे भाव आपण अनुभवले. धावणाऱया गाडीच्या चाकाचा रुळासंगत वाजणारा तालवाद्यांसारखा मेळ आणि दादरा केहेरवासारखा ठेका. मित्रांचं, नातेवाईकांचे स्वागत किंवा निरोप देणारे प्रसंग या सगळय़ा गोष्टी एखाद्या बोलक्या चित्राप्रमाणे आपल्या डोळय़ासमोर साक्षात उभे करण्याचे काम पु.ल. देशपांडेनी या लेखातून केलं आहे. प्रेमी युगुलांची ताटातूट असो की, पुनर्मिलन, अनेक वर्षे नोकरी-धंद्यानिमित्त बाहेरगावी वास्तव्य करून उन्हाळी सुट्टीकरिता ‘होमटाऊन’ला येत असलेले चाकरमानी असो किंवा लग्नानंतरची ‘बिदाई’ असो, फलाट किंवा त्यावरून सुटलेली गाडी आणि पाहुण्यांना निरोप देण्याकरिता आलेले यजमान आणि नातेवाईक (बहुतांशी मुलीचे वडील) अशा प्रसंगांचे नेहमीच मूक साक्षीदार राहिले आहेत. एक काळ असा होता, जेव्हा आगगाडी हा कुतूहलाचा, अपूर्वाईचा विषय होता.
सत्तरच्या दशकाच्या अखेरीस विशेषतः हॉलीवूडमधून डिझास्टर मूव्ही म्हणजे दुर्घटनेवर आधारित चित्रपटांची एक लाट आली होती. त्याअनुषंगाने तर आपल्याकडे रेल्वे दुर्घटनेवर बेतलेला ‘द बर्निंग ट्रेन’ (1980) हा त्या वेळच्या अनेक प्रसिद्ध सिनेकलाकारांनी भरलेला एक संपूर्ण चित्रपट आला होता. रेल्वे म्हटलं की, आगगाडीची शिट्टी, रुळावर धावणाऱया चाकाचा, इंजिनची वाफ सोडताना, सांधे बदलताना होणारा आवाज, प्लॅटफॉर्मवरच्या उद्घोषणा अशा विविध प्रकारचे, वेगवेगळय़ा पट्टीतले, लयीतले, खर्जातले आवाजही कुणाही संगीतकाराला पर्वणीच आणि या सर्व आवाजांच्या मेळातून एक धावत, जिवंत संगीत विश्व उभे करण्याची संधी. त्यातून निर्माण झालेली ही सर्व सुरेल, मधुर, अजोड अशी रेल्वे विषयावर आधारित गाणी. अनेक चित्रपटांतून कथा पुढे नेण्यासाठी किंवा प्रसंगाला अनुरूप म्हणून रेल्वेचा उपयोग केलेली अशी अनेक गाणी आपल्याला आढळतात. आज आपण अशा गाण्यांच्या एका रेल्वे प्रवासाला निघत आहोत. कृष्ण-धवल चित्रपटातली रेल्वे गाडीतली आणि गाडीच्या तालावर बेतलेल्या काही गाण्यांचा.
अगदी आधीच्या काळात आगगाडीच्या तालावर गाजलेली गाणी म्हणजे पंकज मलिक आणि कोरसनी गायलेले ‘डॉक्टर’ (1941) चित्रपटातील प्रत्यक्ष गाडीच्या डब्यात चित्रित झालेले ‘आई बहार आज आई बहार’ आणि 1954च्या बिनाका गीतमालामध्ये पाचव्या क्रमांकावर असलेले ‘वारीस’मधील (1954) तलत-सुरैय्या यांचे अतिशय लोकप्रिय ‘राही मतवाले तू छेड एक बार मन का सितार.’ या गाण्यात गाडीच्या शिट्टीच्या सुंदर उपयोग केला आहे. 1950च्या दिलरुबामध्ये तबल्याच्या थिरकत्या तालावरच ‘धक धक करती चली’ हे गीता आणि ग्यान दत्त यांचे कमी चर्चित पण श्रवणीय गाणे आहे. संपूर्ण गाण्यात चालत्या गाडीचा ताल ऐकू येतो. यात गाडीच्या डब्यात चक्क सतार व तबला वाजवणारे साथीदार पण आहेत. शहनाई (1947) यात एका स्टेज शोदरम्यान फक्त आगगाडीच्या तालावर आधारित व सी. रामचंद्रांचे संगीत असलेले आणि लता-अमीरबाई-गीत दत्तचे ‘जवानी की रेल चाली जाये रे’ हे गाणे खूप गाजले होते. तसेच ‘उस्ताद पेड्रो’ (1951) यात ‘दिल का ये इंजन सिटीया मारे’ हे एक, खेळकर गाणे आहे. यात सुरुवातीला शिट्टीचा खूप सुंदर वापर आहे. शिवाय इंजिन, गार्ड, लाईन क्लियर, तुफान मेल असे रेल्वेशी संबंधित शब्दांनी हे गाणे खूपच भन्नाट केले आहे. आश्चर्य म्हणजे ज्यांना आपण गंभीर, गजल गीतकार म्हणून ओळखतो असे राजा मेहंदी अली खान या गंमतीदार गीताचे जनक आहेत.
सर्वात अतिशय ठळक असे ‘जवाब’तील (1942) काननदेवीचे ‘ये दुनिया तुफान मेल.’ यात चालत्या आगगाडीचा उपयोग पडद्यावर फक्त दृश्य आणि संगीताकरिता ताल म्हणून केला असला तरी गाणे अतिशय सुरेल व श्रवणीय आहे. संगीतातील लय इतकी तालबद्ध व धावती आहे की, गाणे ऐकताना आपल्याला प्रत्यक्ष आगगाडीत बसल्याचा प्रत्यय येतो. विशेष म्हणजे गाण्याच्या शेवटी गती कमी होत थांबणारी गाडी व त्या जोडीने मंद होत गेलेले पार्श्वसंगीत यांचा मेळ खूप छान जमला आहे. त्याकाळी नावाने आणि कर्तृत्वाने सर्वात वेगवान गाडी म्हणून तुफान मेल प्रसिद्ध होती. दुर्दैवाने काही अपघातांच्या कारणास्तव पन्नासच्या दशकांत तुफान मेल ही गाडी बंद करण्यात आली. पुढे अनेक वर्षांनंतर ‘श्रद्धांजली’ या संचात हेच गाणे गाऊन लतादीदींनी मूळ गायिका काननदेवींच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. रेल्वे प्लॅटफॉर्ममध्ये (1955) चरित्र अभिनेता मनमोहन कृष्णवर चित्रित साहिर-मदनमोहन-रफी या त्रयीचे ‘बस्ती बस्ती पर्बत पर्बत गाता जाये बंजारा’ हे गाणेही खूप लोकप्रिय झाले होते. 1940 ते 1960च्या दशकातील इतर रेल्वे गाण्याचा उल्लेख करणे क्रमप्राप्त आहे. ‘संजोग’मधील (1843) श्याम कुमारचे ‘जान बची तो लाखो पाये,’ आशा रफी व मीना वाघ यांनी गायलेले ‘एक दो तीन’मधील (1953) ‘चल मेरी गड्डीये तू.’ सब कुछ किशोर कुमारचे ‘महलो के ख्वाब’मधील (1960) ‘ये है जीवन की रेल.’ जॉय मुखर्जीवर चित्रित ‘लव्ह इन सिमला’मधील (1960) ‘दिल थाम चले आज.’ या गाण्यांनी रेल्वे सफरीला एक आगळावेगळा वेग आणि लय दिली. ‘आरती’मधील (1962) मजरूह-रोशन यांचे आशा भोसले आणि रफींनी गायलेले व राजेंद्र नाथ-विजया चोधरी युगुलावर चित्रित ‘ना भँवरा ना कोई गुल’ एक मधुर गीत. या गाण्याला धावत्या आगगाडीची तालबद्ध लय आहे. ‘रॉयल मेल’मध्ये (1963) सुमन कल्याणपूर आणि बद्री पवार यांचं ‘चली जाये रे जीवन की गाडी’ हे एक दुर्मीळ कमी चर्चित गाणे. गाण्याच्या चालीला शिट्टीची जोड असलेली गाडीची धिमी लय आहे. प्रवासातले प्रेमी युगुल आपल्या भावी जीवनाची स्वप्न रंगवीत आहेत, मात्र या सगळय़ा गाडी गाण्यांमध्ये एक कलंदर परिपेक्ष असलेले ‘काला बाजार’ यातील (1960) शैलेंद्र-सचिन देव बर्मन-रफी यांचे ‘अपनी तो हर आह तो एक तुफान है.’ हे विजय आनंदच्या वेगळय़ा दिग्दर्शनाखाली कल्पकतेने चित्रित झालेले गाणे भाव खाऊन जाते. केवळ एक गिटार आणि गाडीची शिट्टीच्या किमान वाद्यमेळावर आणि मंद लयीवर बसवलेले हे गाणे आजही अतिशय लोकप्रिय आहे.
एक गोष्ट मात्र खरी की, या सगळय़ा गाण्यातून वाफेवर चालणाऱया इंजिनाच्या ‘झुक झुक’ आगगाडीची दृश्ये मात्र अतिशय विलोभनीय आणि आठवणींच्या हिंदोळय़ावर नेणारी आहेत. काळाप्रमाणे चित्रीकरणाची, ध्वनीमुद्रणाची तंत्रे प्रगत होत गेली आणि त्याच अनुषंगाने रेल्वेतील गाणी ही अधिक सफाईदार होत गेली. या बदलत्या काळातील रेल्वे गाडीशी संबंधित गाण्यांचा परामर्श पुढील भागात.
[email protected]
(लेखक संगीत अभ्यासक आहेत)