प्लेलिस्ट – भोर आई, गया अंधियारा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> हर्षवर्धन दातार 

दीपावली म्हणजे ‘तमसो मां ज्योतिर्गमय’ अर्थात अंधार, वाईट, क्रूर रीतींचा नाश आणि एका उज्ज्वल भविष्याची पहाट. यानिमित्ताने काही आनंदी, आशावादी आणि सकारात्मक संदेश देणारी गाणी.

आपल्या संस्कृतीची विशेषता म्हणजे राहणीमान आणि सण हे सर्व निसर्गाच्या ऋतुपावर तसेच सृष्टीच्या मूलतत्त्वांवर आधारित आहेत. कार्तिक महिन्यातील दीपावलीने या सणांच्या वर्षयात्रेची सांगता होते. दीपावली म्हणजे ‘तमसो मां ज्योतिर्गमय’ अर्थात अंधार, वाईट, क्रूर रीतींचा नाश आणि एका उज्ज्वल भविष्याची पहाट. यानिमित्ताने काही आनंदी, आशावादी आणि सकारात्मक संदेश देणारी गाणी.

हिंदी सिनेमांमध्ये दिवाळी प्रसंगोचित गाणी तशी विरळ आहेत. सर्वात प्रामुख्याने आपल्या कानावर पडते ते ‘शिर्डी के साईबाबा’ (1977) चित्रपटातले पांडुरंग दीक्षित यांनी स्वरबद्ध केलेलं आणि आशा भोसले यांनी गायलेले लयबद्ध ‘दीपावली मनाई सुहानी’. सुरुवातीच्या काळातील ‘रतन’मध्ये (1944) जोहराबाई अंबालेवाली यांनी संगीतकार नौशाद यांचं ‘आयी दिवाली’ आणि ‘खजांची’मध्ये (1958) मदन मोहन यांनी संगीतबद्ध केलेलं, श्यामावर चित्रित आणि आशा भोसले यांचं ‘आयी दिवाली कैसी खुशहाली लायी’. दोन्ही गाणी अतिशय गोड आणि सुरेल चालींची. ‘जुगनू’ (1973) या प्रमोद पावर्तींच्या चित्रपटात धर्मेंद्र आणि मुलांवर चित्रित ‘दीप दिवाली के झू”s’ हे सचिन देव बर्मनने संगीतबद्ध केलेलं आणि किशोर कुमारने नेहमीच्या उत्साही आणि बुलंद आवाजात गायलेलं गाणं सगळीकडे आनंद पसरवून जातं. सगळीकडे दिवाळीची रोषणाईचा माहौल आहे. बाहेर आनंदाची दिवाळी असून ‘हरियाली और रास्ता’मध्ये (1962) मनोज कुमार आणि माला सिन्हा मात्र काहीसे उदास स्वरात गात आहेत. हसरत जयपुरीचे बोल ‘लाखो तारे, आसमान में’. मुकेश आणि लता यांनी गायलेल्या या गीतात अकार्डियन, व्हायोलिन सुंदर वाजलेले आहेत. संगीत शंकर जयकिशनचे. ‘हकीकत’ (1962) हा हिंदुस्थान-चीन युद्धावर आधारित चेतन आनंदचा चित्रपट. त्यात कारुण्याची झालर असलेलं ‘आयी अब की साल दिवाली’ हे कैफी आझमी-मदन मोहन-लता यांचे गाणे.

दिवाळीच्या दिवसांत पावसाळा संपून गुलाबी थंडीची चाहूल लागते. निसर्ग सगळीकडे हिरवीगार चादर ओढून कोवळी उन्हं अंगावर घेत असतो. तेव्हा आठवतं ते ‘बूंद जो बन गये मोती’मधलं (1967) निसर्गाचं, पंडित भरत व्यासांनी केलेलं वर्णन आणि सतीश व्यासांनी संगीतबद्ध केलेलं मुकेशनी गायलेलं ‘हरी भरी वसुंधरा’. पडद्यावर दिसतो शाल पांघरलेला शाळा मास्तर सत्यप्रकाश (जितेंद्र).

‘चितचोर’मध्ये (1975) अशाच निसर्गाच्या कुशीत वसलेलं एक चिमुकलं टुमदार गाव आहे, जिथे इंजिनीअर विनोद (अमोल पालेकर) येतो आणि तिथलं सौंदर्य बघून हरखून जातो. सहज त्याच्या तोंडातून येसुदासच्या आवाजात रवींद्र जैनचे शब्द येतात. ‘गोरी तेरा गांव बडा प्यारा’. सोप्या चालीचं हे गाणं त्या काळी अतिशय लोकप्रिय झालं होतं किंवा ‘बेमिसाल’ (1982) चित्रपटात कश्मीरमध्ये कविताबरोबर (राखी) फिरायला गेलेले दोघे डॉक्टर मित्र सुधीर (अमिताभ बच्चन) आणि प्रशांत (विनोद मेहरा) तिथल्या निसर्गाच्या प्रेमात पडतात. गीतकार आनंद बक्षी-संगीतकार आर.डी. बर्मन आणि गायक लता-किशोर-सुरेश वाडकर यांचं ‘कितनी खूबसूरत ये तस्वीर है’ हे गाणं निसर्गरम्य कश्मीरचं चित्र आपल्या डोळ्यांसमोर उभं करतं. देव आनंदच्या ‘इश्क इश्क इश्क’चं (1974) चित्रण नेपाळमध्ये झालं होतं. ‘वल्लाह क्या नजारा है, मौसम बडा प्यारा है’ या गाण्यातून आपल्याला निसर्गरम्य नेपाळचं धावत दर्शन घडतं. ‘जमीर’मध्ये (1974) असंच एक आनंददायी आणि उल्हसित करणारं गाणं आहे. साहिर-सपन पावर्ती-किशोर कुमारचं ’फुलों के डेरे है, साये घनेरे है’ व पडद्यावर अमिताभ बच्चन.

साडेतीन मुहूर्तांपैकी कार्तिक शुद्ध बलिप्रतिपदा हा दिवस दिवाळी पाडवा म्हणून साजरा केला जातो. सुवासिनीकडून पतीला औक्षण करणं या दिवसाचं महत्त्व आहे. हिंदी चित्रपटात पती-पत्नीच्या नात्यातील पारस्परिक विश्वासाचे मधुर संबंध, गोडवा अनेक गाण्यांतून आला आहे. ‘असली नकली’मधील (1962) ‘तुझे जीवन की डोर से बांध लिया है’ या गाण्यातून देव-साधना यांच्यातील प्रेम आणि भविष्यातील स्वप्नं आपल्या समोर येतात. हसरत जयपुरी-शंकर-जयकिशन-रफी-लता यांची एक अप्रतिम रचना. परस्परांना गुणदोषांसहित सामावून घेण्याची भावना या गीतातून व्यक्त होते. याच आशयाची आणखी दोन गाणी ‘गूंज उठी शेहनाई’ (1959) या एकाच चित्रपटात आहेत. ’तेरे सूर और मेरे गीत’ आणि ‘जीवन मे पिया तेरा साथ रहे’. भरत व्यास यांचे चपखल शब्द, वसंत देसाईंचं मधुर संगीत. त्याला जोड रफी-लता यांच्या स्वर्गीय गायकीची. पती-पत्नीच्या तलम नात्याचा आणि त्यांच्या भविष्यातील स्वप्नांचा उज्ज्वल आविष्कार व्यक्त करणारी ’तेरे मेरे सपने’मधली (1971) पुढील दोन गाणी… ‘हे मैंने कसम ली’ आणि ’जीवन कि बगिया मेहकेगी’. कवी आणि गीतकार गोपालदास ‘नीरज’ यांच्या अभिव्यक्तीला संगीत साज सचिन देव बर्मन यांचा आणि पडद्यावरील देव आनंद-मुमताजला उपयुक्त असा आवाज किशोर-लताचा. ‘जीवन कि बगीया’मध्ये संतूर वादन, इंदिवर यांच्या ‘आनंद आश्रम’ (1977) चित्रपटातील ‘सारा प्यार तुम्हारा मैने बांध लिया है आंचल मे’ या प्रेमविभोर कौटुंबिक गाण्यात दिसतात.

संसाराच्या वेलीवर येणाऱया एक फुलाचं आगमन अमरेश (उत्तम कुमार) -आशा (शर्मिला टागोर) या जोडप्याला सुखावून जातं. पूर्व बंगाल येथे खजुरापासून गूळ बनविणाऱयांच्यावर एक चित्रपट आला होता ‘सौदागर’ (1977). त्यात लताजींनी गायलेले रवींद्र जैन यांचं अतिशय श्रवणीय गाणं ‘तेरा मेरा साथ रहे’. पती -पत्नीच्या नात्याचं सूत्र कसलेली अभिनेत्री नूतनने पडद्यावर भावपूर्ण रीतीने व्यक्त केलं आहे. एरवी जरी रक्षाबंधनाला महत्त्व असलं तरी अनेक भागांत भाऊ आणि बहिणीच्या प्रेमाचं प्रतीक भाऊबीज साजरी केली जाते. ‘हरे रामा हरे कृष्णा’मधील (1970) ‘फुलों का तारों का सबका कहना है’, अमिताभ-फरिदा जलालवर चित्रित ‘मजबूर’ (1974) यातलं भावविभोर करणारं ‘देख सकता हूँ मै कुछ भी होते हुए’ आणि ‘रेशम की डोरी’मधलं (1974) ’बहना ने भाई कि कलाई से प्यार बांधा है’ ही काही ठळक गाणी.

कौटुंबिक सोहळ्याचा गाण्याकरिता उपयोग आपल्या कल्पक चित्रकर्मींनी केला. ‘हम’मध्ये (1991) सर्वजण ‘एक दुसरे से करते है प्यार हम’ गाण्यातून एकत्र कुटुंबाची शक्ती प्रदर्शित करतात. ‘बडे दिलवाला’मध्ये (1983) ‘जीवन के दिन छोटे सही’ हे घरगुती पार्टी गाणं. ‘साजन बिना सुहागन’मध्ये (1978) ‘जिजाजी जिजाजी होनेवाले जिजाजी’ हे कौटुंबिक छेडछाड असलेलं लोकप्रिय गाणं. राजश्रीचा त्या काळचा लोकप्रिय चित्रपट ‘दुल्हन वही जो पिया मन भाये’ (1977), ज्यात नवतारका रामेश्वरी पुढे आली. त्यात प्रेम किशन-शामली यांच्यावर चित्रित ‘खुशीया ही खुशीया हो’ आणि ‘बातों बातों मे’मधलं (1979) ‘उठे सबके कदम’ या गाण्यातलं व्हायोलिन वादन एक पर्वणीच. ‘सत्ते पे सत्ता’मधलं सात भावांनी गायलेलं जबरदस्त ऊर्जेचं ‘जिंदगी मिलके बिताएंगे’. ही सर्व गाणी म्हणजे आनंदोत्सव साजरा करणारी आणि आपले पाय थिरकवायला लावणारी.

दिवाळी सांस्कृतिक,आध्यात्मिक आणि आधुनिक धाग्यांनी विणलेली एक तेजस्वी झालर आहे. ती सीमा ओलांडून जगभर ऐक्य, आशा आणि आनंदाचा तेजस्वी संदेश पसरवते. काळोखावर मात करणे, कौटुंबिक बंधने आत्मसात करणे आणि समकालीन संवेदनांशी जुळवून घेत औदार्य जोपासणे हे सणाचे सार आहे. दिवाळी साजरी करत असताना आपण परंपरेचा सन्मान करतो, बदल स्वीकारतो आणि पुढच्या पिढय़ांसाठी प्रबोधन आणि एकत्रतेची भावना पुढे नेतो. आज अनेक ठिकाणी अनिश्चितता आहे. वातावरण बदलामुळे नैसर्गिक आपत्ती अधिक जलद गतीने थैमान घालत आहेत. काहीशा विषण्ण वातावरणात आपण प्रार्थना करू या. या दिवाळीच्या निमित्ताने ईश्वर आपल्याला यातून मार्ग काढण्याची सद्बुद्धी देईल. अशा वेळी आपसूक आठवतं ‘बावर्ची’मधली (1970) सर्व कलाकारांनी गायलेली ‘भोर आयी, गया अंधियारा’ ही सकारात्मक उषकालाची नांदी. आपण आशा करूया की, ‘वो सुबह कभी तो आयेगी’.
[email protected]
(लेखक संगीत अभ्यासक आहेत)