प्लेलिस्ट – सून ले तू दिल की सदा…

>> हर्षवर्धन दातार

सून, सुना, सुनिये, सुनाती अशा अनेक शब्द आणि आशय प्रयोगांवर आपल्या चित्रपटातून असंख्य गाणी आहेत. हे केवळ शब्दप्रयोग नाहीत तर ती त्यातला गर्भित अर्थ ऐकायला लावणारी रचनाच असते. या रचना गाणी बोलकी करतात. अशा बोलक्या गाण्यांचा हा सांगीतिक प्रवास.

हृषीकेश मुखर्जी यांच्या ‘आनंद’ (1970) चित्रपटात एक ‘बोलकं’ दृश्य आहे. सुमन वहिनी (सीमा देव) आपला आनंद भैय्या बरा व्हावा म्हणून मौनी बाबांकडे (ब्रह्म भारद्वाज) घेऊन जाते. मौनी बाबांनी आजन्म मौनव्रत घेतलेले असते. ते फक्त ‘ऐकतात’ आणि भक्तांच्या समस्यांवर निवारण संदेश एका पाटीवर लिहून देतात. आनंद त्यांच्याकडे आशीर्वाद मागतो की ‘मला खूप बोलायचे आहे, आणि चांगले बोलायचे आहे. माझ्या तोंडून चुकूनही अपशब्द निघू नये.’

आपल्या दैनंदिन जीवनातले काही ‘बोलके’ प्रसंग बघूया. नुकताच समाजमाध्यमावर एक मनोरंजक फोटो दिसला. झाडाच्या फांदीवर पक्ष्याचं एक जोडपं वेगवेगळय़ा भावमुद्रेत बसले आहे. त्यातला एक ‘बोलत’ आहे आणि दुसरा ‘ऐकत’ आहे. स्वाभाविक प्रश्न असा आहे की, यातला ‘पती’ कोण आणि ‘पत्नी’ कोण! आणि अनुभवी वाचकांना उत्तर अर्थातच माहीत असेल. तर सांगायचा मुद्दा असा हल्ली ‘वक्ते’ जास्त आणि ‘श्रोते’ कमी झाले आहेत. या स्थितीला बहुधा दोन कारणे असावीत. एकतर फक्त बोलणारा (री) आपल्या आवाजाच्या प्रेमात असेल किंवा त्या (ती) ला असे वाटत असेल की आपले मुद्दे विसरायच्या आत बोलून मोकळे व्हावे. आज आभासी श्रवणातून अर्थात या लेखातून ‘ऐकूया’ आपल्या चित्रपटातून ‘सूनना’ अर्थात ‘ऐकणे’ हा शब्दप्रयोग आणि आशय असलेल्या काही निवडक गाण्यांबद्दल.

प्रसिद्ध हिंदी कवी आणि गीतकार पंडित नरेंद्र शर्मा यांनी लिहिलेले लोकप्रिय भजन ‘बिनती सुनिये नाथ हमारी’ चोप्राच्या महाभारत (1988-1990) या लोकप्रिय दूरदर्शन मालिकेत पार्श्वभूमी स्कोअरचा भाग म्हणून वापरले गेले होते. त्या भागांतील कथानकाच्या संदर्भात, या गाण्याने विदर्भातील राजकुमारी रुक्मिणीच्या श्रीकृष्णाला लिहिलेल्या पत्रातील मजकुराची माहिती प्रेक्षकांना देण्याच्या उद्देशाने पूर्ण केली होती, जी पूर्वीने तिला जबरदस्तीने केलेल्या विवाहापासून वाचवण्यासाठी परमेश्वराला विनंती करून लिहिले होते. हे गाणे पंडित नरेंद्र शर्मा यांच्या शेवटच्या काव्यात्मक कृतींपैकी एक आहे, जे शुद्ध हिंदी भाषेतील तेजस्वी अर्थपूर्ण आणि सूचक पराक्रम प्रदर्शित करते. उमेदवारीच्या काळात साधना सरगम हीची भावोत्कट प्रस्तुती. संगीतकार राजकमल यांच्याच ‘चश्मेबद्दूर’ (1981) चित्रपटातील ‘कहांसे आये बदरा’ या गाण्याची आठवण होते.

लहान मुलं रुसली तर त्यांना हसवण्याचे काही उपाय आहेत. त्यांना कविता, गाणी ऐकवणे किंवा गोष्ट सांगणे. सीमा (1955) मध्ये सौंदर्य आणि अभिव्यक्तीचा उत्कृष्ट मिलाफ असलेल्या नूतनवर चित्रित ‘सुनो छोटीसी गुडिया की लंबी कहानी’ हे लताजींनी गायलेले अतिशय हृदयस्पर्शी गाणं. गाण्यातील उस्ताद अली अकबर खान यांच्या सरोदवादनाने वातावरणाला उदास किनार प्रदान केली आहे. अंताक्षरीत हमखास येणारे ‘रेमामारे- सूनलो सुनाता हूँ तुमको कहानी’ हे अंदाज (1970) आणखीन एक लोकप्रिय बालगीत. शम्मी कपूर मुलांना गोष्ट सांगून हसवतो. गब्बर सिंग ऊर्फ अमजद खान यांनी एक चित्रपट दिग्दर्शित केला होता चोर पोलीस (1982). यात मास्टर बिट्टूच्या वाढदिवशी एक सुंदर पार्टी साँग आहे ‘तुम कहो और हम सुने.’ आपल्या गायकीने वातावरण निर्मिती केली आहे आशा भोसले, सुरेश वाडकर, मन्नाडे आणि मुलांच्या संगोपनात बापाच्या भूमिकेवर काही ओळी ‘दादामुनी’ अर्थात अशोक कुमारांनी म्हटल्या आहेत. संगीत अमजद खानचे अत्यंत आवडते पंचम अर्थात राहुलदेव बर्मनच. सुंदर सात्विक आणि हलकेफुलके चित्रपट म्हणजे ऋषितुल्य हृषीकेश मुखर्जी. घरात शिस्त असावी, पण त्याचा अतिरेक वाईट हा संदेश देणारा ‘खूबसूरत’ (1980). लग्न ठरलेल्या बहिणीबरोबर रेखाच खोडकर ‘सून सून दीदी तेरे लिये रिश्ता आया है’ या गाण्याची आशाताईं&नी धमाल उडवून दिली आहे.

प्रेमाच्या अभिव्यक्तीत प्रत्यक्ष ‘ते’ शब्द अतिशय महत्त्वाचे असतात. प्रियकर आणि प्रेयसी जे शब्द ‘ऐकायला’ आतूर असतात ते ‘बोलायला’ मात्र खूप वेळ लावतात, एकमेकांच्या संयमाची (आणि प्रेक्षकांच्या सुद्धा) परीक्षा बघतात. महाचोर (1976) यात राजेश खन्ना नीतू सिंगला सारखं सांगत असतो ‘मैने नही सुना जरा जोर से कहो’ आणि नीतू सिंगसुद्धा ओरडून उत्तर देते ‘मैं तुमसे प्यार करती हूँ.’ पावसाळी पार्श्वभूमीवर किशोर आणि लताचे ‘आऊटडोअर’ आणि खुले आवाज गीताच्या अर्थाला आणि आशयाला पूरक ठरतात. किशोर आणि आशा भोसले या द्वयीचे असेच खुले आवाज लागले आहेत ‘इन्कार’ (1977) या थरारक चित्रपटातील ‘छोडो ये निगाहो का इशारा’ या मजरूह-राजेश रोशन जोडीच्या गाण्यात. ‘सुनलो फिर हमारी जुबां से, के हमको तुमसे प्यार है’ असे म्हणत गीता चौधरी (विद्या सिन्हा) ही इन्स्पेक्टर अमरनाथ गिलला होकार देते. याच राजेश रोशननी संगीत दिलेल्या बासू चॅटर्जी यांच्या ‘बातो बातो में’ (1979) मध्ये अमोल पालेकर आणि टीना मुनीम आपल्या प्रेमाची कबुली देतात ‘कहीये-सुनीये’ या गीतकार योगेश गौड यांच्या शब्दातून. या पार्श्वगीतातून आणि चित्रपटामध्ये त्यावेळच्या मुंबईचे दैनंदिन जीवन विशेषत लोकल प्रवास सुंदर दर्शवला आहे.

याच आशयाचे काही वेगळे विचार चित्रकर्मी आणि गीतकार गुलजार आपल्या गाण्यातून व्यक्त करतात. बालविवाहावर आधारित ‘खुशबू’ (1975) एक नितांत सुंदर चित्रपट. त्या काळच्या रूढीनुसार कुसुम (हेमा मालिनी) आणि वृंदावन (जितेंद्र) यांचा लहानपणी बालविवाह झाला. पुढे परिस्थितीमुळे दोघांच्या वाटा विभक्त होतात. तरीही वृंदावनला कुसुम नेहमीच आपला पती मानते आणि आपली बिदाई होईल, आपण सासरी जाऊ या कल्पनाविश्वात रमते. ‘घर जायेगी’ या गाण्यात ‘तुने मेरा नाम कभी आँखो से बुलाया नही, मैंने जाने कैसे सुना था’ ओळीतून गुलजार या दोघांचे अव्यक्त प्रेम दर्शवतात. असाच अतर्क्य विचार गुलजार ‘मौसम’ (1975) मधील ‘दिल ढुंडता है’ या फ्लॅशबॅक गाण्यातील ‘बर्फीली सर्दीयो में किसी भी पहाड पर, वादी मी गुंजती हुयी खामोशिया सुने’ या ओळीतून व्यक्त करतात. शांतता श्रवण करता येते, ऐकता येते हा तो वेगळा विचार.

सून, सुना, सुनिये, सुनाती अशा अनेक शब्द आणि आशय प्रयोगांवर आपल्या चित्रपटातून असंख्य गाणी आहेत. लेखाच्या पुढील भागात ‘ऐकूया’, माफ करा, जाणून घेऊया आणखीन बऱयाच अशा ‘बोलक्या’ गाण्यांबद्दल.

z [email protected]
(लेखक संगीत अभ्यासक आहेत.)