
>> डॉ. अमित पांजा, फिजिओथेरेपी प्रमुख (अलाईड डॉक्टर्स हाऊस)
नियमित व्यायामाने आजारांपासून दूर राहणे शक्य होते. शारीरिक, मानसिक आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतो. जर आपले शरीर निरोगी रहावे असे वाटत असेल तर व्यायामाशिवाय पर्याय नाही.
बैठी जीवनशैली तसेच व्यायामाच्या अभावामुळे हल्ली लठ्ठपणा ही एक मोठी समस्या बनली आहे. एखाद्या व्यक्तीचे वजन वाढले की, त्या व्यक्तीला सहजरीत्या आजार बळावू शकतात. व्यायामामुळे आपल्या शरीरातील अतिरिक्त चरबी कमी करण्यास मदत होते. त्यामुळे आपले वजन कमी होण्यास मदत होते. वेगाने चालणे, झुंबा, एरोबिक्स यांमुळे लवकर पॅलरीज बर्न होऊन वजन कमी होण्यास मदत मिळते.
हाडांची मजबुती
व्यायामामुळे हाडे मजबूत होतात आणि स्नायू बळकट होतात. प्रशिक्षकांच्या मदतीने वेट ट्रेनिंग घेतल्यास तुमच्या हाडांवर आणि स्नायूंवर चांगला ताण येतो आणि त्यांच्या बळकटीकरणास फायदा होतो. वयोमानानुसार शारीरिक हालचालींवर मर्यादा येतात. व्यायामामुळे तुमच्या शरीरातील बोन डेन्सिटी वाढते. खेळाडूंना हाडे मजबूत राहण्यासाठी व्यायाम करणे खूप गरजेचे असते.
आजारांपासून सुटका
मधुमेह, रक्तदाब, लठ्ठपणा, गुडघेदुखीसारख्या आजारांचे प्रमाण वाढले आहे, परंतु हे शरीरासाठी चांगले नाहीत. या आजारांपासून मुक्तता मिळवायची असेल तर त्यासाठी व्यायाम हाच एक उपाय आहे. यासोबतच अपचन, संधीवात यांसारखे आजारदेखील दूर होण्यास मदत होते. व्यायामामुळे चयापचय क्रिया सुरळीत होण्यास मदत होते. आपल्या फुप्फुसाची क्षमता वाढते. त्यामुळे नियमित व्यायाम केल्याने शारीरिक तसेच मानसिक आजार दूर ठेवता येतात.
निरोगी हृदयासाठी
नियमित व्यायामाची सवय हृदयविकाराचा धोका कमी करू शकते. व्यायामामुळे हृदय मजबुत राहण्यास मदत होते. रक्त परिसंचरण सुधारण्यासाठी व्यायाम अत्यंत फायदेशीर आहे. रक्तप्रवाह योग्य प्रमाणात झाल्यामुळे शरीरातील ऑक्सिजनची पातळी चांगली राहते.
मानसिक आरोग्य सुधारते
व्यायामामुळे चिंता, नैराश्य आणि तणाव कमी होण्यास आणि मूड स्विंग्ज दूर होतात आणि झोपेची गुणवत्ता सुधारण्यास मदत होते. व्यायामामुळे शरीराच्या प्रतिमेवर सकारात्मक प्रभाव पडतो. आत्मसन्मान आणि आत्मविश्वास वाढतो.
व्यायामाचे प्रकार कोणते
व्यायाम प्रकारांमध्ये एरोबिक्स, अनेरोबिक, स्ट्रेचिंग आणि बॅलेन्सिंग यांचा समावेश आहे. या चार व्यायाम प्रकारांतर्गत योगा, पोहणे, नाचणे, जिम, वेगाने चालणे, धावणे अशा व्यायामांचा समावेश होतो.
वाढते प्रदूषण, बदलती जीवन पद्धती या सर्वांमध्ये शरीराला आजारापासून दूर ठेवायचे असल्यास दररोज व्यायाम करणे महत्त्वाचे आहे. नियमितपणे व्यायाम करणाऱयांच्या शरीरातील चयापचय क्रिया उत्तम चालत असते आणि त्यामुळेच त्यांची ऊर्जा पातळी चांगली राहते.
व्यायामाचे नियम कोणते
- रिकाम्यापोटी व्यायाम करणे उत्तम.
- खाल्ल्यानंतर लगेच व्यायाम करू नये.
- उन्हाळय़ात व्यायामाचे प्रमाण कमी असावे, तर थंडीमध्ये व्यायामाचे प्रमाण वाढवलेले चालते.
- झोप झाली नसल्यास, थकवा वाटत असल्यास, आजारी असल्यास, दीर्घ आजारानंतर लगेच, रक्तस्राव वा मूत्रदोषाचा त्रास होत असल्यास, श्वसनाला त्रास होत असल्यास व्यायाम टाळणे उत्तम ठरते.
- कोणत्याही व्यायामाला सुरुवात करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घेणे गरजेचे आहे. त्यामुळे व्यायामाचे सर्वांगीण फायदे उपभोगता येतात.