ठसा – सीताराम भोतमांगे

>> महेश उपदेव

राज्यात डझनभराच्या वर आंतरराष्ट्रीय आणि शंभरपेक्षा जास्त राष्ट्रीय हँडबॉल खेळाडू घडविणारे राज्याच्या उपराजधानीतील हँडबॉलचे पितामह म्हणून ओळखले जाणारे 89 वर्षीय सीताराम भोतमांगे सरांचे नुकतेच निधन झाले. त्यांचे खेळाडू घडविण्याचे काम अहोरात्र सुरू होते. महाराष्ट्राची शान असलेले भोतमांगे सर राज्याच्या क्रीडा विभागातर्फे देण्यात येणाऱया जीवनगौरव पुरस्कारापासून शेवटी वंचितच राहिले. त्यांना जिवंतपणी राज्य सरकारने जीवनव्रती पुरस्कार देऊन गौरवावे अशी नागपूरच्या खेळाडूंची इच्छा होती. आता त्यांना मरणोत्तर पुरस्कार देऊन राज्य सरकारने अभिवादन करावे. प्रामाणिकपणे कष्ट करून खेळाडू घडविणारे सीताराम भोतमांगे सरांना दादोजी कोंडदेव पुरस्कारापासूनही 1996मध्ये वंचित ठेवण्यात आले होते. मी स्वतः हा विषय त्यातून धरला होता आणि 1993-94चा दादोजी कोंडदेव पुरस्कार मिळवून दिला होता. पहिला दादोजी कोंडदेव पुरस्कार नागपूरचे नामांकित ऍथलीट प्रशिक्षक भाऊ काणे यांना मिळाला होता. सीताराम भोतमांगे यांना मिळालेला दादोजी कोंडदेव हा दुसरा पुरस्कार होता. गेल्या 5 दशकांपासून खेळ आणि खेळाडूंची निःस्वार्थपणे सेवा करणारे भोतमांगे सरांनी राजकुमार नायडू, रूपकुमार नायडू, नरेंद्रसिंग सग्गु, अत्तु ऊर्फ आत्माराम पांडे, वीरेंद्र भंडारकर गजानन जाधव, डॉ. राजन वेणूकर, धनंजय वेणूकर, विपीन कामदार मिलिंद माकडे, अतुल दुरुगकर, मुरली नंबियार, सुनील भोतमांगे, संजय भोतमांगे, बाबा देशमुख, इंदरजितसिंग रंधावा, लता मुदलियार, संजीवनी चांद्रायण, विद्या किणी, मंगला मानापुरे, जया मानापुरे, निवेदिता मेहता, अनिता हलमारे, भावना किंमतकर, ललिता अवचट, पूनम कडव यांच्यासह आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय खेळाडू घडविले. या खेळाडूंनी महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करून राज्याचे नाव मोठे केले. एवढेच नाही तर भोतमांगे सरांनी हँडबॉलचे राष्ट्रीय प्रशिक्षकही तयार केले आहेत. त्यात बाबा देशमुख, भाऊ धुमाळ, पवन मेश्राम, आशिष बॅनर्जी, मदन टापरे यांचा समावेश आहे. हे प्रशिक्षक राज्यात विविध ठिकाणी खेळाडू घडविण्याचे काम करीत आहेत. 1971 पासून यशवंत स्टेडिअममध्ये हँडबॉल खेळाडू घडविण्याचे काम सीताराम भोतमांगे सर करीत होते. ते उत्कृष्ट कुस्तीगीर होते. त्यांचे मार्गदर्शन मल्लांना होत होते, ध्येयवेडे गुरू म्हणून त्यांच्याकडे बघितले गेले. त्यांच्या तालमीत तयार झालेल्या हँडबॉलपटूनी चीन, जर्मनी, हाँगकाँग, फिलिपाइन्स, इराण, नेपाळमध्ये झालेल्या आशियायी, राष्ट्रकुलसह विविध स्पर्धांमध्ये महाराष्ट्राचा झेंडा फडकविला आहे. भोतमांगे यांनी घडविलेले खेळाडू राज्यात विविध खात्यांमध्ये मोठय़ा हुद्दय़ांवर नोकरी करीत आहेत. माजी कुलगुरू डॉ. राजन वेलूकर हेदेखील भोतमांगे यांचे शिष्य आहेत. महाराष्ट्रात सर्वाधिक जास्त छत्रपती पुरस्कार भोतमांगे सरांच्या खेळाडूंना मिळाले आहेत. भोतमांगे सरांचे संपूर्ण कुटुंबच हँडबॉल खेळाला समर्पित झालेले आहे. या कुटुंबातील 9 जणांनी मैदान गाजविले आहे. भोतमांगे सरांचा मुलगा डॉ. सुनील, संजय, मुलगी नंदिनी यांनी हँडबॉल खेळाडू म्हणून आपली ओळख निर्माण केली असून सरांच्या स्नुषा अनिता हलमारे, भावना किंमतकर या पण हँडबॉलच्या राष्ट्रीय खेळाडू आहेत. आता तिसरी पिढीही हाच वारसा जपत आहे. भोतमांगे सरांच्या नाती साक्षी, मोनिका, राधिका राष्ट्रीय हँडबॉलपटू म्हणून मैदान गाजवत आहेत. हँडबॉल खेळाला राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय नकाशात नेण्यात या परिवाराचे मोठे योगदान आहे. भोतमांगे सर कधी हँडबॉल खेळले नाहीत, मात्र त्यांनी प्रशिक्षक म्हणून शेकडो खेळाडू घडविले. पुरस्काराच्या बाबतीत भोतमांगे सरांचे कुटुंब नशीबवान आहे. भोतमांगे सरांना उत्कृष्ट प्रशिक्षकाचा दादोजी कोंडदेव पुरस्कार मिळाला आहे. त्यांच्या कुटुंबातील तीन सदस्यांना राज्य सरकारने शिवछत्रपती पुरस्कार प्रदान करून सन्मानित केले आहे. त्यात डॉ. सुनील भोतमांगे, अनिता भोतमांगे, भावना भोतमांगे यांचा समावेश आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक शिवछत्रपती पुरस्कार भोतमांगे सरांनी घडविलेल्या खेळाडूंना मिळाले आहेत. हँडबॉलचे भीष्मपितामह सीताराम भोतमांगे सरांचे योगदान अविस्मरणीय राहील.