ठसा – प्रतापसिंग बोदडे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> पंजाबराव मोरे

दलितोद्धारक घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या निर्वाणानंतरच्या 7 दशकांत जगात सर्वाधिक गीतलेखन झाले किंबहुना ते सुरूच आहे. या साऱ्याच कवी-गायकांना बाबासाहेब वेगवेगळ्या रूपात दिसले तसे त्यांनी ते मांडले, मात्र या सर्व गीतकारांमध्ये महाकवी वामनदादा कर्डक यांच्या लेखणीतून खऱ्या अर्थाने आंबेडकरी चळवळ, त्यांचा बाणा तळागाळातील समाजापर्यंत पोहचविला. त्यांचीच सावली होऊन अनेकांनी आंबेडकरी गीतलेखन केले, मात्र ‘भीमामुळे माणूस माणसात आला, सांगा खरं हाय का नाय’, ‘माझ्या अस्थीवरी फुलत्या फुलांची बाग राहावी, त्याच बागेची फुले सकाळी भीमाला वाहावी’, ‘जयभीम बोलताच अंतिम माझा श्वास सुटावा, प्रतापसिंगा अंत्ययात्रा गाता गाता निघावी’, अशी उदात्त भीमगीते लिहून ‘दोनच राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर, एक त्या रायगडावर, एक चवदार तळ्यावर’ असा सामाजिक बंधूभाव पेरणाऱ्या प्रगल्भ कवी प्रतापसिंग बोदडे यांनी वयाच्या 73 व्या वर्षी जगाचा निरोप घेतला.

जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यातील बामणोद येथे 22 जून 1949 साली त्यांचा जन्म झाला, जलसाकार बालचंद बोदडे यांचे ते चिरंजीव. मुक्ताईनगर येथेच त्यांनी आपले शालेय शिक्षण पूर्ण केले. 1968 मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या मिलिंद महाविद्यालयात त्यांनी प्रवेश घेतला. तेथून बी.ए. आणि मराठवाडा विद्यापीठातून एम.ए. इंग्रजीचे शिक्षण घेतलेल्या प्रतापसिंगांचे इंग्रजी, हिंदी व उर्दू भाषांवर विशेष प्रभुत्व होते. याच महाविद्यालयात शिक्षण घेत असताना आक्रमक दलित पँथर संघटनेचे गंगाधर गाडे, माधवराव बोर्डे, दौलतराव मोरे या सहकाऱ्यांसोबत ते सामाजिक चळवळीत रमले. शिक्षण घेत असतानाच गीतलेखन आणि गायनास सुरुवात केली. नागसेनवनातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात एका कार्यक्रमात वामनदादांना कोरस करण्यासाठी इतर विद्यार्थ्यांसोबत प्रतापसिंगही बसले. थोडा विराम हवा म्हणून वामनदादांनी ‘मुलांनो, तुमच्यापैकी कुणी गातंय का?’ असे विचारले असता प्रतापसिंग यांनी गीत गायले. ते दादांना फार आवडले. त्यांनी प्रतापसिंगांना आणखी एक गीत गायला लावले. तिथेच ते कामनदादांच्या सान्निध्यात आले. त्यानंतर वामनदादांसोबत अनेकदा कोरस करताना प्रतापसिंग यांनी गीत गाऊन आपली ओळख निर्माण केली. त्यातूनच या गुरू-शिष्याचे नाते घट्ट झाले. महाराष्ट्रासह देशभर वामनदादांचा शिष्यवर्ग प्रतापसिंग यांना त्यांचा वारसदार समजू लागला. त्यातच बुलढाणा येथील गवई-मिसाळ यांच्या संचावर दादांचा मोठा जीव होता. ते बुलढाण्यापासून जवळच असलेल्या भादोला आणि बुलढाण्यात डी. आर. इंगळे यांच्याकडे महिनोमहिने राहत असत. त्या काळात त्यांच्यासोबत कोरस करण्याचा योग आला. लोणार येथील जिल्हा परिषदेच्या श्रोत्यांनी खच्चून भरलेल्या मैदानात प्रतापसिंगांनी गायलेल्या वामनदादांच्या ‘पाणी वाढ गं माय…’ या गीताने कोरस करणाऱ्या आमच्यासहित सर्वांच्या डोळय़ांत पाणी आले अशी त्यांची गायकी होती.

उर्दू व हिंदीत सादरीकरण करण्याच्या विशेष शैलीने रचलेल्या कव्वाल्या सुंदर पद्धतीने सादर करत असल्याने त्यांना ‘बब्बू कव्वाल’ म्हणून ओळखले जाऊ लागले. प्रल्हाद शिंदे आणि प्रतापसिंग यांचे रंगलेले सामने पुण्यातील खडकी येथील रसिकांच्या विशेष लक्षात राहिले. त्याच कार्यक्रमात प्रल्हाद शिंदे यांनी तबला व प्रतापसिंग यांनी सूरपेटी वाजवत प्रतापसिंग यांचे चिरंजीव कुणाल यांना गायला लावले होते. कव्वालीच्या क्षेत्रात अल्ताफ राजा यांची आई राणी रूपलता, अब्दुल रऊफ चाउैस, अजिज शादा यांच्यासोबत त्यांनी कव्वालीचे सामने गाजवले होते. शकुंतला कांबळे यांनी गायलेले ‘भीमराज की बेटी’ हे गीत तर सातासमुद्रापार गेले. कलावंतांनी स्थापन केलेल्या परिवर्तन कला मंचाचे प्रतापसिंग हे उपाध्यक्ष होते. मुंबईतील तेव्हाच्या व्हीटी स्टेशनवरील त्यांचे कार्यालय म्हणजे कलाकारांचे हक्काचे घर होते. रेल्वे खात्यातून मुख्य सामग्री निरीक्षक पदावरून निवृत्त झाल्यानंतर मुक्ताईनगर या आपल्या मूळगावी ते स्थिरावले. वयाचा त्यांच्यावर कधीच परिणाम जाणवला नाही. प्रबोधनासाठी खेडे-पाडे, तांडे, वाड्या-वस्त्यांवर उपाशी-तापाशी प्रबोधनाचा कसा घेऊन रात्रंदिवस गात असत. हाती लेखणी असली की, कागदाच्या चिटोऱ्यावर गीत लिहित आणि त्या शब्दांना सुरांत गुंफून गुणगुणू लागत.

प्रतापसिंगांनी आजवर सुमारे 7 हजारांवर भीमगीतांची रचना केली. त्यांनी लिहिलेली गीते शंकर महादेवन, आनंद शिंदे, मिलिंद शिंदे, प्रकाशनाथ पाटणकर, नागसेन सावदेकर, शकुंतला कांबळे, उत्तरा केळकर यांच्यासह हजारो गायकांनी गायली. ‘भीमराज की बेटी’, ‘दोनच राजे इथे गाजले’, ‘गुलामी का टूट गया जाल’, ‘जयभीम काला साहेब माझा’, ‘नकली जयभीम करणारे ओळखा’, ‘तुझ्या पाऊलखुणा भीमराया’, ‘भीमासम दाखवा आता माईचा लाल कुणी’, ‘हा जखमी देह आज मी बुद्धास वाहिला, माझाच पुनर्जन्म मी डोळय़ाने पाहिला’ अशी अनेक गीते अजरामर झाली. त्यांनी लिहिलेली हजारो भीमगीते, कव्वाल्या अनेक गायकांच्या जगण्याला समृद्ध करत राहिल्या. त्यांची ही भीमगीते भीमरथाला पुढे नेणाऱयांची समर्थ साथ देतील, यात शंका नाही.