मेणवलीची धारेची यात्रा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> प्रणव पाटील

मेणवलीची अमृतेश्वर, मेणेश्वर मंदिर ही शिल्पसुंदर मंदिरं आणि नाना फडणवीसांचा वाडा जितका प्रसिद्ध तितकीच इथली वाघजाईची यात्रा आणि धारेचा कार्यक्रम पंचक्रोशीतच नव्हे तर अवघ्या महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे .

महाबळेश्वराचा उभा डोंगर धावत येणारी कृष्णा नदी जिथे आपल्या प्रवाहाची दिशा दक्षिणेला वळवते ते मेणवली मराठय़ांच्या इतिहासात प्रसिद्ध आहे. या वळणावरच नाना फडणवीसांनी अतिशय सुंदर रेखीव चंद्राकृती घाट बांधून काठावर अमृतेश्वर मंदिर आणि मेणेश्वर मंदिरं वसवली. या मंदिराच्या घाटाला लागूनच असलेला त्यांचा तटबंदीयुक्त वाडा मेणवलीचं महत्त्वाचं आकर्षण ठरतो.

नाना फडणवीसांचा वाडा म्हणजे मराठेकालीन स्थापत्याचा उत्कृष्ट नमुनाच. या वाडय़ाचे खास आकर्षण म्हणजे या वाडय़ाच्या भिंतींवर असणारी भित्तीचित्रे. वाडयामधे नानांचा शिसवीच्या लाकडातील पलंग पहावयास मिळतो. वाडय़ातील घाटाकडे उघडणाऱया खिडक्यांमधून कृष्णेच्या काठावर हिरवाईत गोंदलेल्या घाटाचं चित्र डोळ्याचं पारणं फिटावे असेच आहे. घाटावर असणारे अमृतेश्वराचे मंदिर वैशिष्टय़पूर्ण गाभाऱयाचे आहे. या गाभार्यात आपल्याला पायऱया उतरुन जावं लागतं. मंदिरासमोर असणाऱया नंदी मंडपामधे पोर्तुगिज घंटा असून या घंटेवर 1706 सालाचा उल्लेख व येशू आणि मेरीचे उठावदार शिल्प आहे.

मेणवलीचे हे शिल्पसुंदर मंदिर आणि वाडा आपण कधीही पाहू शकतो परंतु मेणवलीची माघ पौर्णिमेच्या दिवशी भरणारी वाघजाई देवी या ग्रामदेवतेची यात्रा आणि या यात्रेच्या दुसर्या दिवशी होणारा धारेचा कार्यक्रम हा पंचक्रोशीतच नव्हे तर अवघ्या महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे .

मेणवली गाव धोम इथे असणारी धौम्य ऋषींची समाधी आणि नरसिंह मंदिर तर दुसरीकडे दक्षिणकाशी म्हणून प्रसिध्द असणारी वाई आणि पांडवगड या मधे वसलेलं साधारण पाच एक हजार लोकसंख्येचं गाव. गावात बहुतांश लोकांचं आडनाव चौधरी आहे .मेणेश्वराच्या मंदिरामुळेच गावास मेणवली हे नाव पडले असावे. परंतु जिथे आज मेणवली गाव आहे तिथे पूर्वी हे गाव नव्हतं. पूर्वी या गावचे मूळ ठिकाण पांडवगडाच्या पायथ्याशी होते. तिथेच वाघजाई देवीचे मंदिर होते. आज जे वाघजाई मंदिर दिसते ते नंतरच्या काळात बांधलेले आहे. मंदिरामध्ये असणार्या भल्या मोठय़ा शिळेवर सात देवींचे कोरीव मुखवटे आहेत. पूर्वी या देवींची सप्तमातृका किंवा साती आसरा म्हणून पूजा होत असावी. यातील सात देवींची नावे अनुक्रमे काळूबाई, वाघेश्वरी, नवलाई, कमळजाई, पांडजाई, मुकाई व वरदायनी अशी आहेत. यांच्या बरोबरीनेच वाघावर आरुढ झालेली वाघजाई ही ग्रामदेवता आहे.

माघ पौर्णिमेला देवीपुढे बगाडाचा कार्यक्रम होतो. बगाडाचा मान हा चौधरी मंडळींकडे आहे. हे बगाड पूर्वी कमळजाई शिवारातून आणले जात असे परंतु आज ते स्थिर स्वरुपात आहे. बगाडाच्या कार्यक्रमानंतर देवीला पालखीत घालून तिच्या मूळ स्थान असणाऱया चिंचखिंड येथे नेण्यात येते. पालखी परतताना पालखीसोबत वेशीतून देवीच्या तलवारीचेही आगमन होते. दुसऱया दिवशी भाविकांच्या साथीने देवीला अभिषेक घालण्यात येतो. त्यानंतर नवस फेडायला आलेले भाविक मंदिराभोवती लोटांगण घालून नवस फेडतात. सूर्य मावळतीच्या वेळेला धारेच्या कार्यक्रमाला सुरुवात होते. हा कार्यक्रम पहायला मंदिर परिसरात अनेक ग्रामस्थ, बाहेरगावी राहणारे परंतु मूळचे मेणवलीचे असणारे बहुसंख्य लोक आणि देवीच्या दर्शनाला नटून आलेल्या सुवासिनी यामुळे मंदिर परिसर खुलून जातो.

धारेच्या कार्यक्रमाबाबत एक दंतकथा सांगण्यात येते. ऋषींना त्रास देणाऱया महिषासुराचा देवीने केलेला वध व त्यानंतर त्याच्या रक्ताचा देवीने गावाभोवाती घातलेला सडा याचे प्रतिरुप धारेच्या कार्यक्रमात पहायला मिळते. या कार्यक्रमात मंदिरासमोर असणाऱया स्मृतिशिळांवर पंचमहाभूतांचे प्रतिक म्हणून पाच मातीचे माठ आंबील भरुन ठेवलेले असतात. यातील मधला मोठा माठ हा आत्म्याचे प्रतिक समजून तलवारीचा मान मिळलेला मानकरी देवीच्या तलवारीने छिद्र पाडतो. यानंतर दुसरा मानकरी हा माठ खांद्यावर घेऊन मंदिराभोवती पळत पळत प्रदक्षिणा मारतो. यावेळी तलवार घेतलेला मानकरीही दुसऱया मानकऱयाच्या मागे पळत जातो. त्यांच्यासोबत अनेक पांढऱया रंगाचा पोषाख घातलेले मानकरी व देव अंगात आलेले लोक पळत असतात. माठ घेऊन पळणार्या मानकर्याच्या माठातील आंबीलासारखे द्रव्य या प्रदक्षिणेच्या वेळी मंदिराभोवती सांडते. यामुळेच याला धारेचा कार्यक्रम म्हटले जाते.

महाराष्ट्रातल्या प्रत्येक देवता, ग्रामदेवता यांच्याबाबतीत वेगवेगळ्या कथा आणि प्रथा दिसून येतात. या प्रथांमध्ये तिथल्या गावगाडय़ाचा सहभाग असतो. या प्रथा, रीतिरिवाज पाळण्याचा सोहळा म्हणजेच त्या त्या गावातील यात्रा. आपलं गाव सुफळ आणि सफल राहावं, सर्व काही मंगलमय व्हावं याच धारणेतून हे उत्सव साजरे केले जातात.
– [email protected]