छोटीशी गोष्ट  – गावाकडची रोजनिशी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> प्रसाद सांडभोर

दहा वाजता पोहोचलो असीन वाटतं. हो. आलो तेव्हा आज्जीनं आधी दारात भाकरी ओवाळून टाकली. दृष्ट काढली. मग नाश्त्याला म्हणून पोह्यांचा चिवडा आणि चहा केला. मग घर दाखवलं – सगळय़ा खोल्या, गच्च्या, परसातली बाग… देवघरातल्या फोटोंची ओळख करून दिली – तिचे आईवडील, सासूसासरे, नानाआजोबा… तिथून परसबागेत गेलो तर सिद्धू आला – त्यांची चंद्री व्याली म्हणून आज्जीला बोलवायला. आज्जीसोबत मी पण गोठय़ात गेलो…

चंद्री गोठय़ाच्या मधोमध बसली होती. तिचं ओलंओलं-काळंचिंब-नवंनवं वासरू तिला चिटकून बसलं होतं. दूध पीत होतं. सिद्धूची आई चंद्रीसमोर चारा वाढत होती. सिद्धू आणि त्याचे मित्रमैत्रिणी नव्या बैलाचं नाव काय ठेवायचं ते ठरवत होते. वासरानं दूध पिणं थांबवलं तसं भूपेशभाऊंनी त्याला उचलून समोरच्या खांबाजवळ ठेवलं. लागलीच सगळय़ा पोरांनी खांबाभोवती कोंडाळं केलं.

वासरू पाय हलवू लागलं. खांबाच्या आधारानं हळूहळू उभं राहायला पाहू लागलं. पण पुढचे पाय ताठ करून मागचे पाय उचलेपर्यंत त्याचे पुढचे पाय दुमडून जायचे आणि आधी मागचे पाय ताठ केले तर पुढचे पाय त्याला उचलताच येत नव्हते! असं पाहून एक मुलगा त्याला हात लावायला गेला तसे भूपेशभाऊ ओरडले – “त्याचं त्याचं उभं राहू देत. नाहीतर कायमचं लंगडं होईल!” ऐकून मुलं एकदम गप्प झाली. टक लावून पाहू लागली. मी पण त्यांच्यात जाऊन बसलो. वासराची धडपड बघण्यात पुढचा तास-दीड तास कसा गेला कळलंच नाही. शेवटी ते मस्त उभं राहून हंबरलं आणि आम्ही टाळय़ा वाजवल्या!
संध्याकाळी सगळेजण तळय़ावर गेलो. सिद्धूनं मला भाकऱया खेळायला शिकवलं. अंधार पडला तसे घरी आलो. नानीआज्जीनं जेवणाचा मोठा बेत केला होता – मासवडय़ा, कटाची आमटी, मसालेभात, शेवयाची खीर… भूपेशभाऊ, वहिनी आणि सिद्धूला जेवायला बोलावलं होतं. त्यांनी येताना चंद्रीचा खरवस सोबत आणला! एकदम मेजवानीच झाली!

जेवायच्या आधी हात पाय धुवायला म्हणून मागच्या मोरीत गेलो तेव्हा लाईट गेली. आज्जीनं भूपेशभाऊंना कंदील घेऊन पाठवलं. ते येईपर्यंत मग तसाच अंधारात उभा राहिलो. सहज म्हणून मागे पाहिलं… परसाच्या कुंपणापलीकडचं निंबाचं झाड पिवळय़ा कणाकणांच्या प्रकाशानं लुकलुकत होतं. त्यापलीकडची चिंच आणि तिच्याशेजारची बाभूळ पण – काही लुकलुकते पिवळे कण एका झाडाहून उडून दुसऱया झाडावर जाऊन चिटकत होते. डोक्यात एकदम प्रकाश पडला – काजवे!
जेवण झाल्यावर कपडे बदलायला आतल्या खोलीत गेलो तर सिद्धू आला – पळत पळत – ‘दादा, दादा’ हाका मारत. मी काय झालं विचारलं तर ‘हात पुढे करा’ म्हणाला. मी हात पुढे केला. त्यानं त्याच्या हाताची बंद मूठ माझ्या हातावर उघडली – एक लुकलुकता पिवळा कण माझ्या हातावर पडला – काजवा! माझ्या तळहातावर!!

इवल्याशा काजव्याच्या मिणमिणत्या प्रकाशानं माझा संपूर्ण हात लुकलुकत होता. त्यात सिद्धूच्या चेहेऱयावरचं हसू पण दिसत होतं. मी पण तसाच काहीसा दिसलो असीन त्याला तेव्हा 🙂 कितीतरी वेळ तसेच उभे होतो आम्ही! काजवासुद्धा हातावर संथ बसून होता. थोडय़ा वेळानंतर मग आम्ही त्याला खिडकीबाहेर सोडलं. उडत उडत एका क्षणात तो बाकी काव्यांमध्ये हरवून गेला.

अंथरून टाकल्यावर पुन्हा एकदा परसात चक्कर मारून आलो आणि काजव्यांनी भरलेली झाडं जशीच्या तशी आठवणीत साठवत झोपी गेलो. कंदिलाच्या प्रकाशात हे लिहायला घेतलं. आठवलं तेवढं, अजून लक्षात राहावं म्हणून. आज्जी विचारतेय – अजून कितीवेळ जागणार?… आठच वाजलेत खरं, पण झोपतो आता. सकाळी शेतावर जायचं ठरलंय. पण त्यासाठी लवकर उठायला हवं…
साभार :