>> प्रसाद ताम्हनकर
लडाख हा आपल्या देशातील एक नितांत सुंदर भाग आहे. सहलीसाठी विशेष चर्चेत असलेला हा भाग निवडणुकांच्या काळातदेखील चर्चेत असतो. मात्र या प्रदेशाविषयी आपल्याला फारशी माहिती नाही आणि रोजच्या चर्चेतदेखील त्याचा विषय नसतो. मात्र सध्या लडाख हा एका खास गोष्टीमुळे चर्चेत आलेला आहे. इथल्या चेवांग नॉर्फेल या नागरिकाने इथल्या स्थानिक शेतकऱयांसाठी चक्क कृत्रिम हिमनदीचे निर्माण केले आहे. त्याच्या या प्रयोगाची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे. शेतकऱयांना संजीवनी देणाऱया या प्रयोगाचे प्रचंड कौतुक होत आहे.
लडाखचे हवामान थंड आणि कोरडे आहे. इथे वर्षाचे सरासरी पर्जन्यमान 86.8 मिलिमीटर आहे. लडाखमधील 80 टक्के शेतकरी हे इथल्या हिमनद्यांपासून मिळणाऱ्या पाण्यावर अवलंबून आहेत. 30 लाख हेक्टर क्षेत्रात पसरलेल्या इथल्या 55 हजार नद्या या पोलर कॅप्सच्या बाहेर मोठय़ा बर्फाच्या ढिगाऱ्याच्या स्वरूपात आहेत. पृथ्वीच्या ध्रुवांना झाकून टाकणाऱया बर्फाच्या क्षेत्राला पोलर कॅप्स म्हटले जाते. मात्र गेल्या 30 वर्षांत इथे हिमवर्षावात मोठय़ा प्रमाणावर घट झाली असून हिमालयाच्या आसपासच्या गावांमध्ये पाण्याचे मोठे संकट उभे ठाकले आहे.
पुढील शतकाच्या अखेरीस हिमालयातील एक तृतीयांश नद्या नष्ट होतील अशी भीती संशोधकांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे सुमारे दीड अब्ज लोकांचे जीवन प्रभावित होणार आहे. हवामान बदलाचा मोठा फटका इथल्या निसर्गाला आणि विशेषत हिमनद्यांना बसतो आहे. या नद्यांच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या 13 कोटी शेतकऱयांचे आयुष्य त्यामुळे टांगणीला लागणार आहे. या संपूर्ण परिसराची अर्थव्यवस्था, पर्यावरण… सर्व काही संकटात सापडत चालले आहे.
चेवांग नॉर्फेल यांना या सर्व परिस्थितीचा अंदाज आल्यानंतर अनेक गावांना त्यांनी भेटी दिल्या. हिमनद्यांचे पाणी इथल्या शेतकऱयांसाठी किती महत्त्वाचे आहे, याचा त्यांना उलगडा झाला. सर्वात मोठी अडचण अशी होती की, इथे बर्फ वितळून हिमनद्यांचे पाणी वाहण्यास जूनमध्ये सुरुवात होते. मात्र इथे पेरणीचा हंगाम हा एप्रिल महिन्यात सुरू होतो. इथे हिवाळादेखील दीर्घकाळ असतो. या सर्व परिस्थितीवर मात करण्यासाठी चेवांग नॉर्फेल यांनी सरळ त्यांच्या नांग या गावात आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने कृत्रिम हिमनदी तयार करण्यात यश मिळवले आहे. या पहिल्या यशानंतर त्यांनी आजूबाजूच्या इतर 10 गावांतदेखील कृत्रिम हिमनद्यांचा प्रयोग यशस्वी करून दाखवला आहे.
आपण पाणी तयार करू शकत नाही. मात्र उपलब्ध संसाधने योग्य प्रमाणात वापरून पाणी साठवू शकतो हे महत्त्वाचे आहे, असे नॉर्फेल म्हणतात. 87 वर्षांच्या नॉर्फेल यांना आपल्या बागेतील नळापासून ही भन्नाट कल्पना सुचली. पाणी वाहते राहावे यासाठी ते आपला पाइप कायम उघडा ठेवत असत. कारण थंडीमुळे बर्फ गोठतो आणि अशा गोठलेल्या बर्फामुळे पाइप फुटण्याचा धोका असतो. मात्र एके दिवशी त्यांना त्यांच्या उघडय़ा पाइपमध्ये एक बर्फाचा तुकडा दिसला. पाइपचा तो भाग सावलीत असल्याने त्याच्यावर थेट सूर्यप्रकाश पडत नव्हता आणि त्यामुळे पाण्याचे गोठून बर्फात रूपांतर झाले होते. वाया जाणारे इतर पाणीदेखील आपण बर्फाच्या स्वरूपात साठवू शकलो तर संपूर्ण गावाला पुरेल इतक्या पाण्याची एक हिमनदी आपण तयार करू शकतो अशी कल्पना त्यांना त्यामुळे सुचली.
एकदा ही कल्पना सुचल्यावर त्यांनी ताबडतोब त्यावर काम सुरू केले. आज गावाजवळील सर्वात कमी उंचीवर असलेली हिमनदी सर्वात आधी वितळायला सुरुवात होते आणि शेतकऱयांना ऐन पेरणीच्या वेळी पाणी मिळायला लागते. दिवस जात राहतात तसे तापमानदेखील वाढू लागते आणि उंचावरच्या हिमनद्या वितळायला सुरुवात होते. त्यामुळे शेतीला आणि गावालादेखील सतत पाणीपुरवठा सुरू राहतो आणि पाण्याचे संकट जाणवत नाही. जास्तीत जास्त प्रमाणात पाणी गोठवण्याचे उद्दिष्ट आता नॉर्फेल आणि त्यांच्या सहकाऱयांनी ठेवले असून त्यासाठी ते वेगवेगळे प्रयोग राबवत आहेत. सोनम वांगचुक यांच्यानंतर आता लडाखच्या चेवांग नॉर्फेल यांनीदेखील देशाचे नाव जगाच्या पाठीवर गाजवले आहे.