मुद्दा – ‘स्मार्ट’ व्यसनावर नियंत्रण

1878

>> पुरुषोत्तम कृ. आठलेकर

दिवसेंदिवस माहिती तंत्रज्ञानात आमूलाग्र बदल होत असून स्मार्ट फोन व इतर सोशल माध्यमातून साऱ्या जगाचे अपडेट चुटकीसारखे आपल्याला उपलब्ध होतात. अर्थातच त्याचे चांगले व वाईट असे दोन्ही परिणाम आज आपण अनुभवत आहोत. त्याचे फायदे आहेत तसे तोटेही आहेत. तेव्हा त्याचा वापर कधी, कुठे, केव्हा करायचा हे प्रत्येकाने विचारपूर्वक लक्षात घेतले पाहिजे. समाजमाध्यमे व इंटरनेट हे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे सर्वात मोठे मुक्तपीठ झाले आहे. त्यामुळे सवांद जरी वाढला असला तरी संपर्क मात्र कमी होऊ लागला आहे. आपली व्यक्तिगत माहिती, फोटो, समारंभ, पर्यटन याविषयी नोंद सर्वांसमोर शेअर करण्यात बहुतांशी धन्यता मानू लागले आहेत, परंतु यामधील तोटे काय आहेत हे समजून घेण्याची मानसिकता राहिली नाही. मग ज्या काही दुर्घटना, गैरप्रकार घडतात त्याला तोंड देण्याशिवाय पर्याय राहत नाही. त्याहीपेक्षा लहान मुलेसुद्धा आज स्मार्ट फोन वापरू लागले आहेत. काही अपवाद वगळता बहुतांशी पालक त्यात धन्यता मानू लागले आहेत. आज त्याचा वापर हा प्रमाणाबाहेर जाऊ लागला आहे. इतका की, कुटुंबातील सदस्य एकमेकांशी बोलत नाहीत, नाती दुरावत चालली आहेत, आरोग्यावरसुद्धा विपरीत परिणाम होऊ लागले आहेत. मानसिक स्वास्थ्य बिघडत चालले आहे. घटस्फोटाची टक्केवारी वाढत चालली आहे. ही सर्व परिस्थिती पाहणी व अहवालानुसार समोर आली आहे. खरी गरज आहे ती निकष आणि नियंत्रणाची. ही माध्यमं जरी पारदर्शक असली तरी कोणत्याही स्वातंत्र्याबरोबर आचार विचारांची एक चौकट असावी लागते. तशी चौकट नसेल तर स्वातंत्र्याचा स्वैराचार होण्यास वेळ लागत नाही. इंटरनेट, स्मार्टफोनच्या माध्यमातून कोणालाही, कोणाबद्दल, कोणत्याही विषयी व्यक्त होण्याची संधी मिळत असल्याने अफवा, अनादर, द्वेष, अगदी खालच्या भाषेत केला जातो. इतकेच नव्हे तर अश्लील चित्रफिती, भावना भडकवणारी छायाचित्रे, समाजात विषमता पसरवणारे मजकूर पसरविले जात असल्यामुळे समाजात एक प्रकारची तेढ निर्माण केली जात आहे. यातील काही पाहणीतून व अहवालातून समोर आले आहे की, लहान मुलांचा सर्वांगीण विकास खुंटला आहे. त्यांच्यामधील कल्पकता, विचारशक्ती, बुद्धीला ताण देण्याची क्षमता कमी होत चालली आहे. एकूणच तंत्रज्ञान कितीही फायदेशीर, प्रगतीशीर असले तरी समाज, कुटुंब यांवर जेव्हा विपरीत परिणाम होऊ लागतात तेव्हा त्याला नियम व निकष यांची चौकट असणे अत्यंत गरजेचे आहे.अतिवापर व त्याचे उमटणारे प्रतिसाद, ढासळत चाललेली कुटुंब व्यवस्था हे लक्षात घेता केंद्र सरकार याबाबत पावले उचलीत आहे. या माध्यमांवर निकष व नियंत्रण सूचना, हरकती मागवण्यास सुरुवात केली आहे. त्याची अंमलबजावणी तातडीने होणे आवश्यक आहे, परंतु ‘मी एक यूजर’ या नात्याने याचा वापर केव्हा, कधी, कोठे, किती वेळ करायचा हे जेव्हा स्वतः ठरवू तेव्हा शासन निकष व नियंत्रणाची गरजच भासणार नाही. येत्या नवीन वर्षात ते नियम लागू होण्याची शक्यता आहे. तेव्हा आगामी नववर्षात स्मार्टफोनचा कमी व योग्य वापर हाच सर्वांचा खरा संकल्प असायला हवा

आपली प्रतिक्रिया द्या