रंगपट : ‘गोलपीठा’च्या मागची कहाणी!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

एका संवेदनशील भेटीचा अनुभव कथन करत आहेत दिग्दर्शक व अभिनेते मिलिंद पेडणेकर…

आमचे ‘गोलपीठा’ हे नाटक 1995-96 मध्ये राज्य नाटय़ स्पर्धेच्या अंतिम फेरीत नंबरात आले होते. सुरेश चिखले यांचे लेखन व माझे दिग्दर्शन असलेले हे नाटक वेश्यांच्या जीवनावर आधारित होते. मुळात राज्य नाटय़ स्पर्धेच्या अंतिम फेरीत निवड करतानाच याबाबत वाद निर्माण झाला होता, की या विषयावरचे नाटक नंबरात काढायचे की नाही वगैरे. पण शेवटी ते नंबरात आलेच. त्यानंतर नाटय़निर्माते विलास जाधव यांनी हे नाटक व्यावसायिक रंगभूमीवर आणण्याचे ठरवले.

राज्य नाटय़ स्पर्धेत हे नाटक सचिवालय जिमखानाच्या कलाकारांनी, म्हणजेच शासकीय सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांनी केल्याने या नाटकाचे पुढे प्रयोग आणि दौरे करणे त्या कलाकारांना शक्य होणार नव्हते. त्यामुळे मग या नाटकासाठी व्यावसायिक कलाकारांचा शोध सुरू झाला आणि योग्य कलाकार मिळाल्यावर तालमी सुरू झाल्या. मला दिग्दर्शक म्हणून समाधान वाटत होते; पण बाहेरच्या जगात या नाटकाविषयी वेगळीच चर्चा सुरू होती. त्यामुळे आमच्या निर्मात्यांनी नाटक रंगभूमीवर आणण्यापूर्वी नाटय़क्षेत्रातील काही निर्माते, कलाकार; तसेच पत्रकारांना दाखवण्यासाठी या नाटकाचा एक विशेष प्रयोग साहित्य संघात आयोजित केला. अनेक मान्यवरांनी हे नाटक पाहून आमचे कौतुक केले. भक्ती बर्वे-इनामदार तर म्हणाल्या, ‘हा गोलपीठा आहे. तुला जसा दिसला तसा तू तो दाखवला आहेस. तू काही चुकीचे दाखवलेले नाहीस.’ माझ्यासाठी ही प्रतिक्रिया महत्त्वाची होती

शेवटी 12 जुलै 1998 रोजी श्री शिवाजी मंदिरात आमच्या नाटकाचा प्रयोग हाऊसफुल्ल गर्दी खेचत पार पडला. आमच्या या नाटकाने 1998 च्या व्यावसायिक नाटय़ स्पर्धेच्या अंतिम फेरीत अकरा पारितोषिके मिळवून विक्रम केला; जो अजूनही ‘गोलपीठा’ नाटकाच्या नावावर आहे. यंदाच्या वर्षी या नाटकाला 25 वर्षे झाली आहेत. तेव्हा हे सर्व झाले खरे; परंतु हे नाटक दिग्दर्शित करत असताना, नाटकातले वास्तव जिवंत वाटावे यासाठी मी मुंबईतल्या कामाठीपुराच्या वेश्यावस्तीत, तिथल्या वेश्यांची माहिती जाणून घेण्यासाठी गेलो होतो. तिथे माझी भेट झाली ती ‘दुर्गा’ या मुलीसोबत! तिने तिची कहाणी मला सांगितली. एकदा लहानपणी तिच्या आई-वडिलांसोबत ती त्यांच्या शेतात गेली असताना एका माणसाने दाखवलेल्या चॉकलेटच्या आमिषाला ती कशी बळी पडली, त्याने तिला एस.टी.मध्ये बसवून शेतातून कसे पळवले, तिची कशी ताटातूट झाली; ही कथा ऐकताना माझ्या अंगावर काटा उभा राहिला. ती सांगत होती, ‘त्या पळणाऱ्या यस.टी. च्या नादात माझं घर कवा मागं गेलं मला कळलंच नाही आणि जवा कळलं तवा मी या खाटेवर व्हते. तवापासनं दिवसा-रात्री वरडण्यासाठी ही खाटच नशिबात आली’.

मनात दाटलेले बरेच काही ती सांगत होती आणि तिच्या डोळ्यांतून ओघळणारे अश्रू ती पदराने पुसत होती. तिला पाणी हवे होते म्हणून मी पुढे होऊन द्यायला गेलो तर ती म्हणाली, ‘आव थांबा, तुम्ही कशाला पानी देताय; म्या घेते की…’ असे म्हणत ती हाताने जमिनीवर जोर देत उठली. ‘बघा 20 वर्षाची असून सुधा म्हाताऱया मानसावानी जमिनीचा आधार घेऊन उठावं लागतंय. पार चोथा करतात इथं येणारे लोक…’, असे म्हणत ती आतल्या खोलीत गेली. हे सर्व पाहून माझे डोके पार बधिर झाले होते. पण तिची कहाणी तर ऐकायची होती. ती बाहेर येऊन पुन्हा त्याच जागी बसली. मी तिच्याकडे पाहात होतो; पण ती मात्र शून्यात बघत राहिली होती.

तिच्या डोळ्यांतले पाणी खाली पडत होते आणि त्यात ती बोट फिरवत होती. आईच्या आठवणीने जोरात आलेला हुंदका तर तिला आवरताच आला नाही. तितक्यात तिची तिथली अम्मी ओरडली, ‘अरे साब, बात करके हो गया की नहीं? गिऱहाईक आनेका टाईम हो गया हैं’. खरे तर मला निघावेसे वाटत नव्हते; पण जड पावलांनी मी जायला निघालो. इतक्यात दुर्गाने ‘दादा’ अशी मला हाक मारली. तिची ती हाक ऐकून अंगावर काटा उभा राहिला आणि डोळ्यात पाणी आले. मी तिच्याजवळ गेलो. ती म्हणाली, ’इकडे येऊन मला 12 वर्ष झाली. इतक्या दिसात सूर्य कसा उगवतो तो पाहिला न्हाय. एकदा बाहेर घेऊन जाऊन उगवलेला सूर्य दाखवशील का रं…?’ हे ऐकताच माझ्या डोळ्यांतून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या. ती मात्र माझ्या डोळ्यांत, शेतात राहिलेल्या तिच्या आई-बाबांना शोधत होती…!

शब्दांकन: राज चिंचणकर