
>> रश्मी वारंग
उन्हाळा किंवा थंडी, ऋतू कोणताही असो, तो साजरा करण्याच्या वेगवेगळय़ा पद्धती निर्माण होतात. हिंदुस्थानींसाठी अशीच एक लोकप्रिय पद्धत म्हणजे कुल्फी खाणे. हा केवळ पदार्थ नाही, तर परंपरा आहे. या गारेगार कुल्फीची ही शीतल कहाणी.
हिंदुस्थानी जनमानसांत दुधदुभत्याचे पदार्थ नेहमीच लोकप्रिय होते. आटवलेल्या दुधाच्या अनेक पाककृती प्रसिद्ध होत्या. 16 व्या शतकात मुघलांनी याच परंपरेला अधिक समृद्ध करण्याचा प्रयत्न केला. हा प्रयत्न म्हणजे कुल्फी.
‘कुल्फी’ शब्दाचे नाव मूळ पर्शियन भाषेत आहे. या भाषेनुसार कुल्फी म्हणजे बंद कप. या बंद कपातूनच कुल्फी आपल्या भेटीला येते. कुल्फीचा उल्लेख सम्राट अकबराच्या ‘ऐन-ए- अकबरी’त आढळतो. आटवलेल्या दुधात बदाम, पिस्ते, केशर घालून हे दूध शाही करण्यात आले. पदार्थाला फ्रीज करण्याची कला त्या काळी आजमावून पाहिली जात होती. हिमालयातून बर्फ आणून आणि सोरा मीठ वापरून पदार्थ गार केले जात.
हिमालयातून बर्फ आणण्यासाठी अकबराच्या सैनिकांमध्ये चढाओढ असायची. या सगळय़ा साधनांच्या वापरातून आटीव दुध कुल्हडमध्ये भरून बाजूला बर्फ आणि सोरा मीठ वापरून कुल्फी तयार होत असे. आजच्या मटका कुल्फीचे हे आद्य रूप. बदलत्या काळासोबत मटक्यातील कुल्फी वेगवेगळय़ा आकाराच्या भांडय़ात बदलत गेली. सुरुवातीच्या काळात बर्फ वगैरे आणणे सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर असल्याने कुल्फी शाही पदार्थ होता. कालांतराने बर्फ जमवण्याचे यंत्र आल्यावर शाही कुल्फी आम झाली. कुल्फीचे मूळ अकबर आणि पर्यायाने दिल्लीशी जोडले गेले आहे असे म्हटले जात असले तरी ऑस्टेलियन संशोधक चार्मिन ओब्रायनच्या मते मुघलांनी हे तंत्र पर्शिया किंवा समरकंद येथील मंडळींकडून आणले. त्यामुळे त्याच्या मते कुल्फीचे मूळ हिंदुस्थानात नाही, तर पर्शियन आहे.
काही असो, पण आज जगभरात कुल्फी हिंदुस्थानी डेझर्ट म्हणून खाल्ले जाते. कुल्फी सर्वसामान्यांपर्यंत पोहोचली ती कुल्फीवाल्या मामांमुळे. आज आईक्रीम आणि अगणित नवनवीन विदेशी डेझर्टच्या युगात कुल्फीवाले काही प्रमाणात इतिहासजमा झाले आहेत, दुपारी किंवा उन्हाळय़ाच्या दिवसांत अगदी रात्रीसुद्धा ‘कुल्फी।़।़।़ ये’ अशी साद घालत येणारा कुल्फीवाला बच्चे कंपनीचे खास आकर्षण होता. पांढऱ्याशुभ्र सदरा, लेंग्याच्या पेहरावासह गंध लावणारे, गळय़ात माळ घालणारे अणि डोक्यावर गांधी टोपी घालून फिरणारे कुल्फीवाले आबालवृद्धांत लोकप्रिय होते. त्यांचा तो कुल्फी ठेवलेला भलामोठा हारा, त्याभोवती गुंडाळलेले लाल कापड अनेकांना आठवत असेल.
त्या हाऱ्यातून कुल्फीचा जर्मनी साचा काढणे, दोन हातांत धरून तो साचा चोळून आतली कुल्फी बाहेर काढण्यासाठी तयार करणे आणि नंतर कुल्फीची काडी पकडून आपल्या हाती ते थंडगार गोड संचित देणे ही एक जबरदस्त प्रक्रिया असायची. विस्फारल्या डोळय़ांनी ते पाहणाऱया आपल्या बालरूपाला कुल्फीवाले देवदूत भासले असतील तर नवल नाही. आज वेगवेगळय़ा स्वादात आणि आकारात कुल्फी सहज मिळते, पण ‘त्या’ कुल्फीची सर ‘या’ कुल्फीला नाही. आज कुल्फीचे पूर्वीचे अप्रूप उरलेले नसले तरी कुल्फी आणि कुल्फीवाला तितकेच लोकप्रिय आहेत. दूध आवडणाऱयांसाठी आणि अजिबात न आवडणाऱयांसाठीही कुल्फी म्हणजे आटीव सुखाची थंडगार अनुभूती.