या नाश्त्याला ‘उपमा’ नाही !

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> रश्मी वारंग

साधेपणात सौंदर्य असते हा अनुभव देणारा पदार्थ म्हणजे उपमा. अतिपरिचयात अवज्ञा न झालेला उपमा म्हणजे नाश्त्यातील खास मानकरी. पोह्यांनंतर मान उपम्याचाच. सदा सिधा–साधा असणाऱ्या उपम्याची ही रवाळ कहाणी.

तांदळाच्या किंवा गव्हाच्या रव्याचे पदार्थ फार आधीपासून आपल्या आहाराचा भाग होते. गुप्तकाळात शिजवलेला रवा आणि दही यापासून बनवलेले दधिसत्तू नाश्त्याचा भाग होते, पण नुसता शिजवलेला रवा आजारपणातील पेजेची आठवण करून देणारा असल्याने त्यात मोहरी, कडीपत्ता, मिरची, कांदा, वाटाणा, गाजर अशी भर टाकत त्या रव्याला चटपटीत करायचे कुणाला तरी सुचले आणि तयार झाला उपमा.

उपमा या शब्दाची उत्पत्ती बघायला गेल्यास उपम्याचे नाते दक्षिणेकडील राज्यांशी अधिक घट्ट आहे. द्राविड भाषेत ‘उप्पू’ म्हणजे मीठ, तर ‘मावू’ किंवा ‘हिट्ट’ म्हणजे पीठ. ‘उप्पमावू’ किंवा ‘उप्पीटू’ हा मूळ शब्द होता. त्यातून ‘उप्पीट’, ‘उपमा’, ‘उप्पींडी’ असे विविध शब्द निर्माण झाले. कन्नडमध्ये हाच उपमा ‘खाराभात’ होतो. तेलुगूमध्ये ‘उप्पिंडी’ होतो आणि कोकणी भाषेत ‘रूलांव’ होतो. नावे वेगळी असली तरी पदार्थ उपमाच.

दक्षिण हिंदुस्थानाशी असलेले नाते आणखी एका शक्यतेला जन्म देते. काहींच्या मते उपमा हे विधवांचे आणि गरीबांचे खाणे होते. वन पॉट मिल या स्वरूपामुळे एकच एक उपमा भूक भागविण्यासाठी पुरेसा होता. जुन्या काळात विधवांचा आहार माफक असायचा, त्यामुळे थोडय़ाशा साधनांसह तयार उपमा त्यांच्यासाठी आदर्श खाणे होते. त्यानंतर एक काळ असा आला जिथे 9 ते 5 नोकरी करून येणाऱया कारकून मंडळींसाठी रात्रीच्या जेवणापर्यंत पोटाला आधार म्हणून संध्याकाळच्या नाश्त्यासाठी उपमा बनू लागला आणि नंतर उपमा सकाळच्या नाश्त्यात समाविष्ट झाला.

दक्षिणेकडे उपम्याला वेगवेगळय़ा प्रकारे अनुभवता येते. आंध्र प्रदेशात मूग डोश्याच्या जोडीने उपमा आणि चटणी हे आवडते खाणे ठरते. कर्नाटकात उपमा आणि केशरी भात समप्रमाणात वाढला जातो. या एकत्रित जोडीला ‘चाऊ चाऊ भात’ म्हणतात.

  असा हा उपमा 2011साली नव्याने चर्चेत आला. न्यूयॉर्कमध्ये फुडमेमरीवर आधारित पदार्थ बनवण्याची स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. हिंदुस्थानी वंशाच्या फ्लॉइड कारडोझने उपमा तयार केला. साध्या, चविष्ट, पौष्टिक उपम्याने फ्लॉइडला 1 लाख डॉलर्सचे बक्षीस मिळवून दिले.

असा हा उपमा पोह्यांइतका महाराष्ट्रात भाव खात नसला तरी लग्नाच्या मांडवापासून रेल्वेच्या कॅन्टीनपर्यंत सगळीकडे उपस्थिती नोंदवतो. कित्येक लोकांच्या दिवसाची सुरुवात उपम्याने होते. तयार होण्यासाठी फार आढेवेढे न घेता सोबत मटार, गाजर, काजू, टॉमेटो यांची फौज घेऊन जेव्हा तो आपल्या ताटलीत विसावतो, तेव्हा दुपारच्या जेवणापर्यंत भरपेट असण्याची खात्रीच होते. म्हणूनच नाश्त्याच्या पदार्थांत उपम्याला उपमा नाही.