केवळ माझा सह्य कडा

400

<< रतिंद्र नाईक >>  [email protected]

पोटात गोळा आणणारी तीन हजार फूट खोल दरी, निसरडे खडक, भलेमोठे उंच दगड आणि बिकट वाटा असे असतानाही ती बिथरली नाही. कोणत्याही परिस्थितीत शिखर गाठायचेच असा जणू तिने चंगच बांधला होता. कशाचीही तमा न बाळगता अखेर चार वर्षांच्या सहय़ाद्रीने ‘लिंगाणा’ सर केलाच. पिंपरी-चिंचवड येथे राहणाऱया सह्याद्री भुजबळ या चिमुरडीच्या कर्तृत्वाने सर्वांसमोरच नवा आदर्श निर्माण केला आहे.

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचाराने प्रेरित झालेल्या महेश भुजबळ यांनी आजवर अनेक गडकिल्ल्यांवर चढाई केली आहे. भोसरी गाव येथे राहणारे महेश टाटा मोटर्स येथे कामाला आहेत. महाराजांच्या सेवेचा ध्यास घेऊन महेश यांनी गडसंवर्धनाचे कार्य हाती घेतले आहे. एवढेच काय तर त्यांच्या या कार्यात त्यांची साथ पत्नी ज्ञानेश्वरी आणि मुलगी सहय़ाद्री देत आहेत.

वयाच्या अकराव्या महिन्यातच सहय़ाद्रीचे वडील महेश तिला घेऊन रायगड येथे गेले. आतापर्यंत सहय़ाद्री तीनवेळा रायगडावर गेली असून तीन वर्षांची असताना तिने रायगडचा 16 कि.मी.चा घेर पूर्ण केला आहे. गेल्या वर्षी पावसाळय़ात पन्हाळा पावनखिंड येथील 48 किमीचा फेरा तिने दोन दिवसांत पूर्ण केला. या प्रवासात 40 कि.मी. ती चालली हे विशेष. गडकिल्ल्यांची आवड असलेल्या सहय़ाद्रीने आतापर्यंत राजगड, जंजिरा, सुधागड, शिवनेरी, हडसर, तुंग, प्रतापगड, मल्हारगड, पुरंदर, लोहगड, राजमाची, तोरणा आदी किल्ले फत्ते केले आहेत.

बाळ रायगड परिवार संवर्धन मोहिमेच्या वतीने गडकिल्ल्यांचे संवर्धन केले जाते. गडकिल्ल्यांचे संवर्धन प्रत्येकानेच केले पाहिजे हा संदेश समाजात देण्यासाठी लिंगाणाची मोहीम सहय़ाद्रीला घेऊन फत्ते केल्याचे महेश यांनी सांगितले. शिलेदार ऍडव्हेंचर इंडिया या संस्थेच्या माध्यमातून ही मोहीम आणखी सोयिस्कर झाली. त्यासाठी संस्थेचे अध्यक्ष सागर नलावडे यांनी विशेष सहकार्य केले.

‘लिंगाणा’ गडावर जाण्यासाठी सहय़ाद्री, तिचे आईवडील व इतर 20 ते 25 जणांनी पावणेसात वाजता मोहरी गावातून ट्रेकला सुरुवात केली. जंगली भाग, कडेकपारी पार करत साडेसात तासांच्या ऍडव्हेंचरल प्रवासानंतर सहय़ाद्रीने लिंगाणा गडाचे शिखर गाठले. गडावर चढताना सोसाटय़ाचा वारा आणि दुपारचे ऊन व्यत्यय आणत होते. असे असतानाही जिद्द आणि साहस दाखवत सहय़ाद्रीने गडाचे टोक सर केले. रॅपलिंग करतेवेळी हेल्मेट, शूज, दोरखंड आदी साहित्याची बरीच मदत झाल्याचे सह्याद्रीचे वडील सांगतात. विशेष म्हणजे केवळ सुका खाऊ आणि पिण्याचे पाणी यांच्या आधारावर सह्याद्रीने ही मोहीम पार पाडली. दुपारी तीनच्या सुमारास लिंगाणा उतरण्यास सुरुवात केल्यानंतर तीन तासांनी गडाच्या पायथ्याशी पोहोचल्याचे महेश यांनी सांगितले. त्यानंतर मोहरी गावाच्या दिशेने सर्वांनी आपला मोर्चा वळवला व रात्री साडेआठच्या सुमारास मोहरी गावात सर्वजण पोहोचले. एवढा प्रवास केल्यानंतरही सहय़ाद्रीने मात्र ‘पाय दुखतायत, अंग दुखतंय’ अशी कोणतीच तक्रार आईबाबांकडे केली नाही.

भोसरी गावातल्या महात्मा फुले विद्यालयात बालवाडीत शिकणाऱया सहय़ाद्रीने कमी वयातच लिंगाणासारख्या कठीण गडाचे शिखर सर केल्यामुळे अनेकांकडून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. यापुढे अनेक उंच शिखरे गाठायची आहेत अशी मनीषा सहय़ाद्रीच्या पालकांची असून आतापासूनच तिला गिर्यारोहणाचे धडे दिले जाणार आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या