पहिल्या दिवशी पाहुणा, दुसऱ्या दिवशी पै…

>> साधना गोरे [email protected]

बालपणी प्रत्येकाने अनेक बडबड गीतं म्हटली असतील. त्यातलं एक गीत म्हणजे ‘अटक मटक चवळी चटक, चवळी लागली गोड गोड, जिभेला आला फोड फोड; फोड काही फुटेना, घरचा पाहुणा उठेना, घरचा पाहुणा उठला, जिभेचा फोड फुटला’. यातल्या ट, क, ड, ठ या अक्षरांच्या अनुप्रासामुळे हे गाणं म्हणायला भारी गंमत वाटते. या गीतात जिभेवर फोड आला आहे, तो फुटत नाहीये, तो लसतोय, त्याचा त्रास होतोय. अशा या फोडाची तुलना घरच्या पाहुण्याशी करण्यात आलेली आहे. आपल्या भारतीय संस्कृतीत ‘अतिथी देवो भवः’ म्हटलेलं आहे, पण या उक्तीच्या विरुद्ध वरील गाणं आहे. कोणत्याही संस्कृतीत अशा विसंगतीने भरलेल्या म्हणी, शब्दप्रयोग, गाणी असतातच; ‘पाहुणा’ या शब्दासंदर्भातही त्या आहेत.

‘पाहुणा’ शब्दाला संस्कृतमध्ये ‘अतिथी’ असा एक समानार्थी शब्द आहे. आधी तिथी म्हणजे दिवस न कळवता अचानक येतो तो अतिथी. ऐन जेवणाच्या वेळी आलेला अनाहूत माणूस म्हणजे अतिथी. अशा आलेल्या अतिथीसह त्याचा अनादर न करता त्याला आपल्या पंगतीला घेऊन जेवणं हे एकेकाळी गृहस्थाश्रमाचं कर्तव्य मानलं जाई, पण आज मराठीत ‘अतिथी’ शब्द कार्यक्रमातील वत्ते, अध्यक्ष यांनाच उद्देशून वापरला जातो. आपले नातेवाईक, मित्रमैत्रिणी घरी येतात तेव्हा त्यांना ‘पाहुणे’ म्हटलं जातं.

‘पाहुणा’ शब्दाचं मूळ संस्कृतमधील ‘प्राघुणः’ शब्दात आहे. प्राघुणकः, प्राघूर्णः, प्राहुणः, अशीही त्याची रूपं आहेत. पालीमध्ये प्राहुणेय्य / पाहुण, प्राकृतमध्ये पाहुण, पाहुणअ, पहुण अशी रूपं आहेत. गुजरातीमध्ये ‘पोणो’, पंजाबीमध्ये ‘पाहुणा’, हिंदीमध्ये ‘पाहुना’, राजस्थानीमध्ये ‘पावणा’ म्हटलं जातं. ग्रामीण मराठीत ‘पावणा’ असंही रूप आहे. हिंदी पट्टय़ात ‘पाहुना’ शब्द ‘जावई’ या अर्थाने वापरण्याची पद्धत आहे.

गावाकडे पावणेरावळे, पावणाराऊणा असंही म्हणण्याची पद्धत आहे. या ‘रावळा’ शब्दाचं मूळ ‘राऊळ’ शब्दांत आहे. ‘राऊळ’ शब्दाच्या अनेक अर्थांपैकी एक अर्थ ‘देव’ असा आहे. ‘पाहुणा’ शब्दाला ‘रावळा’ हे रूप जोडून मराठीने ‘पाहुणा आणि देव सारखाच असतो’ हे जणू मान्य केलं आहे, पण हा पाहुणा जास्त दिवस मुक्कामी राहिला तर? मग त्याचं कसलं आलंय देवपण! जास्त दिवस मुक्कामी राहणाऱ्या पाहुण्याला उद्देशून एक म्हण आहे ः ‘पहिल्या दिवशी पाहुणा, दुसऱ्या दिवशी पै, तिसऱ्या दिवशी अक्कल नाही.’ म्हणजे पहिल्या दिवशी पाहुण्या मनुष्याचा विशेष आदर होतो, दुसऱ्या दिवशी साधारण होतो, पण तिसऱ्या दिवशीही त्याने मुक्काम न हलविल्यास त्याचा अनादर होण्याचा संभव असतो. तेव्हा शहाण्या मनुष्याने फार दिवस पाहुणचाराची अपेक्षा करू नये, असं सुचवणारी ही म्हण आहे. सुरुवातीच्या बडबड गीतातला पाहुणाही फार दिवस मुक्कामी राहिलेला असल्याने तो जणू पह्डाप्रमाणे त्रासदायक वाटायला लागला आहे.

स्वतःच्या संसारातील जबाबदाऱ्या पार पाडताना त्रस्त झालेल्या मनुष्याला इतर कोणाचे ओझे अंगावर घ्यायला नकोसे वाटते. अशा वेळी ‘माझे मला होईना अन् पाहुणा दळून का खाईना’ ही म्हण वापरली जाते. या म्हणीपेक्षा अगदी विपरीत अर्थाचीसुद्धा म्हण आहे. आपल्या घरी दुःख असो किंवा सुख, घरी आलेल्या पाहुण्याचं स्वागत करावंच लागतं, ते काही चुकत नाही. अशा वेळी ‘हसतीलाही पाहुणा रडतीलाही पाहुणा’ ही म्हण वापरली जाते. ‘ज्या गोष्टी टळत नाहीत त्याबद्दल वाईट वाटून उपयोग नाही’, असा अर्थ सुचवणारी ही म्हण आहे. या म्हणीचा आणखी एक अर्थही आहे. घरी एखाद्याचा जन्म होवो, नाहीतर मरण ; म्हणजे सुखात व दुःखात पाहुणेच सोबतीला असतात, असाही अर्थ या म्हणीतून ध्वनित होतो.

दोन दगडीवर हात ठेवले की, फजिती होते हे सांगताना ‘दोन्ही घरचा पाहुणा उपाशी’ ही म्हण वापरली जाते. दोन ठिकाणी राहण्याजेवण्याची सोय असली म्हणजे प्रत्येक घरी वाटते की, पाहुणा दुसऱ्या घरी जेवला असेल, पण अशाने पाहुणा मात्र उपाशी राहतो. पाहुण्यांमध्ये जुने-नवे पाहुणे असतात तसे श्रेष्ठ-कनिष्ठ पाहुणेही असतात. आपल्या संस्कृतीत व्याही, जावई हे श्रेष्ठ पाहुणे मानण्याची परंपरा आहे. त्यामुळे त्यांची अधिक बडदास्त ठेवली जाते. या श्रेष्ठ पाहुण्यांवरून एक म्हण आहे… ‘व्याही / जावई पाहुणा आला म्हणून रेडा दूध देईल काय?’ कितीही आणीबाणीची वेळ आली तरी अशक्य गोष्ट घडून येत नाही, या अर्थाने ही म्हण वापरली जाते.