>> सनत्कुमार कोल्हटकर
चीनसमोर सध्या घटत चाललेला जन्मदर आणि त्याबरोबरच दरवर्षी घटत जाणारी लोकसंख्या हे महत्त्वाचे गंभीर प्रश्न समोर उभे ठाकलेले दिसत आहेत. आता सध्या चीनमधील तरुण वर्ग मुले जन्माला घालू इच्छित नसल्याचे दिसत आहे. चीनमधील सत्ताधाऱ्यांकडून तरुण वर्गाला कितीही आर्थिक व इतर आमिषे दाखवली तरी तरुण वर्ग मुले जन्माला घालू इच्छित नाही. त्यामुळे येणाऱ्या काही वर्षांत खरी उत्पादनक्षम लोकसंख्या ही घटतच जाणार आहे. 60 ते 70 आयुमान असणारी लोकसंख्या पुढील दशकात एकूण लोकसंख्येच्या 60 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त होत जाणार आहे.
चीनकडे जगाचा पुरवठादार देश म्हणून बघितले जाते, पण या पुरवठादार देशाच्या दर्जावर मोठा परिणाम होत जाणार आहे. हे कमी म्हणून की काय अनेक आंतरराष्ट्रीय कंपन्या चीनमधून आपापला बाडबिस्तरा चीनबाहेर हलवताना दिसत आहेत. याचा मोठा परिणाम चीनमधील बेरोजगारीवर होत आहे. याची दुसरी तेवढीच महत्त्वाची बाजू म्हणजे चीनमधील ‘उपभोक्ता’ ग्राहक संख्या ही घटत जाताना दिसणार आहे.
1 ऑक्टोबर 2024 ला चीनमधील सत्ताधारी कम्युनिस्ट राजवटीला 75 वर्षे पूर्ण झाली, पण या सुवर्णमहोत्सवी वर्षाच्या सुरुवातीला चीनकडून कोणताही भव्यदिव्य व लक्षवेधी असा कार्यक्रम आयोजित केल्याचे दिसले नाही. याला कारणीभूत बहुधा चीनची मंदावलेली आर्थिक गती, उत्पादन क्षेत्र आणि सेवा क्षेत्राची घसरत चाललेली वाटचाल, दिवाळखोर झालेले बांधकाम क्षेत्र, आंतरराष्ट्रीय कंपन्या चीनबाहेर हलवत असलेला आपापला व्यवसाय, दिवसेंदिवस घटत चाललेली गुंतवणूक व यामुळे वाढलेली बेरोजगारी आणि एकूणच सामान्य चिनी जनतेत असलेली खदखद आहे असे मानण्यास जागा आहे. पर्चेसिंग मॅनेजर्स इंडेक्स हाही 50 खाली सरकलेला आहे.
याला मलमपट्टी म्हणून चीनच्या कम्युनिस्ट सरकारने चिनी नोकरदारांचे निवृत्ती वय पाच वर्षांनी वाढवलेले आहे. चिनी पुरुष नोकरदारांचे निवृत्तीचे वय पूर्वी होते 60 आणि स्त्रियांसाठी हीच निवृत्तीची मर्यादा ठेवण्यात आली होती 55. एकेकाळी चिनी कम्युनिस्ट सरकारनेच ‘कुटुंब नियोजन’ जबरदस्तीने राबविले होते. आता इतक्या वर्षांनंतर तरुण लोकसंख्येचा टक्का खूपच घसरलेला असताना सरकारने अनेक प्रोत्साहन योजना जाहीर करूनही चिनी जनता कुटुंबाला वाढविण्यास तयार नाही. पूर्वी एकच मूल जन्माला घालण्यास परवानगी होती, पण आताच्या चिनी युवक-युवतींना एकही मुलाला जन्माला घालण्याची अजिबात इच्छा नाही.
चीनमध्ये ‘गर्भपाताचे’ प्रमाणही मोठे आहे. आर्थिक वाढ विशेषतः कोरोना काळानंतर खुंटलेली आहे. वय वर्षे 60 पेक्षा जास्त वयोमान असणाऱ्या लोकांची संख्या तूर्तास एकूण लोकसंख्येच्या 22 टक्के आहे. पुढील 10 वर्षांत ती दुप्पट किंवा त्यापेक्षा जास्तच होण्याची दाट शक्यता आहे. चीनमधील सरासरी आयुमान आहे 78 वर्षे. म्हणजे 60 वर्षांवरील लोकसंख्येला निवृत्तीवेतन, आरोग्य विमा लाभ देणे सरकारला अवघड होत जाणार आहे हे निश्चित. त्यामुळेच ‘सुवर्णमध्य’ साधण्यासाठी निवृत्तीचे वयोमान 60 वरून 65 करण्यात आल्याचे दिसते आहे.
चीनच्या कम्युनिस्ट सरकारने तर आता लोकसंख्येचा सरकारी आकडा जाहीर करणेही थांबविले आहे. त्यामुळे लोकसंख्येचा खराखुरा घटलेला आकडा समजणे एकंदर अवघडच आहे. यामुळे चीनच्या निर्यात आणि आयातीवर मर्यादा येत जाणार आहेत. औद्योगिक उत्पादनावरही परिणाम होत जाणार आहे. थोडक्यात चीन एक ग्राहक म्हणून आणि एक पुरवठादार म्हणून बाधित होत जाणार आहे.
चीन हे आव्हान कशा रीतीने पेलू शकेल याचीच जगाला उत्सुकता आहे.