परीक्षण – संघर्षाची व्याख्या

>> सतीश चाफेकर

आई म्हटले की प्रत्येक माणसाच्या मनातले हळवे कोपरे जागे होतात, खूप खूप काही मनात येते. ती असते तेव्हा तिचे सगळे असतात आणि नसते तेव्हा ती सगळ्यांची असते.

‘मु. पो. 10, फुलराणी’ या कोंडाबाई लक्षण पारधे यांच्या पुस्तकाचे मॅजेस्टिक प्रकाशनतर्फे नुकतेच प्रकाशन झाले. सिद्धार्थ पारधे या कोंडाबाई पारधे यांच्या मुलाने त्यांचे आत्मकथन लिहून घेतले आहे. कोंडाबाई यांना लिहिता वाचता येत नव्हते. हे पुस्तक माझा मित्र सिद्धार्थने कोरोना काळात मला वाचण्यास दिले.

सिद्धार्थ यांच्या कुटुंबाला मी 1997 पासून ओळखत आहे. त्यांचा मुलगा रमेश याच्याबरोबर नेहमी त्यांच्या घरी जात असे अन् कोंडाबाई आणि लक्ष्मण पारधे यांच्याशी माझ्या गप्पा होत. पुढे लक्ष्मण पारधे गेल्यानंतर कोंडाबाई यांच्याशी गप्पा होत. हे सर्व सांगण्याचा उद्देश एकच की त्यांची भाषा, बोलण्याची पद्धत सगळे तंतोतंत या पुस्तकात उतरले असल्याचे माझे निरीक्षण आहे.

कोंडाबाई शिकलेल्या नसल्या तरी मुलांनी शिकलेच पाहिजे ही त्यांची जिद्द होती. त्यासाठी त्या काही पण करण्यास तयार असत. एकदा सिद्धार्थने वैतागून ‘मी शिकणार नाही’ अशी धमकी दिली. तेव्हा त्या संतापून सिद्धार्थच्या गळ्यावर विळा ठेवून म्हणाल्या, नाही शिकत ना तर मीच तुझा गळा चिरते. कोंडाबाई जबरदस्त जिद्दी होत्या. मुख्य म्हणजे येणाऱया कोणत्याही संकटाला तोंड देत असत, सामोऱया जात असत.

त्यांचे लहानपण, लग्न आणि त्यानंतर झालेले त्यांचे हाल साधेसोपे नव्हते. समोर मोठे प्रश्नचिन्ह घेऊन जगायचे कसे अशा परिस्थितीतून त्या गेल्या. परंतु त्यांना त्यांचे पती लक्ष्मण पारधे यांची साथ लाभली. मला आठवतेय, जेव्हा केव्हा मी लक्ष्मण पारधे यांना बघितले की बाबा आमटे यांची आठवण यायची. जवळ जवळ तसेच दिसायचे. मनाने अत्यंत शांत अन् प्रेमळ. कोंडाबाई पण प्रेमळ होत्या पण भाबडय़ा नव्हत्या. हे कथन वाचताना प्रत्येक पानावर जाणवते की एक जिद्दी स्त्राr काय करू शकते. सिद्धार्थ यांची आई म्हणजे नारी शक्तीचे प्रतीक म्हणावे लागेल.

कोंडाबाई यांची भाषा, त्यांचे बोलणे जसेच्या तसे या पुस्तकात आले आहेत. भाषा कोणतीही असो माणूस जेव्हा व्यक्त होतो तेव्हा त्याच्या भाषेतून व्यक्त झाला की त्या घटना अत्यंत जवळच्या वाटतात तसे या पुस्तकाबद्दल वाटते.

कोंडाबाई कुणाकुणाच्या घरी भांडी घासायची यांची नावे पाहिली तर आपण चक्रावून जातो. कोंडाबाई साहित्य सहवासमध्ये गंगाधर गाडगीळ, विजया मंगेश राज्याध्यक्ष, व पु काळे, विंदा करंदीकर, लीला चंद्रकांत बांदिवडेकर, य. दि. फडके, के. ज. पुरोहित, मनोहर उकिडवे, लता मोहन हर्षे यांच्या घरात काम करत होत्या. त्यांची भांडी घासत होत्या.

तर ह्या पुस्तकामधील अनुक्रमणिकांची नावे बघितली तर ‘साहित्य सहवास’मधील प्रत्येक इमारतीची नावे आहेत. अशा अनेक जणांच्या घरी त्या घरकाम करायच्या. तेथील आठवणी, घटना वाचताना वेगळ्याच विश्वात नेतात. इथे खूप काही देता येईल द्यायचा प्रयत्न केला तर संपूर्ण पुस्तक परीक्षण म्हणून छापावे लागेल इतके काही या पुस्तकात आहे. सिद्धार्थ खूप शिकला. रमेशही शिकला. आता तो सचिन तेंडुलकर यांच्याकडे पीए म्हणून त्याला साथ देत आहे. पारधे कुटुंबात महत्त्वाचा गुण म्हणजे कामाशी प्रामाणिक राहणे .

या पुस्तकातील अनेक प्रसंग असे आहेत की ते वाचताना एकच मनात येथे की, कसे काय कोंडाबाई आणि त्यांच्या कुटुंबाने इतके सोसले. आपली सामान्य माणसांची ‘महिरपी दुःखे’ त्यापुढे अत्यंत सामान्य वाटू लागतात आणि एका क्षणी आपण कोंडाबाई होतो. त्यांचे आयुष्य जगत आहोत की काय असा आपला विलक्षण परकाया प्रवेश होतो.

या पुस्तकामधील शेवटचा प्रसंग म्हणजे कोंडाबाई यांच्या मुलीचे आक्काचे जाणे. त्या आईला काय यातना झाली असेल याची आपण कल्पना करू शकत नाही. ज्या ‘कालोनी’मध्ये (कोंडाबाई कॉलनीला ‘कालोनी’ म्हणतात) त्यांनी सर्वांची भांडी घासली, सिद्धार्थने तेथील लोकांच्या गाडय़ा पुसल्या, दूध टाकले, पेपर टाकले त्या ‘कालोनी’मध्ये सिद्धार्थने ब्लॉक घेतला. त्या ब्लॉकमध्ये सुप्रसिद्ध दिग्दर्शक सत्यदेव दुबे राहत होते. पुस्तक वाचून आणखी बरेच काही समजेल. त्या जागेचे नाव आहे, ‘मु. पो. 10 फुलराणी’! इथल्या संघर्षाची आणि यशाची खरी व्याख्या जाणून घ्यायचे असेल तर हे पुस्तक नक्की वाचायला हवे.