
>> सीमा श्रीराम मोडक
‘परीक्षा’ या शब्दातच भीती, तणाव असतो असं आपण आपलं ठाम मत केलेलं आहे. आता दहावी, बारावीची परीक्षा अगदी तोंडावर आलेली आहे. या परीक्षांचं टेन्शन का येतं याचा विचार करू या. आपल्याला माहीत आहे का की, परीक्षेचं टेन्शन कोणाला येतं? ज्याने अभ्यास केला आहे त्यालाच येतं, पण मग जर अभ्यास केला आहे तर टेन्शन यायलाच नको. आपल्याला खरं टेन्शन असतं ते मला परीक्षेत उत्तर लिहायला वेळ मिळेल का? पेनमधली शाई संपणार नाही ना? मला उत्तरं लिहिता येतील का? माझी तब्येत बिघडणार तर नाही ना? अशा अनेक प्रश्नांची मालिका आपल्याला भंडावून सोडते.
पण ही सगळे भीती आपल्या मनाची असते. सर्वप्रथम या भीतीला मनातून कायमचं हद्दपार करा. स्वतःला विश्वास द्या की, मला सर्व पेपर चांगले जातील. कारण मी अभ्यास केला आहे. तुमचा आत्मविश्वास तुम्ही सतत जागृत ठेवा.
एकदा भीती गेल्यानंतर उत्साहात परीक्षेची तयारी कशी करायची आणि परीक्षेला कसे समोर जायचं हे आपण पाहू या. वर्षभर केलेल्या अभ्यासाची पावती आपल्याला परीक्षेमुळेच मिळते. परीक्षेमुळेच आपल्यालाही आपली प्रगती कळते. मग अशी परीक्षा देताना छान मनाने तयार होऊ या. परीक्षेला सामोरे जाताना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या तब्येतीला जपा. उन्हाचे चटके, आणि वातावरणातील बदल यामुळे तब्येत बिघडू शकते. म्हणून उन्हात फिरणं टाळा, बाहेरचे किंवा उघडय़ावरचे पदार्थ खाणे टाळा, ऊन आहे म्हणून गार पदार्थ खायचेही टाळा. त्याचबरोबर रात्रीचे जागरण टाळा. त्यामुळे आपली तब्येत बिघडू शकते.
वर्षभरात केलेल्या अभ्यासाची उजळणी करा. प्रत्येक पाठ किंवा कवितेचे मुद्दे आपल्या स्वतःच्या शब्दांत लिहा. सोप्या पद्धतीने उत्तर लक्षात ठेवा. दिवसभर एकाच विषयाचा अभ्यास करण्यापेक्षा थोडा वेळ दुसऱया विषयांचा अभ्यास करा. उत्तरं पाठ करण्यावर भर देऊ नका. त्यापेक्षा मन लावून एकाग्रतेने वाचन केल्यास लक्षात राहील. सिनेमा, सीरिज पाहताना जसं आपण एकाग्र होतो, अगदी तसाच अभ्यास केला तर सहज लक्षात राहील. अभ्यासाचे टेन्शन न घेता वाचलं तर नक्की लक्षात राहील. एकदा पाहिलेला सिनेमा, पेपरमधली बातमी आपण बरेच दिवस लक्षात ठेवता. कारण त्या वेळी आपण दुसऱया कशाचाही विचार करत नाही. अगदी अशाच पद्धतीने आपण अभ्यास केल्यास सर्व पेपरमधील प्रश्न आपण सहज सोडवू शकतो. आता आपण प्रत्यक्ष पेपरच्या दिवशी पेपरला जाताना वेळेच्या आधी किमान अर्धा तास परीक्षेच्या ठिकाणी पोहोचले पाहिजे. त्यामुळे परीक्षेच्या वातावरणाची आपल्याला थोडी सवय होते. मनावरचा ताण थोडा कमी होतो. मित्रमैत्रिणी भेटतात. त्यामुळे परीक्षेचा तणाव थोडा कमी होतो. ज्या विषयाचा पेपर आहे, त्यासाठी लागणारे साहित्य बरोबर घ्यायचे लक्षात ठेवा. परीक्षेला जाताना स्वतः गाडी न चालवता कोणाबरोबर तरी जा.
आता प्रत्यक्ष पेपर लिहिण्यापूर्वी काय करायचं ते पाहू या. प्रत्यक्ष पेपर लिहिण्यापूर्वी आपला संपूर्ण पेपर तपासा. पेपर फाटलेला असल्यास तो घेऊ नका. पेपरवर आपलं नाव, मोबाईल नंबर किंवा कोणत्याही देवाचं किंवा अन्य कोणाचं नाव लिहू नका. असा पेपर तपासला जात नाही. खूप उत्साहात पेपर न लिहिता शांतपणे एक एका प्रश्नाचे उत्तर लिहा. संपूर्ण पेपर झाल्यानंतर पुन्हा एकदा पेपर तपासून घ्या. कोणत्या प्रश्नाला किती वेळ द्यायचा याचेही नियोजन आधीच करा. म्हणजे वेळेचे नियोजन केल्यास संपूर्ण पेपर सोडवता येतो. पेपर लिहिताना आपल्या लिहिण्याचा वेग वाढवण्यासाठी आत्तापासूनच वेळ लावून पेपर सोडवण्याचा सराव करा. सर्व भाषांच्या पेपरला 80 गुण असतात. 180 मिनिटांत 80 गुणांचा पेपर लिहायला हवा. म्हणजे साधारण एका गुणासाठी दोन मिनिटे द्यावेत. उर्वरित 20 मिनिटांमध्ये दहा मिनिटे पेपर पुन्हा तपासण्यासाठी आणि दहा मिनिटं मोठय़ा प्रश्नांसाठी ठेवावीत. याच पद्धतीने इतर विषयांसाठीसुद्धा वेळेचे नियोजन करावे. नियोजनबद्ध कार्य केल्यास आपल्याला परीक्षा अतिशय सोपी जाईल. तसेच सर्वात महत्त्वाचं म्हणजे विद्यार्थिनींचे जे पालक आहेत, विशेषतः सगळ्या माताभगिनींना मी हे सांगू इच्छिते, हे आपण स्वतःसुद्धा मुलांच्या परीक्षेचे टेन्शन घेऊ नका आणि मुलांनाही टेन्शन देऊ नका. मग यश तुमचेच आहे याची खात्री बाळगा.
(मुख्याध्यापक, डॉ. काणे गर्ल्स हायस्कूल, नंदुरबार)



























































