मानसिक अनारोग्याकडून मानसिक आरोग्याकडे…

सीमा उपळेकर, [email protected]

संयुक्त राष्ट्र संघ, जागतिक आरोग्य संघटना आणि इतर जागतिक संस्था यांनी तयार केलेले अनेक शोधनिबंध आणि इतर साहित्य, उद्दिष्ट लोकांपर्यंत पोहोचत नाहीत. तेव्हा जागतिक आरोग्य संघटनेतर्फे मानसिक आरोग्यासंदर्भात केलेल्या मार्गदर्शक पुस्तकाचे मी मराठीत भाषांतर केले. त्याचा फायदा आपल्याला होईल तेव्हाच आपण स्वतःला जागतिक नागरिक म्हणून स्वदेशाशी जोडू शकतो. हे त्या दिशेने एक लहान पाऊल आहे. मानसिक अनारोग्याकडून मानसिक आरोग्याकडे जायचा नवीन संकल्प करूया.

मानसिक आरोग्याचे किती महत्त्व आहे हे सध्या कोरोनामुळे खूपच जाणवत आहे. आपल्याला एखादा शारीरिक आजार झाल्यास आपण लगेच त्यावर उपचार करतो, सहसा इतरांपासून लपवत नाही, तर मग मनाला आजार झाल्यास त्यावर उपाय करायला नकोत का? लपवायची गरजच काय? परंतु यासाठी आधी सर्वांनी एकत्र येण्याची आणि मानसिकता बदलण्याची गरज आहे. संगणकाचा, भ्रमणध्वनीचा, अंतराचा आभासी सहवास सोडून प्रत्यक्ष माणसाशी संवाद साधणे जरुरीचे आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या अनुमानानुसार 2030 पर्यंत (Non Communicable Disease) म्हणजेच असंसर्गीय आजार यात मानसिक आरोग्य भार सर्वाधिक असणार आहे. दर 4 व्यक्तींपैकी एकास कुठल्या ना कुठल्या मानसिक समस्येस कधीतरी सामोरे जावे लागेल.

दुर्दैवाने मानसिक आरोग्याच्या बाबतीत सगळे जगच अल्प विकसित आहे. अमेरिका किंवा इतर विकसित देशात उपचारातील अंतर (Treatment Gap) म्हणजे आजारपण, रोग किंवा विकार असलेल्या लोकांची संख्या ज्यांना उपचाराची आवश्यकता आहे परंतु ते मिळत नाहीत. 35 ते 55 टक्के तर हिंदुस्थान तसेच इतर विकसनशील देशात 60-85 टक्के जगभरातील केवळ 10 टक्के लोक सध्या योग्य उपचार लाभार्थी आहेत. प्रति एक लाख लोकसंख्येमध्ये हिंदुस्थानमध्ये 0.75 मानसोपचारतज्ञ आहेत, तर इच्छित संख्या प्रति एक लाख लोकांसाठी 3 मानसोपचारतज्ञ आहेत. शाश्वत विकासाचे लक्ष्य (Sustainable Development Goals ) 2030 पर्यंत साध्य करावयाची आहेत. यामधील उद्दिष्ट सर्व वयोगटातील निरोगी जीवनासाठी आणि सर्वांसाठी आरोग्याची खात्री देणे हे आहे.

आपण हिंदुस्थानी नशीबवान आहोत. आपल्याला पूर्वजांचा योगाभ्यास आणि अध्यात्माचा वारसा मिळाला आहे. आज जगभरातील अनेक देश आपल्याकडे आशेने पाहत आहेत. आपण जाणीवपूर्वक औषधोपचाराबरोबर याचा फायदा घेतला पाहिजे. तसेच मानसिक रोगावर उपचार सद्य सामाजिक मानसिकता बदलण्यासाठी, देशापुढील शेतकऱयांच्या, युवांच्या आत्महत्येचा प्रश्न तसेच वाढणारे बलात्कार, लिंग-आधारित छळ रोखण्यासाठी केला पाहिजे. हे मार्गदर्शक पुस्तक ज्याने मानसशास्त्राचा अभ्यास केला नाही आणि ज्याला आत्महत्येच्या विचारांनी ग्रासले आहे किंवा क्लेशकारक प्रसंगाच्या तणावांनी जो पीडित आहे अशा रुग्णांमधील संवादाचा दर्जा वाढवेल.

पूर्वी मानसिक तज्ञाकडे फक्त वेडेच जातात असा विचार प्रचलित होता. परंतु अलीकडच्या झपाटय़ाने बदलणाऱया जगात लहान मुलांनादेखील शाळा, अभ्यास अथवा खेळ येथील स्पर्धेमुळे नैराश्य येते. तसेच पौगंडावस्थेतील मुले हानिकारक औषधे किंवा दारूचे व्यसन याने त्रस्त असतात. तरुण आणि मध्यमवयीन शिक्षण, व्यवसायातील ताण याने ग्रस्त आढळतात. वयस्कर व्यक्तीमध्ये औदासीन्य (Depression) प्रमाण 35 टक्के आहे. साधारण 10 व्यक्तींपैकी 3 जणांना याला सामोरे जावे लागते. एकंदरीतच बोकाळलेली सामाजिक माध्यमे, बदललेली वेगवान जीवनशैली, विभक्त कुटुंब तसेच भरपूर स्थलांतर यामुळे माणसामाणसातील संवाद कमी झाला आहे. अशावेळी कुणी तरी समजून घेण्याची, मोकळे होण्यास मदत करण्याची गरज असते. यासाठीच मानसिक रुग्णालयातून सेवा राहत्या वस्तीत पोचविण्याची गरज आहे. ज्यामुळे रुग्ण एकटा पडणार नाही तसेच सामाजिक आधारामुळे आणि जनजागृती मोहिमेद्वारे लोकांचे गैरसमज, कलंक, अंधश्रद्धा यास आळा बसेल.

मानसिक आरोग्य हा क्लिष्ट विषय आहे. त्यामुळे मला वाटले, जर आपल्या मातृभाषेतून हा विषय समजला तर आशा वर्कर्स, अंगणवाडी कर्मचारी आणि एएनएम यांना सोपे जाईल. तसेच रोगाचे लवकर निदान होऊन, सामान्य उपचारात्मक औषधांचे प्राथमिक वैद्यकीय कर्मचारी वितरण करू शकतील. प्रशिक्षित कर्मचाऱयांची वाढ, मनुष्यबळ विकास यासाठी उपयोग होईल. रोगास प्रतिबंध करणे, उपचार आणि इलाज झाल्यानंतर रोग्याने स्वतःही काळजी घेणे गरजेचे आहे असा विचार रुजेल.

पंतप्रधान स्वास्थ्य सुरक्षा योजनेअंतर्गत मानसिक आरोग्य सामान्य आरोग्य विमा अंतर्गत समाविष्ट करावे, असे माझे मत आहे. खेदाची गोष्ट हीच की, गेल्या अनेक वर्षांत मानसिक आघाताविषयीच्या हिंदुस्थानी दृष्टिकोनात फारसा बदल झाला नाही. म्हणूनच, जे लोक मानसिक आजाराने बळी पडतात त्यांच्यासाठी जीवन जरासे सुलभ बनवू शकू. या विचाराने मी अशा लोकांसाठी 164 पृष्ठांचे अनुवादाचे काम स्वेच्छेने, विनामोबदला केले. जिनिव्हामध्ये राहताना अनेक सामाजिक संस्था, सार्वजनिक आरोग्य तज्ञांच्या गटाशी संपर्कात होते. आंतरराष्ट्रीय महिला अलायन्सची प्रतिनिधी म्हणून जागतिक आरोग्य संमेलनात अनेक निवेदने सादर केली.

मला असे वाटले की, माझ्या देशात मानसिक आरोग्याबाबत जागृती झाली तरच या सर्व प्रवासास खरा अर्थ प्राप्त होईल. स्थानिक पातळीवर प्रसारासाठी भाषांतर करण्यामागे आणखी एक वेगळी प्रेरणा आहे. संयुक्त राष्ट्र संघ, जागतिक आरोग्य संघटना आणि इतर जागतिक संस्था यांनी तयार केलेले अनेक शोधनिबंध आणि इतर साहित्य, उद्दिष्ट लोकांपर्यंत पोहोचत नाहीत. तेव्हा जागतिक आरोग्य संघटनेतर्फे मानसिक आरोग्यासंदर्भात केलेल्या मार्गदर्शक पुस्तकाचे मी मराठीत भाषांतर केले. त्याचा फायदा आपल्याला होईल तेव्हाच आपण स्वतःला जागतिक नागरिक म्हणून स्वदेशाशी जोडू शकतो. हे त्या दिशेने एक लहान पाऊल आहे. मानसिक अनारोग्याकडून मानसिक आरोग्याकडे जायचा नवीन संकल्प करूया.

– मानसिक आरोग्य विकारांची प्राथमिक काळजी घेण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) मार्गदर्शक पुस्तकाचे सीमा उपळेकर यांनी केलेल्या मराठी भाषांतराचे ई-बुकच्या रूपात दोन वर्षांपूर्वी प्रकाशन झाले. सामान्य आरोग्य स्थितीत मानसिक विकार, चेतासंस्थेचे विकार आणि अमली पदार्थ द्रव्यासक्तीमुळे होणारे विकार (MNS) यांच्या प्राथमिक उपचारासाठी आणि महाराष्ट्रातील सर्व ग्रामसेवक, प्राथमिक आरोग्यसेवेतील डॉक्टर व इतर कर्मचारी यांच्यासाठी हे भाषांतरीत मार्गदर्शक पुस्तक उपयुक्त ठरेल. मराठी भाषेत असल्याने प्राथमिक मानसिक आरोग्य उपचार करण्यास मदत होईल. सीमा उपळेकर या मूळच्या मुंबईच्या रहिवासी आहेत. त्यांचे पती डॉ. मुकुंद उपळेकर हे जागतिक आरोग्य संस्थेत ‘स्टॉप टीबी’ या विभागात कार्यरत होते. त्यामुळे सीमाताईंनादेखील या सर्व आरोग्यविषयक समस्या जवळून पहाता आल्या. आंतरराष्ट्रीय महिला अलायन्स या संस्थेच्या त्या प्रतिनिधी म्हणून काम करतात. त्यांनी अनेक जागतिक सभांमध्ये भाग घेतला आहे. त्यांनी भाषांतरित केलेल्या मानसिक आरोग्य मार्गदर्शकाचा उपयोग महाराष्ट्रातील गरीब आणि गरजू रुग्णांना नक्कीच होऊ शकेल.

आपली प्रतिक्रिया द्या