मनस्वास्थ्य : गुन्हेगारी प्रवृत्ती आणि मानसिकता

>> शैलजा तिवले

वसईची तरुणी श्रद्धा वालकर हिचा खून करून तिच्या देहाचे 35 तुकडे प्रियकराने केल्याची धक्कादायक बातमी समजल्यानंतर कोणी इतके क्रूर किंवा बीभत्स कसे वागू शकते, हीच प्रतिक्रिया सर्वत्र उमटत आहे. वास्तविक अशाप्रकारे क्रूरपणाने हत्या केलेले हे पहिलेच प्रकरण आहे असे नव्हे. याआधीही अनेक प्रकरणे समोर आली आहेत. यामध्ये हत्या करणारी व्यक्ती नेमकी कोणत्या मानसिकतेत असते, हा मानसिक आजार आहे का, आणि ही मानसिकता निर्माण कशी होते, असे अनेक प्रश्न यानिमित्ताने ऐरणीवर आले आहेत.

कोणताही गुन्हा घडल्यानंतर त्या गुन्हेगाराची गुन्हा करतेवेळी असणारी मानसिकता उलगडा करून सांगणाऱया शाखेला गुन्हेगाराची मानसिकता म्हणजे ‘क्रिमिनल सायकोलॉजी’ असे म्हटले जाते. गुन्हेगाराची विचार करण्याची पद्धत, त्याच्या भावना, गुन्हा करत असतानाची मानसिकता याचा यामध्ये अभ्यास केला जातो. श्रद्धाच्या खून प्रकरणामध्ये गुन्हेगाराने पद्धतशीर योजना आखून केलेला हा गुन्हा असल्याचे स्पष्ट दिसते. त्यामुळे हातून घडलेली चूक असे म्हणता येणार नाही. असा पद्धतशीरपणे गुन्हा करण्यामागे स्वभाव हा प्रमुख घटक असतो. या गुन्हेगारांमध्ये दुसऱयांबाबत आपुलकी, प्रेम ही भावना तुलनेने फार कमी असते. त्यांचे विश्व हे केवळ स्वतःपुरते असते. स्वतःला त्रास झाला की, ते कोणत्याही थराला जाऊन दुसऱयाला त्रास देण्याची भावना त्यांच्यामध्ये असते. अशा व्यक्ती बहुतांशपणे दुसऱयाच्या भावनांची कदर करत नाहीत. जगण्याचे सामाजिक नियम पाळण्याची भावनाही त्यांच्यामध्ये नसते. यामधूनच पुढे जाऊन असे गुन्हे घडतात, असे मानसोपचारतज्ञ डॉ. शैलेश उमाटे यांनी स्पष्ट केले.

गुन्हेगारांमध्ये इतक्या टोकाची मानसिकता कशी तयार होते, याबाबत अधिक खुलासा करताना वोक्हार्ट रुग्णालयाच्या मानसोपचारतज्ञ डॉ. सोनल आनंद सांगतात की, क्रूर पद्धतीने गुन्हा करण्याची मानसिकता एका दिवसात निर्माण होत नाही. ही लहानपणापासून हळूहळू व्यक्तीमध्ये निर्माण होत असते. सुरुवातीला काही छोटे गुन्हे केले जातात. हे गुन्हे समोर येत नाहीत. मग हळूहळू या गुह्यांची तीव्रता वाढत जाऊन क्रूर गुन्हे करण्यापर्यंत मजल जाते. बहुतांश गुन्हेगारांबाबत त्यांचे लहानपणापासून किंवा मोठेपणीही सातत्याने होणारे शोषण कारणीभूत असते. काही गुन्हेगारांमध्ये दीर्घकालीन मानसिक आजारांमुळे ही भावना निर्माण होते. बहुतांश गुन्हेगारांमध्ये अॅण्टीसोशल पर्सनॅलिटी डिसऑर्डर दिसून येतो. काही रुग्णांमध्ये सीडीएच 3 यासारख्या जनुकांमुळे गुन्हेगारी वृत्ती निर्माण होत असल्याचे अभ्यासांमध्ये आढळले आहे.

गुन्हेगारी वृत्ती निर्माण होण्यामागील कारणांची मीमांसा करताना डॉ. उमाटे सांगतात की, चोर, खुनी यांसारख्या सर्व प्रकारच्या गुन्हेगारांमध्ये अॅण्टीसोशल पर्सनॅलिटी डिसऑर्डरची लक्षणे असतात. परंतु याची तीव्रता वेगवेगळय़ा व्यक्तींमध्ये वेगवेगळय़ा पातळीची असते. कुटुंबाचा यामागे खूप मोठा सहभाग असतो. कुटुंब विभक्त झालेले असेल म्हणजेच आई-वडिलांचा घटस्पह्ट झाला असेल किंवा घरामध्ये खूप तणाव असतील, याचा परिणाम मुलांच्या वागण्यावर होतो. मुलांना योग्य पद्धतीने समजून घेतले जात नसेल किंवा त्यांचे शोषण केले जात असेल, तर या सर्व परिस्थितीमधून दुसऱयांच्या भावनांचा आदर न करण्याची वृत्ती त्यांच्यामध्ये वाढत जाते. दुसऱयाची तमा न बाळगता स्वतःसाठीच जगण्याची भावना अधिक वाढायला लागते. ही मुले मग अशाच वृत्तीच्या व्यक्तींमध्ये वावरायला लागतात. यामधून गुन्हेगारी वृत्ती वाढायला लागते. त्यामुळे मग समाजातूनही त्यांना झिडकारले जाते. त्यामुळे ते समाजापासून अजूनच दूर जातात आणि गुन्हेगारी वृत्तीची तीव्रता वाढते.

गुन्हेगारी वृत्तीला खतपाणी घालण्यामागे सामाजिक घटकही कारणीभूत असल्याचे डॉ. सोनल आनंद सांगतात. सोशल लर्निंगच्या सिद्धांतानुसार, गुन्हेगार या त्याच्या जवळचे मित्र, कुटुंब, परिचयाच्या व्यक्ती यांच्याद्वारेच गुन्हे करण्यास शिकलेला असू शकतो. गरिबी, शिक्षण्याच्या संधी न मिळणे हेदेखील यामागची प्रमुख कारणे आहेत. समाजामध्ये सामावून न घेणे, सातत्याने झिडकारले जाणे किंवा समाजाच्या चौकटीमध्ये न बसणे यामुळे अशा व्यक्तींमधील राग, द्वेषाची भावना निर्माण होत जाते. अशा व्यक्तींमध्ये मानसिक आजार असण्याची शक्यताही असते, असे डॉ. आनंद यांनी सांगितले.

गुन्हेगारी प्रवृत्तीची तीव्रता वाढू नये यासाठी काय प्रयत्न करता येतील याबाबत डॉ. उमाटे सांगतात की, लहान वयामध्ये गुन्हे घडल्यास सांभाळून घेणे, त्यामुळेच तर अशा मुलांना सुधारगृहामध्ये पाठविले जाते. त्याच्या वागणुकीमध्ये बदल आणण्यासाठी, समाजामध्ये त्यांना स्वीकारण्यासाठी प्रयत्न होणे, हे मुलाच्या वयाच्या 10 ते 15 वर्षांपर्यंत होणे गरजेचे असते, परंतु दुर्दैवाने काही मुलांबाबत त्यांचे गुन्हे 18 वर्षांनंतरच उघडकीस येतात. त्यामुळे त्यांना सुधारण्यासाठी संधीही मिळत नाही. मग गुन्हेगारी वृत्तीची तीव्रता वाढत जाते. या गुन्हेगारांना गुन्हा केल्यावर फार कमीवेळा पश्चाताप होत असतो. आपला गुन्हा उघडकीस आल्यानंतर आता आपल्याला त्रास होईल याची भीती असते, पण पश्चाताप नसतो.

क्रिमिनल सायकॉलॉजीचे बळी पडू न देणे यासाठीच्या उपाययोजना स्पष्ट करताना डॉ. उमाटे सांगतात की, श्रद्धासारख्या गुह्यांमध्ये तिला मारण्याआधी तिचे मोठय़ा प्रमाणात शोषण केल्याचे उघडकीस आले आहे. नातेसंबंधांमध्ये मग ते लग्न असो की, लिव्ह इन रिलेशनशिप, शारीरिक, लैंगिक, मानसिक अशा कोणत्याही प्रकारचे शोषण होत असेल, तर अशा संबंधांमधून वेळीच बाहेर पडणे अत्यंत गरजेचे आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे संबंध निर्माण होत असताना किंवा संबंधांमध्ये जोडले असताना इतर सामाजिक संबंध जपणेही तितकेच महत्त्वाचे असते. काहीवेळा लग्नाला किंवा लिव्ह इन रिलेशनशिपला कुटुंबाची मान्यता नसते. त्यामुळे कुटुंबाशी संबंध तुटला तरी जोडीदाराव्यतिरिक्त मित्र-मैत्रिणी, इतर नातेवाईक, कामातील सहकारी यांच्याशी संवाद साधणे, संबंध ठेवणे आवश्यक आहे. याचा मोठा सामाजिक पाठिंबा असतो. ज्या वेळेस कुटुंबाचे दरवाजे बंद होतात, त्यावेळी अशा पाठिंब्यामुळे एक सुरक्षितता निर्माण होत असते. आपल्याला कुणीच नाही, आता जोडीदारासोबतच राहावे लागणार ही भावना मूळ धरू लागली की, कितीही शोषण झाले तरी मार्ग सापडत नसल्याने त्याच संबंधांमध्ये अडकून राहतात. त्यामुळे संभाव्य गुन्हा टाळण्यासाठी या मार्गाचा अवलंब करणे अत्यावश्यक आहे.
 [email protected]