हरवलेलं संगीत (भाग 8): मैं तो दूंगी गाली…

>> शिरीष कणेकर

सज्जादला भेटून आल्यावर आपण शहाणे झालोय असं मला वाटत होतं, पण शहाणपण पुरेसं नव्हतं हे मला सी. रामचंद्रना भेटल्यावर कळलं. माझ्या बरोबर माझा संगीतप्रेमी धाकटा भाऊ होता. शहाणपणातही तो माझाच भाऊ होता. गेल्या गेल्या त्यानं विचारलं, ‘लता मंगेशकरचा स्वभाव कसा आहे हो?’
त्यानं विस्तवात हात घातला होता. पर्यायानं मीही. प्रभु कुंज, पेडर रोडपर्यंत पोहोचण्याची आमची शामत नव्हती. मग लताविषयीचं अपार कुतूहल आम्ही कसं शमवणार? तिच्या संगीतकारांशी बोलून. सी. रामचंद्रनी तिला एवढी गाणी दिली होती की, ते खूप काही सांगू शकले असते.

पण प्रत्यक्षात ते त्यांच्या रिवाजाप्रमाणे तारस्वरात ओरडले, ‘स्वभाव? महाxxxx’.
माझ्या मनात आलं की, एवढा जर तिचा स्वभाव तुम्हाला अमान्य होता तर झाडून सगळी भारी भारी गाणी तुम्ही तिलाच का दिलीत? इतर गुणी गायिका नव्हत्या? लताच्या आगमनापूर्वी तुम्ही त्यांच्याकडूनच गाणी गाऊन घेतली होतीत ना? त्यांनी तुमचा विश्वास सार्थ ठरवला होता ना? बरं, लताच्या स्वर्गीय आवाजामुळे तुमचं पारडं तिच्याकडे पूर्णपणे झुकलं असं म्हणायचं तर ‘ऐ मेरे वतन के लोगों’ प्रमिला दातार लताइतकीच चांगली गाते असं म्हणण्याच्या थराला तुम्ही गेला नसतात. तुम्ही स्वतःलाही त्याच रांगेत बसवता. म्हणजे तुम्ही पुरुषातले लता मंगेशकर?

कालांतरानं मला सी. रामचंद्रच्या उद्वेगाचं व उद्रेकाचं कारण लक्षात आलं. प्रतिक्रियेपुरते आपण उरलोय ही भावना त्यांना छळत असावी. नेहरूंच्या ड्रायव्हरला त्यांच्याविषयी खोदून खोदून विचारावं तद्वत लोक आपल्याला लताविषयी विचारतायत या विचाराने त्याचं माथं भडकत असावं. दीर्घकाळ तेही शिखरावरच होते. आज नाहीत, लता अजूनही आहे. म्हणजे काय, तिच्यावर बोलणं एवढाच आपल्या अस्तित्वाला अर्थ उरलाय? माझं संगीत, माझी गाणी यावर तुम्हाला बोलावंसं वाटत नाही? मला पटलं, पण आपली उद्विग्नता, आपला राग दिसू न देता त्यांनी एखाद्या ‘मेलडी’सारखी परिस्थिती हाताळली असती तर बरं झालं असतं, पण ते संगीतकार होते, हाडाचे चापलूस राजकारणी नव्हते.

काही वर्षे लोटली. सी. रामचंद्र यांचा व माझा परिचय वाढला. मी दिसतो तितका मूर्ख नाही हे त्यांना उमगलं असावं. ओ. पी. नय्यर माझ्या दोस्तान्यातला होताच. त्यानं मला ‘कश्मीर की कली’ची एल.पी. विकत आणून भेट दिली होती. (ती आजही ट्रंकेच्या तळाशी आहे. वाजवणार कशावर?) ज्येष्ठ समीक्षक इसाक मुजावर व मी आमच्या मनात आलं की सी. रामचंद्र व ओ. पी. नय्यर या दोन दिग्गजांना गप्पा मारण्यासाठी एकत्र आणावं. बऱ्याच वर्षांत हा योग आला नव्हता (त्यांच्या गप्पांतून काही मिळालं तर लिहावं हा आमचा त्यात स्वार्थ). रामचंद्र लगेच तयार झाले. ओ.पी.नं नखरे दाखवायला सुरुवात केली. ‘कहाँ लिखनेवाले हो यार? उनकी रीडरशिप कितनी है?’

‘नय्यरसाब, कभी तो ये कमर्शियल अँगल छोडो. तुमच्या जुन्या सहकाऱ्याशी तुम्हाला गप्पा मारायला मिळतायत, त्यातही तुम्हाला प्रसिद्धी मिळत्येय, एवढं तुम्हाला पुरेसं नाही का?’ मी विचारलं.
ओ.पी.ची कुरकूर चालूच होती. रामचंद्र माझ्यापाशी गरजले, ‘कसा येत नाही बेटा, बघतोच.’
पण ओ.पी. अडलेल्या म्हशीसारखा अडून बसला होता.
‘क्या प्रॉब्लेम है, नय्यरसाब?’ मी लावून धरलं.
‘अरे यार, सुनो’ ओ.पी. म्हणाला. ‘वो लता को गाली देगा, मैं आशा को गाली देगा। क्यों चाहिए सारा झंझट?’
‘अरे!’ मी किंचाळलो, ‘गाली देगा मतलब? मत देना गाली. गाली देना कंपल्सरी हैं क्या? एवढी प्रदीर्घ व देदीप्यमान कारकीर्द आहे तुम्हा दोघांची. बोलण्यासाठी तुमच्याकडे दुसरे विषय नाहीत? अख्खं आयुष्य तुम्ही संगीतात घातलंत, कानसेनांना तृप्त केलंत, हिंदी चित्रपट संगीताला ललामभूत ठरलात, तुमच्या स्वतंत्र शैलीसाठी तुम्ही ओळखले जाता आणि आता कृतार्थ आयुष्याच्या कातरवेळी तुम्हाला ज्यांच्या आवाजाची दमदार साथ घेऊन तुम्ही उच्चपदी पोहोचलात त्यांना ‘गालीगलोच’ करणे एवढंच तुमच्या आयुष्यात शिल्लक राहिलंय का?’
ओ.पी. काहीच बोलला नाही, पण भेटीला तयारही झाला नाही. आम्हाला भन्नाट वाटलेली आमची कल्पना बारगळली.
या ‘गाली’ प्रकरणात मला ‘जालियनवाला बाग’मधील अनिल विश्वासचं तलत-लता यांचं नटखट द्वंद्वगीत ‘मुख से न बोलू, आँखिया न खोलू’ आठवलं.
त्यात लता म्हणते, ‘मैं तो दूंगी गाली…’

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या