अमर-संगीत

1780

>> शिरीष कणेकर

माझा अमेरिकेत राहणारा डॉक्टर मुलगा अमर खरं म्हणजे हिंदी चित्रपट-संगीतातला डॉक्टर आहे. लताची जुनी ‘सोलो’ गाणी हे त्याचे स्पेशलायझेशन आहे. बाहेर लोकांना हे माहीत नसल्यामुळे माझं बद्द वाजणारं खोटं नाणं चालून गेलंय. एखादं गाणं आठवत नसलं आणि तातडीनं हवं असलं की मी त्याला फोन लावतो. उत्तर त्याच्या ओठांवर असतं.

‘अमर, तू (मराठीतून) लिहीत नाहीस म्हणून’ मी दबून म्हणतो, ‘नाहीतर वाचकांनी भेळेच्या कागदाप्रमाणे माझा चोळामोळा करून मला कोपऱयात फेकून दिला असता.’
‘पपा, ‘नया घर’बद्दल माझं मत तुम्हाला पटलंय ना?’ तो विचारतो.
‘अगदी-अगदी.’ मी म्हणतो, ‘केवळ ते सॉफ्ट, सौम्य संगीत शंकर-जयकिशनचं वाटत नाही म्हणून त्याची उपेक्षा झाली. वास्तविक, त्याचा उदो उदो व्हायला हवा होता. शंकर-जयकिशननं कमाल केली होती.’
‘येस, एकूण एक गाणं लाजबाब होतं. ही घ्या- ‘जा जा जा रे’ (लता), ‘लो आये है’ (लता), ‘ये समा और हम तुम’ (लता), ‘लगाकर दिल परेशां’ (लता), ‘हम उनके पास आते है’ (तलत), ‘उन्हे तू भूल जा ऐ दिल’ (तलत), ‘जवाँ है जहाँ’ (लता)… त्यानंतर शंकर-जयकिशनच्या ‘म्युझिकल हिटस्’मध्ये   ‘नया घर’ येऊ नये इज रिअली सॅड!’
‘तुला आणि मला या गाण्यांची अलौकिकता कळली एवढं पुरे आहे. त्यातून तुला कळलं म्हणजे अख्ख्या अमेरिकेला कळलं असं होत नाही का? कल्पना कर की, डोनाल्ड ट्रम्प नरेंद्र मोदींना उद्देशून म्हणतोय- ‘हम उनके पास आते है.’
अमर हसला.
चित्रपट-समीक्षक इसाक मुजावरांच्या मुलीच्या लग्नाला सुरय्या आली होती. मी तिला लांबून पाहिलं व गप्प राहिलो. अमर मात्र थेट तिच्याजवळ गेला व म्हणाला, ‘मला तुमची बरीच गाणी आवडतात.’

या लोकांना जातील तिथं असं ऐकायची सवय असते. उगीच तोंडदेखलं. देखल्या देवा दंडवत! सौजन्यानं मान डोलावण्याची सवय त्यांनी लावून घेतलेली असते. सुरय्यानं तेच केलं. तिच्यापुरतं संभाषण संपलं होतं, पण अमरच्या बाजूनं ते चालूच होतं. तो सुरय्याला म्हणाला, ‘मला तुमची ही गाणी भावतात- ‘मनमोर हुवा मतवाला,’ (‘अफसर’), ‘ये न थी हमारी किस्मत’ (‘मिर्झा गालिब’), ‘दूर पपीहा बोले’, (‘गजरे’), ‘रातों की नींद’ (‘शोखियाँ’), ‘किसे मालुम था’ (‘विद्या’), ‘ओ दूर जानेवाले’ (‘प्यार की जीत’), ‘बिगडी बनानेवाले, ‘लिखनेवाले ने,’ ‘वो पास रहे या दूर रहे’ (सर्व ‘बडी बहेन’), ‘गमे आशियाना’ (‘1857’), ‘धडकन दिल की’ (‘शमा’), ‘ये कैसी अजब दास्ताँ’ (‘रुस्तुम सोहराब’)…

सुरय्या अक्षरशः अवाक् झाली व आ वासून ऐकत राहिली. कॉलेजात जाणाऱया मुलाची एवढी जाणकारी? त्या दिवशी तिला कळलं की वयाचा रसिकतेशी संबंध नसतो. ती निघाली तेव्हा अमरला हात करून गेली. आपल्याला ओळखणारंच नव्हे तर आपली विस्मृतीप्राय झालेली बाबा आदमच्या जमान्यातील गाणी माहीत असणारं नव्या पिढीत कोणीतरी निघालेलं पाहून तिच्या काळजाला आराम पडला असेल.

अमरनं एवढी गाणी कुठं ऐकली असतील? कुठंही ऐकली असतील; पण त्यानंतर ती मेंदूच्या ‘काँप्युटर’मध्ये फिट बसवून टाकणे हे विशेष. द्रौपदीला वस्त्र्ा पुरवणाऱया भगवान श्रीकृष्णाप्रमाणे तो वेळोवेळी मला गाणी पुरवत असतो. माझी लाज राखतो. मग भाबडे वाचक मला लिहितात, -‘तुम्ही हिंदी चित्रपट-संगीतावर ‘ऍथॉरिटी’ आहात.’ डोंबलाचे!

एका रात्री काही केल्या मला ‘लारे लप्पा, लारे लप्पा’चा चित्रपट आठवेना. काय चाललंय? मी हैराण झालो. शेवटी उत्तररात्री (त्याची दुपार) मी त्याला फोन लावला.
‘एक थी लडकी’ तो तात्काळ म्हणाला, ‘काय चाललंय, पपा?’
‘शिरीष कणेकर बूढे हो गये.’ टी.व्ही.वरच्या जाहिरातीसारखा मी म्हणालो.
वाटलं होतं की त्यानं म्हणावं, ‘शिरीष कणेकर बुढे हो सकते है लेकिन मेरे पपा नही.’
‘ते कुठलं रे खय्यामचं मला आवडणारं तलतचं गाणं?’ मी अंधारात तीर मारतो. दगा देणाऱया स्मृतीशी मी चाचपडत असतो.
‘गर तेरी नवाजिश हो जाये’, ‘गुलबहार’मधलं तो अचूक सांगतो.

वास्तविक ‘फुटपाथ’मधलं खय्यामचं ‘शामे गमकी कसम’ हेही मला अत्यंत प्रिय असलेल्या तलतच्या गाण्यात मोडतं. मग आत्ता माझ्या मनात ‘गर तेरी नवाजिश’ आहे हे त्याला कसं कळलं? त्यानं कसं ओळखलं? अशी ‘टेलीपथी’ काही नवरा-बायकोत असते म्हणतात. माझी माझ्या मुलाबरोबर आहे. नॉट बॅड, आय से.

‘हरवलेलं संगीत’ या माझ्या स्तंभातील लेखमालेत मी के. दत्ता (कोरगावकर) यांची ‘लई भारी’ गाणी दिली होती. ती वाचून अमर मला फोनवर म्हणाला, ‘पपा, तुम्ही ‘रिश्ता’मधलं लताचं ‘बेदर्द जमाने से शिकवा न शिकायत है’ कसं विसरलात?’

बूढे हो गये, दुसरं काय म्हणणार?
लताच्या नव्वदीनिमित्तानं आघाडीच्या संगीतकारांकडे तिनं गायलेल्या सर्वोत्कृष्ट दहा गाण्यांची यादी छापण्याचा किडा माझ्या डोक्यात वळवळला. (लताची गाणी आठवायला आम्हाला काय निमित्तच लागतं.) माझी अमरशी घनघोर चर्चा झाली. त्याचं असं म्हणणं होतं की सी. रामचंद्र, अनिल विश्वास, शंकर-जयकिशन, मदन मोहन, नौशाद, रोशन यांना केवळ दहा गाण्यांत कोंबून बसवणं अशक्य. कुठलीही मोजपट्टी लावा, पण मदन मोहनच्या दैवी संगीताचा अर्क तुम्ही दहा गाण्यांत आणून दाखवावाच. माझा चॅलेंज आहे. या दिग्गज संगीतकारांची कमीत कमी पंचवीस गाणी निवडायला हवीत. त्यानंतरही त्यांना पूर्ण न्याय दिलाय असं आपण छातीठाकेपणे म्हणून शकणार नाही. सज्जाद, श्यामसुंदर, जमाल सेन यांच्याकडे लताची दहा गाणी निघणार नाहीत. म्हणून त्यांची स्वर्गलोकीची गाणी तुम्ही घेणारच नाही की काय? शिवाय तुम्ही कुठलीही गाणी घेतलीत तरी ‘अमूक एक तुम्ही कसं विसरलात?’ असं खडसावून विचारणारे वाचक तुम्हाला नाक्या नाक्यावर भेटतील. तुमची वैयक्तिक आवड असू शकते या दृष्टीनं ते बघूच शकत नाहीत. मुद्दा काय, फरगेट अबाउट इट…’
मी ‘फरगेटलो.’‘
अमर, तू तुझ्या पेशंटस्ना लताची गाणी का ‘प्रिस्क्राइब’ करीत नाहीस?’ मी विचारले.
‘कल्पना वाईट नाही.’ तो हसून म्हणाला.

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या