
>> शिवानी गोंडाळ (मेकअप आर्टिस्ट)
लग्न असो किंवा एखादा खास कार्यक्रम, महिलांना बनारसी साडी नेसायला आवडते. ही साडी दिसायला जेवढी सुंदर असते तेवढीच ती बनवायला प्रचंड मेहनत लागते. बनारसी साडी विणताना त्यावर वेली, फुले किंवा इतर नाजूक डिझाइन चांदीच्या आणि सोन्याच्या तारांनी केले जाते. या साडय़ा नेसल्यानंतर आपल्या एकंदरीत व्यक्तिमत्त्वामध्ये एक वेगळाच उठावदारपणा येतो.
बनारस हे सुती कापडाचे भरभराटीचे केंद्र होते, पण चौदाव्या शतकाच्या आसपास मुघल काळात सोने आणि चांदीच्या धाग्यांचा वापर करून त्यावर ब्रोकेडचे विणकाम केलेली बनारसी साडी हे आज बनारसचे वैशिष्टय़ बनले आहे. बनारसी साडय़ा पाहताना किंवा ती नेसताना असं वाटतं की, वेलीप्रमाणे तिची डिझाइन वरवर चढत जाते. कमळ, चंपा, चमेली, जास्वंद, झेंडू या डिझाइन्समधील काही आकार, तर काही पर्शियन डिझाइन्सदेखील या साडीमध्ये आढळतात. ही साडी बनवायलाही प्रचंड मेहनत लागते. बनारसी साडीमध्ये अनेक नमुने असतात. त्यांना मोटिफ म्हणतात. यातील मुख्य मोटिफ हेच या साडीची ओळख आहे. यामध्ये प्रामुख्याने रेशीम आणि जरीचा वापर केला जातो. बनारसी साडी ही तिचं विणकाम, त्यावरील डिझाइन, तिचा पोत यामुळे जास्त प्रसिद्ध आहे.
बनारसी साडय़ा खरं तर बंगाली लग्नांमध्ये नववधूची मुख्य साडी म्हणून नेसली जात असे, पण सध्या या साडीवरील ब्रोकेड डिझाइनच्या प्रेमामुळे, विविध रंगांमुळे ही साडी आता इतरही नववधू नेसण्यासाठी प्राधान्य देत असतात. बनारसी साडय़ांचे वेगवेगळे प्रकार आल्यामुळे तसेच बनारसी साडी ही सामान्यांनाही नेसण्यासाठी परवडत असल्यामुळे ती सर्रास वेगवेगळय़ा कार्यक्रमांना नेसली जाते.
अशी घ्या काळजी…
या साडय़ा जर प्युअर असतील तर मात्र त्यांची आपल्याला काळजीही तेवढीच घ्यावी लागते. कारण साडय़ांवर या काही केमिकल्सचा मारा केला म्हणजे अनेक वेळा परफ्युम, एखादा बॉडी स्प्रे मारतो, तर तो मात्र या साडी नेसल्यानंतर टाळावा. कारण त्याचा परिणाम तुमच्या या साडीच्या कलाकुसरीच्या तारांवर होत असतो आणि मग ती साडी काळी पडण्याची भीती जास्त असते. त्यामुळे तुम्हाला ही साडी नेसायची असेल तर तुम्ही ती साडी नेसताना आधी परफ्युम किंवा एखादा स्प्रे मारू शकता किंवा एखाद्या अत्तराचा वापर करू शकता, पण साडी नेसल्यानंतर मात्र तसा तुम्ही वापर करू नये.
बनारसी साडी ही स्वतःच ग्रेसफुल अशी असते. त्यामुळे बनारसी साडीवर खूप हेवी मेकअप नाही केला तरी चालू शकतो. मात्र, संध्याकाळच्या पार्टीसाठी किंवा स्पेशल एखाद्या फंक्शनसाठी, लग्नासाठी जर ही साडी तुम्ही वापरणार असाल तर मेकअपचा बेस थोडा हलका हेवी ठेवून त्यावर विंग आयलाइनर तसेच मॅचिंग लिपस्टिक किंवा न्यूड लिपस्टिकही लावू शकता. लग्नासाठी किंवा एखाद्या विधीसाठी आयशॅडो करताना मॅचिंग किंवा थोडा हेवी ठेवला तर तो चांगला दिसतो. तसेच हायलाइटरचा वापर करून तुमच्या चेहऱयावरील काही भाग तुम्ही हायलाइट करू शकता. ज्यामुळे या साडीच्या ग्रेसबरोबरच तुमच्या चेहऱयाचा ग्रेसही वाढून तुमचं एकंदरीत व्यक्तिमत्त्व जास्त खुलून दिसेल.
– या साडीवर तुम्ही एखादा अंबाडा किंवा वेगवेगळय़ा प्रकारची जुडा स्टाइलची हेअरस्टाइल करा. तुम्ही मॅचिंग बिंदी लावली तर तुमच्या चेहऱयाचा ग्रेस आणखी छान दिसेल. डायमंड बिंदीचाही वापर करू शकता. मात्र, त्यावर गोल्डन ज्वेलरी तसेच लाँग नेकलेस किंवा एखादा गळय़ातील चोकर घाला. तसेच साडी लाल रंगाची असेल तर तुम्ही त्यावर कॉन्ट्रास्ट ग्रीन कलरची ज्वेलरी घालू शकता. तसेच नववधूसाठी कुंदन ज्वेलरी या साडीवर सुंदर दिसते. मात्र कुठलीही ज्वेलरी घालताना तुमच्या साडीच्या ब्लाऊजचा गळा थोडा ओपन असायला हवा. एवढं नक्की की, या साडीच्या वापरामुळे तसेच योग्य ज्वेलरी, हेअरस्टाइलचा मेळ साधल्यामुळे तुमच्या व्यक्तिमत्त्वाची नक्कीच छाप पडेल.