
>> शिवानी गोंडाळ (मेकअप आर्टिस्ट)
कॅरेक्टर मेकअप म्हणजे मेकअप साहित्याच्या सहाय्याने कलाकाराला तरुण, वृद्ध, ग्लॅमरस असा क्रिप्टच्या मागणीनुसार बदल करून त्या भूमिकेच्या माध्यमातून ती व्यक्तिरेखा प्रेक्षकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करणे.
मेकअपच्या वेगवेगळ्या उपकरणांच्या सहाय्याने कलाकाराच्या चेहऱयामध्ये, केसांमध्ये वेगळेपणा निर्माण करताना क्रिप्टच्या मागणीनुसार त्या भूमिकेला योग्य प्रकारे न्याय देऊन त्या भूमिकेला प्रेक्षकांसमोर उभी करण्याची जबाबदारी मेकअप आर्टिस्टचीही असते. नाटक, मालिका, चित्रपट यांच्या परिणामाच्या दृष्टीने जसा भूमिकेला योग्य आवाज व अभिनय हवा असतो, त्याचप्रमाणे योग्य मेकअपचीदेखील आवश्यकता असते. अनेक वेळा दाढी, मिश्या, विग यांचा योग्य वेळेस योग्य त्या ठिकाणी योग्य प्रकारे वापर करून ते कॅरेक्टर उभं करावं लागतं, तर अनेक वेळा अजिबात रंग न लावताही एखादं कॅरेक्टर उभ करण्यात कौशल्य पणाला लागतं.
स्टेजवर एखादं कॅरेक्टर उभं करताना त्यातले रंग थोडे बोल्ड असतात. एकंदरीतच मेकअप हा जास्त हेवी असतो. कारण स्टेजवर भूमिका साकारत असताना डोळ्यांची हालचाल किंवा चेहऱ्यातील इतर अवयव प्रेक्षकांच्या शेवटच्या खुर्चीपर्यंत पोहोचण्याची गरज असल्यामुळे हा मेकअप थोडा डार्क असतो. मात्र अलीकडे थोडे लाइट्सचे चेंजेस किंवा वेगवेगळ्या लाईट आल्यामुळे थोडय़ा प्रमाणात हा मेकअप लाईटही करू शकतो. याउलट चित्रपट किंवा फिल्म यांच्या माध्यमातून जेव्हा एखादं कॅरेक्टर उभं करायचं असतं, तेव्हा ते
कॅरेक्टर उभं करताना त्यातले रंग कुठेही जास्त न दिसता ते कॅरेक्टर जेवढं नैसर्गिक दिसेल तेवढा प्रयत्न करावा लागतो आणि त्यासाठी रंगांची जाण असणं फार महत्त्वाचं ठरतं. कारण इथे तुम्ही एखादा स्ट्रोक जास्त जरी दिला तरी तो पडद्यावर त्या कॅमेऱयात लगेच टिपला जातो आणि तुमचं ते कॅरेक्टर, तुम्ही केलेली रंगभूषाही फसते.
स्टेजवर मेकअप करताना लाइनिंग कलर, पॅनकेक यांचा जास्त प्रमाणात वापर होतो. तेच तुम्ही चित्रपटासाठी एखाद्या भूमिकेचा मेकअप करत असाल, तेव्हा मात्र पॅनकेकची फारशी आवश्यकता भासत नाही.
अभ्यास महत्त्वाचा
एखाद्या सिनेमात, मालिकांमध्ये वेगवेगळे बायोपिक साकारत असताना अशा प्रकारचा कॅरेक्टर मेकअप दिसून येतो. उदाहरणार्थ ‘बालगंधर्व’ ही भूमिका सुबोध भावे यांनी साकारली तर ‘लोकमान्य टिळक’ ही भूमिकादेखील त्यांनीच साकारली. मात्र व्यक्ती एक असूनही दोन्ही व्यक्तिरेखा आपल्याला वेगवेगळ्या भासल्या. कारण त्यात मेकअपचा महत्त्वाचा भाग होता. ज्यामुळे सुबोध भावे एकदा ‘लोकमान्य टिळक’ तर एकदा ‘बालगंधर्व’ असल्याचा आभास निर्माण होऊन आपल्याला ते भावले.
‘पा’ या चित्रपटात बिग बी अमिताभ बच्चन यांनी जी भूमिका साकारली आहे, त्या भूमिकेला योग्य अशी मेकअपची जोड नसती तर अमिताभ यांची ‘पा’ ही व्यक्तिरेखा आपल्याला तेवढी भावली नसती. ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ या चित्रपटातील ज्येष्ठ कलाकार दिलीप प्रभावळकर यांची ‘गांधीजी’ ही व्यक्तिरेखा, तर अमोल कोल्हे यांनी मालिकेमध्ये साकारलेली छत्रपती शिवाजी महाराजांची व्यक्तिरेखा आपल्या स्मरणात राहिली.
याचाच अर्थ असा की, एखादी व्यक्तिरेखा साकारत असताना त्या भूमिकेचा जेवढा अभ्यास त्या कलाकाराला अभिनय करताना करावा लागतो, तेवढाच अभ्यास मेकअप आर्टिस्टलाही करावा लागतो. तेव्हाच ती भूमिका अजरामर होते.

























































