
>> शिवानी गोंडाळ , (मेकअप आर्टिस्ट)
नियमित हेअर स्टायलिंगमुळे तुमच्या केसांचे नुकसान होण्याची जास्त संभावना असते. केस राठ होणे, गळणे, तुटणे अशा प्रकारच्या समस्या नियमित स्टायलिंमुळे उद्भवू शकतात. जर तुम्ही केसांवर वेगवेगळय़ा स्टाइल करणार असाल आणि त्यासाठी वेगवेगळय़ा उष्ण तापमानाच्या मशीनरीज वापरणार असाल, तर तुम्हाला हीट प्रोटेक्टर स्प्रे वापरणे अत्यंत गरजेचे असते. जर स्टायलिंग करताना तुम्ही स्ट्रेटनर वापरणार असाल, तर सिरामिक ब्लेड असलेला स्ट्रेटनर वापरा. ज्या मशीनमध्ये तापमानाचे सेटिंग केलेले असेल अशीच मशीन केसांसाठी वापरा. तसेच त्याचे तापमान साधारण 175 अंश ते 200 अंशापर्यंत ठेवू शकता. मात्र 200 अंशाच्या पुढे तापमान ठेवल्यास केस खराब होण्याची भीती जास्त असते.
उष्ण तापमानाच्या मशीन तुमच्या केसांवर फिरवताना टाळूच्या फार जवळ नेऊ नये. केसाच्या एकाच भागावर दोन ते तीनपेक्षा जास्त वेळा स्ट्रेटनिंग मशीन फिरवू नये. जर हे स्टायलिंग करताना तुम्ही हेअर स्प्रेचा वापर करणार असाल, तर केसांचे टेक्चर बघून त्याप्रमाणे हेअर स्प्रेच्या होल्डिंग पॉवरची निवड करा.
हेअर स्प्रे वापरताना पॅराबिन आणि सल्फेटमुक्त स्प्रेचा वापर करा. हेअर स्प्रेची फवारणी करताना ती साधारण आठ ते दहा इंच लांब हेअर स्प्रे धरूनच करावी. तसेच हेअर स्प्रे केल्यानंतर साधारण पाच ते दहा मिनिटे थांबून मग स्टाइल करण्यास घ्यावी.
हळुवार मसाज आवश्यक
हेअर स्टायलिंगमुळे तसेच उष्ण तापमानांच्या हेअर अॅक्सेसरिज वापरल्यामुळेही केसांचे नुकसान होते. अशा वेळेस केसांना कोमट तेलाने मालीश करणे ही केसांसाठी मूलभूत गरज असते. केसांना मसाज केल्यामुळे केस मऊ होतात तसेच त्यातील ओलावा पुर्नसंचयित होऊन केस भुरभुरीत, राठ होण्यापासून बचाव होऊ शकतो.
केसांना मालीश करताना एका छोटय़ाशा वाटीमध्ये तेल घेऊन त्यामध्ये कापसाचा बोळा बुडवून त्याने केसांना हलके हलके दाबत तेल लावावे किंवा बोटांच्या पेरानेही तुम्ही केसांना तेल लावू शकता. तसेच बोटांनी केसांवर मालीश करताना हलका हलका दाब द्यावा व स्किन क्लॉकवाइज व ऑण्टिक्लॉकवाइज फिरवत मालीश करावे. ज्यामुळे केसांमधील रक्ताभिसरणाची क्रिया तीव्र होऊन केसांच्या वाढीस मदत होते. मात्र हे मालीश करताना तेल अगदी 24 तासांपेक्षा जास्त केसांवर राहू नये याची काळजी घेतली पाहिजे.
– शॅम्पू किंवा पंडिशनर वापरताना ते पाच ते सात पीएच असलेले वापरा. जास्त घट्ट हेअर बँड लावून ठेवू नका. त्यामुळे केस अर्धवट तुटू शकतात.
– केस धुतल्यानंतर ते सुती कापडाने किंवा सुती टॉवेलने पुसताना जास्त घासून पुसू नये, तर बोटांनी हलके हलके केस पुसावे.
– केसांना जर सिरम लावायचे असेल तर केस हलकेसे ओले करून मग त्यावर सिरम लावावे व स्टायलिंग करण्यास घ्यावी.
– नियमित स्टायलिंग ही जर आपली गरज असेल तर मात्र स्टायलिंग करताना काळजी म्हणून हेअर मास्क वापरल्यास उत्तम. हीटमुळे केसांची हरवलेली आर्द्रता भरून काढण्याचे काम हे हेअर मास्क करतात.
अशा प्रकारे जर तुम्ही या टिप्स पाळून केसांची स्टायलिंग करत असाल, तर केसांचे नुकसान टळून केस निरोगी व चमकदार राहण्यास मदतच होईल.