अवती /भवती – शुभाशीर्वाद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>>सुहास मळेकर

तुम्ही थकून भागून येऊन सगळं आवरून शांतचित्ताने झोपलेले असता. अगदी सगळीकडेच पक्षी-प्राणी आपापल्या ठिकाणी निवांत झालेले असतात आणि अचानक एक मोठा बार होतो किंवा आधी तडतड ताशा वाजायला लागतो, त्याचे रूपांतर मोठमोठे ढोल वाजण्यात होते आणि तुम्ही ‘आता झोपेचं खोबरं झालंच’ म्हणून चुळबूळ करू लागता. कुठेतरी वरात निघालेली असते. कदाचित चार-पाच डोकीच नाचत असतात. पण रात्रीच्या निरव शांततेत तो आवाज इतका भयंकर वाटत असतो की, अस्वस्थ व्हायला होतं.

अशी झोपमोड झाल्यावर असहाय्य्य माणूस चडफडण्याशिवाय काहीच करू शकत नाही तर मग ही तगमग वऱहाडाला पुढच्या नवजीवनाच्या प्रवासाला शुभाशीर्वाद कसे देईल? याचा विचार नको का मनांत यायला?

तुम्ही निरीक्षण केलंत तर एक गोष्ट लक्षात येईल, अलीकडे मध्यरात्रीचे बारा वाजले की चित्रविचित्र आवाजाच्या धमाक्यांची मालिका सुरू होते, मध्येच एखादा मोठा बार वाजतो… पुनः पुन्हा तसेच होत राहते. जोपर्यंत सगळे फटाके संपत नाहीत. पूर्वी हे फक्त वार्षिक उत्सवात असे किंवा नंतर नंतर ते क्रिकेट वगैरेंसारख्या उन्मादावर आले, आता ते वैयक्तिक पातळीवर आलेय.

वाढदिवसासारखेच वरातींनी अलीकडे कहर केला आहे. परवा मध्यरात्री दोन-अडीचला दौरा आटोपून येत असताना अशीच एक वरात बेधुंद नाचवताना रोडच्या बाजूलाच एका वस्तीत पाहिली. डीजे तर कानठळय़ा बसवणारा होताच, पण अधूनमधून फटाक्यांचा आवाजही तितकाच. तिथून पुढे जात असतानाच कान बधिर झाले तर तिथे आजूबाजूला राहणाऱयांची अवस्था किती वाईट असेल. कोणी पेशंट असेल, कुणी गर्भवती असेल, वयोवृद्ध असतील, लहान मुले असतील…

मोकळय़ा जागेत, मोकळय़ा रस्त्यावर, मंडपात, सभागृह- हॉलमध्ये असे उत्सव सोहळे मर्यादित आवाजात, मंगलसुरात व्हायला हवेत. रोषणाई, आतषबाजी असायलाही कुणाची हरकत नसेल. पण आता त्यासाठी मोठय़ा आवाजाची स्पर्धा सुरु झाली आहे की काय अशी शंका यावी.

‘मनाप्रमाणे वागलात तर चालेल, पण मुंगीलासुद्धा त्याचा त्रास होऊ देऊ नका’ असे कुठेतरी सुभाषित वाचले होते, मात्र ते कागदावरच राहिले. सर्वसामान्यतः असे विचार खूप मागे पडले. चंगळवादापुढे आता कुणाची कुणाला पर्वा नाही.

‘आपण भले की आपले काम’ म्हणणाऱयांनासुद्धा आता स्वास्थ्य नाही. तुम्ही तुमच्या कामात व्यस्त असलात तर तुमचे लक्ष वेधून घेण्याचे प्रकार सर्रास वाढले आहेत.

खरे तर लग्न, वाढदिवस, मिरवणुका असे आनंदाचे क्षण इतरांचे आशीर्वाद, शुभेच्छा मिळविण्यासाठी साजरे करायचे असतात, पण अशा पद्धतीने ते रात्री अपरात्री साजरे करून लोकांची तळमळ का ओढवून घेतात? कदाचित उत्साहाच्या भरात हे कुणाच्या लक्षात येत नसेल. पण असे लक्षात आणून दिल्यानंतर तरी अशांनी समंजसपणे शुभाशीर्वाद मिळवायला हवेत.