>> स्वाती मेहेंदळे
एक संध्याकाळ… मंद वारा वाहत आहे… घराच्या गच्चीत किंवा बाल्कनीत तुम्ही बसून मस्तपैकी चहा किंवा कॉफीचे घोट घेत आहात. सोबतीला लता, आशा, रफी यांचे सूर कानावर पडत आहेत आणि अचानक तुमच्या समोरच्या टेबलावरचा मोबाईल खणखणतो तर तुमची समाधी नक्कीच भंग होईल. कानाला आणि मनाला आनंद मिळणारं संगीत… दुःखावर, विरहावर उतारा म्हणजे संगीत… आपल्या आयुष्यात संगीत नाही असा आपण विचारही करू शकत नाही.
फार पूर्वीपासून संगीत आणि त्याचे प्रकार आपल्याला भुरळ घालत आले आहेत. शास्त्राrय संगीत जे सगळ्या संगीताचा पाया आहे असं मानलं जातं. हिंदुस्थानी आणि कर्नाटक संगीत असे त्याचे प्रकार आहेत. संगीत म्हणजेच योग्य पद्धतीने गाणे. हिंदुस्थानी संगीत हे गायन पेंद्रित आहे असे मानले जाते. विविध राग आणि त्याचा विस्तार याचा समावेश हिंदुस्थानी संगीतात होतो. तानसेन, ज्यांना हिंदुस्थानी संगीताचे जनक मानले जाते. त्यांच्या गायन शैलीने अनेकांना प्रेरणा दिली आहे. अनेक हिंदुस्थानी संगीत शिकवणारी घराणी त्यांच्याशी जोडली गेली आहेत. तर कर्नाटक संगीतही दक्षिण भारताशी जोडले गेले आहे. ज्यात अनेक देवदेवतांचे गुणगान भजन स्वरूपात सादर केले जाते.
यानंतर आपण लोकसंगीताचा विचार केला तर याचा उगम ग्रामीण भागात झाला असं दिसून येतं. पूर्वापार चालत आलेली भजनं, ओव्या, भारुडं, कव्वाली, ठुमरी, लावणी, गरबा यांचा यात समावेश होतो.
सुगम संगीत याचा अर्थच मुळी जे समजायला आणि गायला सोपे ते सुगम संगीत किंवा रंजन करणारे राग असंही म्हटलं जातं. शास्त्रीय संगीत शिकायला आणि समजायला तुलनेने अवघड समजले जाते. ते शिकणाऱ्याला प्रदीर्घ अभ्यास अत्यंत चिकटीने आणि नित्यानेमाने करावा लागतो.
नाटय़संगीत, नावातच त्याचा अर्थ दडला आहे. ज्या नाटकात नाटय़ आणि संगीत अशा दोन्हीचा संगम असतो ते नाटय़संगीत. नाटकातील या संगीतला किंवा गीताला पद असं म्हणतात. या गाण्यात त्या नाटकातील कथानाकाचा भाग सांगितला जातो. महाराष्ट्रातील मुख्य गीत प्रकार म्हणजेच नाटय़संगीत. स्वर रचनेमध्ये कवितेचे शब्द बसवले की गीत जन्माला येते. या गीतांना चाली लागतात. त्या जनमानसात रुजतात, त्यांना भुरळ घालतात. मनात खोलवर रुजतात. गीत तयार होताना ते कोण गाणार, त्याला चाल कोण लावणार हे कदाचित ठरत नसेल, परंतु तयार झालेलं गाणं मनाचा ठाव घेतं ही नक्की. सध्याचा लोकप्रिय गीत प्रकार म्हणजे पॉप किंवा हिप-हॉप/रॅप हा होय. जुन्या गाण्यांना नवीन चाली लावून ती सादर करणे. अनेक गाण्यांतील थोडा थोडा भाग, कडवी घेऊन एक गाणं सादर करणे असे प्रकारदेखील लोकप्रिय आहेत.
गाण्यांचे असे अनेक प्रकार, आकृतिबंध आले आणि गेले. तरीही भावना जागृत करण्याची ताकद संगीतातच आहे. तुम्हाला वेगळ्या जगात नेण्यासाठी, विसरलेल्या आठवणी ताज्या करण्यासाठी, आशा व्यक्त करण्यासाठी या सगळ्या भावनांचा आरसा संगीतच शेवटी अजरामर राहील यात शंका नाही.