
>> श्याम बसप्पा ठाणेदार
जम्मू-कश्मीरमधील पुलवामा येथे अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यात 40 हून अधिक हिंदुस्थानी जवान शहीद झाले. जगात हिंदुस्थानची ओळख शांतताप्रिय राष्ट्र अशी आहे. हिंदुस्थानने कधीच कोणत्याही देशाच्या कुरापती काढल्या नाहीत. शेजारी राष्ट्रांशी मैत्रीचे शांततापूर्ण संबंध राहावेत अशीच हिंदुस्थानची भूमिका राहिली आहे. म्हणूनच हिंदुस्थानने नेहमीच संयम राखला आहे आता मात्र या संयमाचा अंत होऊ लागला आहे. हिंदुस्थानशी समोरासमोर युद्ध करण्याची पात्रता नसल्याने अतिरेक्यांच्या मदतीने पाकिस्तान हिंदुस्थानात असे भ्याड हल्ले करीत आहे. उरी असो की पठाणकोट, अतिरेकी सातत्याने हिंदुस्थानी जवानांना लक्ष्य करीत आहेत. आपण मात्र निषेध व्यक्त करतो, पण सातत्याने होणारे हे हल्ले रोखणे गरजेचे आहे. विरोधी पक्षात असताना पाच के बदले पचास म्हणणारे सत्तेत आल्यावर मात्र अतिरेक्यांचा बीमोड करण्यासाठी कोणतीही ठोस कृती करीत नाही. केवळ सर्जिकल स्ट्राइक करून पाकिस्तान सुधारणार नाही. त्याही पेक्षा मोठी कारवाई करावी लागेल तरच पाकिस्तानची खोड मोडेल. आज जरी हिंदुस्थानात हा हल्ला झाला असला तरी दहशतवाद ही केवळ हिंदुस्थानचीच समस्या नाही तर ती वैश्विक समस्या आहे. दहशतवाद आज जगातील प्रत्येक देशाचे दार ठोठावत आहे. अमेरिका, इंग्लंड, फ्रान्स, रशिया, जर्मनी, ऑस्ट्रेलिया या प्रगत देशांनादेखील दहशतवादाची झळ बसली आहे. म्हणूनच दहशतवादाचा मुकाबला करायचा असेल तर जगातील सर्व देशांनी एकत्र येणे गरजेचे आहे. पाकिस्तानसारखा देश जो सातत्याने दहशतवाद्यांना मदत करतो अशा देशांवर आंतरराष्ट्रीय समूहाने कारवाई करावी. दहशतवाद्यांना मदत करणाऱया देशांवर आर्थिक निर्बंध आणावेत प्रसंगी त्या देशांवर बहिष्कार टाकून त्यांची कोंडी करावी. दहशतवाद्यांना मदत करणाऱया देशांची कोंडी केल्याशिवाय दहशतवाद संपणार नाही अमेरिकेसारख्या सुपर पॉवर देशांनी त्यासाठी पुढाकार घ्यायला हवा.

























































