>> विनायक
सध्याचे दिवस पावसाचे. कुठे तो धो-धो पडतोय तर काही ठिकाणी संततधार बरसतेय. सप्टेंबर अखेरपर्यंत आपल्या देशातला पावसाचा विशेष मोसम असायला हवा. पूर्वी 7 जूनला सुरू होणारा पाऊस वारे, वादळ, समुद्राला उधाण येणे, नद्यांचे पूर या सर्व गोष्टींचा अनुभव देशभरातील लोक ‘नेमाने’ घ्यायचे. म्हणूनच ‘नेमिची येतो मग पावसाळा; हे सृष्टीचे कौतुक जाण बाळा’ अशी कविता पाठय़पुस्तकात असायची. हल्ली कशाचाच नियम म्हणजे ‘नेम’ राहिलेला नाही, मग निसर्ग तरी त्याला अपवाद कसा असावा? तोही ‘मनमानी’ करतोच. त्यातून कुठे गाव, शहरे बुडवणारा महापूर तर काही ठिकाणी थेंबभर पाणी पडत नाही अशी अवस्था होते. पावसाची वाट पाहणाऱया शेतकऱयाच्या डोळय़ातच पाणी उमटतं. गेली अनेक वर्षे निसर्गचक्र काहीसे बिघडलेय. ग्लोबल वॉर्मिंगचा परिणाम असो की, निसर्गात आपसूक होणारा बदल, त्याचा थेट परिणाम शेतीवर आणि पिण्याच्या पाण्यावर झाल्याने सामान्यजन कासावीस होतात.
त्यातच वादळे, चक्रीवादळे आली तर पाहायला नको. काही दिवसांपूर्वी चीन-हाँगकाँगला धडकलेल्या महाचक्रीवादळाने रस्त्यावरच्या कारसुद्धा भिरकावून दिल्या. दाट पावसाळी ढगांच्या गाभ्यात कोंडलेल्या शक्तिशाली वाऱयामुळे जी भयानक वळणे घेतात त्याने मानवी वस्तीबरोबरच जंगलांचाही विनाश घडू शकतो. दोन वर्षांपूर्वी कोकणात आलेल्या ‘निसर्ग’ वादळाने केवढा हाहाकार उडवला होता याची कल्पना सर्वांना आहेच. त्या मानाने पश्चिम किनाऱयावर कमी वादळे येतात. पूर्व किनाऱयावरील बंगाल आणि ओरिसाला वादळांचा तडाखा वारंवार बसतो. अमेरिकेतही पूर्व किनाऱयावरच्या फ्लॉरिडा राज्याला सातत्याने वादळांचा सामना करावा लागतो.
वादळांना जगात वेगवेगळय़ा ठिकाणी वेगवेगळी नावे आहेत. मूळ ‘सायक्लोन’ शब्द मूळच्या ग्रीक ‘सायक्लॉस’वरून आलेला आहे. त्याचा अर्थ वेटोळे; परंतु हे मेघमालेचे वाटोळे उग्र स्वरूप धारण करते तेव्हा ते बऱयाच गोष्टींचे वाटोळे करते. वादळ तयार होण्याची प्रक्रिया सोप्या शब्दात सांगायची तर समुद्रावर अतिरिक्त उष्णता निर्माण होऊन वातावरणात अस्थिरता येऊ लागली की, कमी दाबाचे पट्टे निर्माण होऊन वादळे आकार घेतात. गारा, दमट हवा, पाऊस या वादळाभोवती गुरफटत जाऊन त्याचा व्याप वाढतो. ते एकदा गरगरायला लागले की, ताशी 80 ते 250 किलोमीटर वाऱयाच्या वेगाने घोंघावू लागते. सर्वाधिक भीषण आणि त्यापलीकडच्याही अतिभीषण कमी वादळांचा क्रमांक पाचच असतो. कधी कधी 7 ते 8 क्षमतेचे किंवा श्रेणीचे वादळ आल्याचे म्हटले जाते ते त्याच्या व्यापक उत्पातामुळे, पण युनोच्या नियमानुसार सर्वाधिक तीक्र वादळ 5 प्रतीचेच असते.
पृथ्वीच्या अक्ष (ऍक्सिस) कललेला आहे हे आपण शाळेतच शिकलोय. तो उत्तर गोलार्धात उजव्या तर दक्षिण गोलार्धात डावीकडे असतो. परांचन गतीमुळे पृथ्वी या अक्षाभोवती गिरकी घेते त्याला ‘रोटेशन’ म्हणतात. पृथ्वीच्या उत्तर गोलार्धातली म्हणजे आपल्याकडची वादळे ‘क्लॉकवाइज’ किंवा घडय़ाळाचे काटे फिरतात तशी गरगरतात, तर दक्षिण गोलार्धातली ऍण्टिक्लॉकवाइज भिरभिरत राहतात.
पृथ्वीच्या त्या त्या वेळेच्या हवामानानुसार वादळे कमी-अधिक आकार आणि तीक्र किंवा सौम्य स्वरूप धारण करतात. अमेरिकेत भयंकर वेगाने गरगरणाऱया चक्रीवादळाला ‘टॉनॅडो’ म्हटले जाते. कॅरिबियन समुद्रावरच्या वादळांना ‘हरिकेन’ संबोधले जाते. चिनी समुद्रातील वादळे ‘टायफून’ तर आपल्याकडे ‘सायक्लोन’ आणि जपानमध्ये ‘तायफू’ म्हटले जाते. एकूण अर्थ एकच. अनर्थकारी महाचक्रीवादळ. 2005 मध्ये पूर्वेकडून पश्चिमेकडे संपूर्ण पॅसिफिक महासागर ओलांडून सुमारे 13 हजार किलोमीटरचा प्रवास केलेले टायफून ‘जॉन’ तब्बल 31 दिवस टिकले, तर सर्वात छोटे 18 किलोमीटर वेगाचे ‘मार्को’ वादळ 2008 मध्ये मेक्सिकोवर आदळले.
अमेरिका, रशियासारखे देश वादळांना 1953 पासून ‘नावं’ ठेवतायत. 2004 पासून हिंदुस्थानसह 13 देशांना वादळांचे नामकरण करण्याचा मान मिळाला, मात्र एकदा श्रीलंकेने त्यांच्याकडच्या शांतताप्रिय महासेन राजाचे नाव चक्रीवादळासारख्या उत्पाताला दिल्याने आक्षेप घेतला होता. त्यामुळे कोणत्याही समूहाच्या भावनांचा आदर करूनच वादळाचे ‘नाव’ ठेवावे लागते. अर्थात नाव कोणतेही दिले तरी परिणाम एकच, आपत्तीचा. आता वैज्ञानिक प्रगतीमुळे अशा वादळांचा इशारा 24 ते 36 तासआधी देता येतो एवढाच काय तो दिलासा.