विज्ञानरंजन – सूक्ष्म सजीवांचे ‘जग’

>> विनायक

या लेखमालेत आपण पूर्वी मुंग्यांविषयी वाचलंय. या वेळी पावसाळय़ात ‘दर्शन’ देणाऱ्या अनेक सूक्ष्म कीटकांची माहिती थोडक्यात घेऊ या. परवा जुन्या पुस्तकांच्या चवडीमधले (गठ्ठय़ातलं) एक पुस्तक संदर्भासाठी बरेच दिवसांनी काढले. वाचता वाचता पानावर मध्येच एक पूर्णविरामाच्याही कमी आकाराचा सूक्ष्म कीटक तुरुतुरु चालताना आढळला. स्वच्छतेसाठी काळजी घेऊनसुद्धा तो त्या पुस्तकाच्या बाइंडिंगमध्ये दडला होता. क्षणभर त्याच्याकडे पाहतच राहिलो. या एवढय़ाशा सजीवाचे ‘आयुष्य’ ते काय! पण त्याच्यासाठी ते मोठंच होते. अशा कीटकांना साधा फुटबॉलसुद्धा पृथ्वीएवढा भासत असेल, पण नाही. सभोवतालच्या आकलनाची त्यांची नैसर्गिक ऊर्मीही सूक्ष्मच. फुंकर मारताच तो जीव उडून गेला.

मनात विचार आला की, पृथ्वीवरच्या प्राण्यांमध्ये भूपृष्ठावर हत्ती किंवा पूर्वीचे महाहत्ती (ऍमथ), त्यापूर्वी अक्राळविक्राळ डायनॉसोर, ऍनाकोंडासारखे आजही आफ्रिकेत आढळणारे सरपटणारे सजीव, पाण्यातील प्रचंड सुसरी आणि दहा हत्ती पोटात सामावून घेण्याची क्षमता असलेले नील देवमासे (ब्लू व्हेल). तसेच आकाशात उंच भरारी घेणारे, प्रसंगी हरिणासारखं ‘भक्ष्य’ उचलून उडणारे गरुड ही किती प्रकारची ‘महाकाय’ मंडळी पृथ्वीवर अवतरली! त्यातले डायनॉसोर वगळता बाकीची आहेतच. आपण त्यातले बरेच सजीव प्राणिसंग्रहालयात पाहतो.

मग याच्या दुसऱया टोकाचे अतिसूक्ष्म सजीव कसे असतात? त्यापैकी काही तर सातत्याने आपल्या भेटीला येत असतात. काही दिसणार नाहीत इतके सूक्ष्म, तर काही लवकर हाती लागणार नाहीत असे चपळ. पावसाळय़ात तर अर्थवर्म किंवा गांडूळ अनेक ठिकाणी दिसतात. ओलसर जागी ती बरोबर निसर्गक्रमाने येतात. जमीनही भुसभुशीत करून शेतकऱयाला मदत करतात. त्यामुळे अर्थवर्म फार्मिंग ही कल्पना जगात सर्वत्र प्रत्यक्षात आणली जाते.

मात्र त्याचबरोबर पिकांवर डल्ला मारणारे विविध कीटक, अळय़ा, जमिनीतील उधई (वाळवी) तसेच घराचा ताबा घेणारी झुरळं, डास-मच्छर, माश्या, डोळय़ांभोवती घोंगावणारी चिलटं यांचा ‘बंदोबस्त’ वेळीच करावा लागतो. अशा कीटकांवर कविता वगैरे लिहिणं कठीणच, परंतु श्रेष्ठ विडंबनकार आणि चतुरस्र लेखक आचार्य अत्रे यांनी त्यांच्या ‘झेंडूची फुले’ या काव्यसंग्रहात दोन कविता लिहिल्या आहेत. एक आहे ‘पाहुणे’… घरात अनाहूतपणे ठाण मांडून बसणाऱया पाहुण्यांचे वर्णन आचार्य अत्रे यांनी मिश्कीलपणे असे केलंय…

‘डास, चिलटे, घुंगुरटी, बाळा रे जेथूनि येती…’ तिथून हे असले नकोसे पाहुणे येतात असे एक कष्टी माता डोळय़ांत पाणी आणून आपल्या लहान मुलाला सांगते. दुसरी कविता सतत घोंगावणाऱया, घरात अन्नावर भिरभिरणाऱया माश्यांवर. त्या कवितेचे शीर्षक आहे ‘कषायपेयपात्र पतित मक्षिकेप्रत!’ म्हणजे चहाच्या कपात पडलेल्या माशीला उद्देशून! असेसुद्धा काव्य विषय असू शकतात हे प्रभावी विडंबनकारच जाणू शकतो.

… तर जगातला सर्वात सूक्ष्म सजीव आकाराने एका मिलिमीटरच्या 200व्या भागाइतकाही ‘अतिसूक्ष्म’ असू शकतो. सतत वाचन करणाऱयाला चेष्टेने ‘पुस्तकी किडा’ म्हणतात. असा खराखुरा अतिसूक्ष्म कीटकही तिथे सुखाने नांदतो. याशिवाय खेडोपाडय़ांत, पाणथळ जागी जास्त आढळणाऱया पिसवा (फ्ली) 1 ते 2 मिलिमीटरच्या असतात. हवेत घोंगावणारी चिलटं, घुंगुरटी तशीच. यातील प्रत्येक जण आपल्यासाठी उपद्रवी. वाळवीचे (उधई) पाच-सात सूक्ष्म प्रकार घरातल्या लाकूड सामानाची वाट लावू शकतात. तीही नकळत. ‘डस्ट’ कीटक (माइट्स) तर आपल्या त्वचेच्या वरच्या थरातल्या सूक्ष्म पेशी खाऊन जगतात. ते आपल्याला समजतही नाही.

माश्यांमध्ये मधमाश्या उपकारक असतात. मात्र घरमाश्या (हाऊसफ्लाय) अत्यंत त्रासदायक आणि सर्वरोगप्रसारक. अशा माश्यांसारख्या कीटकांच्या सुमारे दीड लाख विविध प्रजाती आहेत. ‘एम. डोमेस्टिया’ प्रकारात घरात प्रादुर्भाव करणाऱया माश्यांचा समावेश होतो. एकावेळी शंभर अंडी घालणारी ही माशी रस्त्यावरच्या घाणीपासून घरातल्या अन्नापर्यंत कुठेही संचार करते. काळसर तपकिरी रंगाच्या या सुमारे 6 ते 6 मिलीमीटर वाढणाऱया माश्या अन्नावर बसल्या की, त्यांच्या स्पॉन्जी पायांतले आणि लाळेतले विषाणू (बॅक्टेरिया) अन्न दूषित करतात. त्यामुळे खाद्यपदार्थ आणि अन्न उघडय़ावर ठेवू नये हे शालेय जीवनापासून शिकवले जाते.

पावसाळय़ात आणि थंडीतही त्रासदायक कीटक म्हणजे डास किंवा मच्छर. त्यांच्याही 3,600 प्रजाती आहेत. यातील काही डास खास मलेरियाचे. त्यांना ‘ऍनाफेलेस’ म्हणतात. आपल्याकडेच नव्हे, तर जगातही या डासांचे आणि मलेरियाचे उच्चाटन करणे ‘प्रगत’ जगाला शक्य झालेले नाही. डासरोधक रसायने, मॉस्किटो रेपेलन्ट अशा अनेक गोष्टी, अगदी डास मारण्याच्या ‘रॅकेट’सुद्धा मिळतात, परंतु खिडक्यांना स्टेनलेस स्टीलची बारीक जाळी आणि झोपताना मच्छरदाणी हे सर्वात निरोगी उपाय आहेत. आपल्याकडे डास, माश्या, चिलटांचा ‘हंगाम’ पावसाळय़ापासून सुमारे सहा महिने टिकतो. थंडीमध्ये डास होतात आणि उन्हाळय़ाची चाहूल लागताच त्यांचा वावर मंदावतो. तो मोसम लाल मुंग्यांचा. असे निसर्गाचे जैविक चक्र सुरूच राहते. पृथ्वीवरच्या जैववैविध्यातले हेसुद्धा आपल्यासारखेच सजीव. त्यांचा उपद्रव आपल्या आरोग्यासाठी घातक म्हणून काळजी घ्यायलाच हवी. पुढे केव्हातरी ‘अवध्य’ झुरळं आणि उपद्रवी उंदरांविषयी.