लेख – गणेशोत्सव आणि कोरोनाची बंधने

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> सीमा श्रीराम शास्त्री मोडक

लोकमान्य टिळकांनी सुरू केलेला श्रीगणेशोत्सव कोरोनामुळे कसा साजरा करावा हा प्रश्न सगळय़ांसमोरच होता. पण प्रश्न असला की आपण उत्तर शोधण्याच्या प्रयत्नात असतोच. सगळय़ात महत्त्वाचं म्हणजे बाप्पा आपल्या सगळय़ांच्या मनात आहे. आपला भाव महत्त्वाचा. त्यामुळे या उत्सवातील दिखावा आणि देखावा यावर्षी आपण टाळला. यावर्षी आपल्या भावनांना आवर घातला.

सार्वजनिक गणेश मंडळांनी बाप्पाची लहानशी मूर्ती बसवून साधेपणाने परंतु अगदी नेहमीप्रमाणे मनोभावे पूजा करण्याचा निर्णय घेतला. रोज कोणी आरती करायची, कोणी प्रसाद वाटायचा, हार-फुलं कोणी आणायची ही सगळी पूर्वतयारी सर्वांनीच केली. ज्यांना शक्य आहे त्यांनी ऑनलाईन दर्शनाची सोय केली. आरतीचा व्हिडीओ सोशल मीडियावर पाठवल्याने भक्तांची गर्दी कमी झाली. ऑनलाईन आरती करणे शक्य झाल्याने अनेक गोष्टी सहज साध्य झाल्या.

सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढलेला दिसतो. त्यामुळे सगळय़ांनीच स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी घराबाहेर शक्यतो जाऊ नये. महत्त्वाच्या कामासाठी जावेच लागल्यास मास्क, सॅनिटायझर व सुरक्षित अंतर यांचे काटेकोरपणे पालन करावे. गणेश मंडळांनी देखावे करण्याचे टाळल्याने भक्तांही गर्दी आपोआपच रोखली गेली. त्यामुळे कोरोनाचा संसर्गही वाढण्याला आळाला बसला. गणेशोत्सवाच्या काळात मंडळाचे अध्यक्ष किंवा पदाधिकाऱयांनीच सामाजिक गर्दी न करण्याचे आवाहन केले. तसेच वर्गणी जमा करावयाची असल्यास ऑनलाईन करण्याची सोय केली. भक्तांनीसुद्धा मंडळांच्या नियमाची अंमलबजावणी केली.

केवळ सार्वजनिक गणेश मंडळांनीच नाही तर घरोघरी गणपती मांडणाऱया सर्व भाविकांनीही काही बाबींचा अवश्य विचार करावा. आपल्या बाप्पाच्या दर्शनाला शक्यतो इतरांना बोलावणे टाळावे. त्याचप्रमाणे आपणही इतरांकडे बाप्याच्या दर्शनाला जाणे टाळावे. सगळय़ांनीच आपल्या नातेवाईक व इष्टमित्रांना आपल्या बाप्पांचे आराससहीत फोटो पाठवावेत. शक्य असल्यास व्हिडीओ कॉल करून दर्शन घ्यावे व गप्पाही कराव्यात. आरास साधी, घरी असलेल्या साहित्यानेच केल्यामुळे बाजारातील गर्दी टाळली. सध्या सण-उत्सवांचे दिवस असल्याने सर्वांनीच स्वतःची काळजी घेणे आणि सुरक्षित राहणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

Prevention is better than cure म्हणजे उपचारापेक्षा प्रतिबंध बरा. याप्रमाणे यावेळी आपण मनोभावे बाप्पाची आळवणी करूया. आपल्या कुटुंबासमवेत गणेशोत्सव साजरा करूया. तसेच संपूर्ण विश्वावर आलेले हे कोरोनाचे विघ्न हरण करण्यासाठी विघ्नहर्त्या गजाननाला साकडं घालूया. गणपती विसर्जनाच्या दिवशी घरच्या घरी बादलीत गणेशाचं विसर्जन करूया. म्हणजे गर्दी टाळूया. गणेश मंडळांनीदेखील मंडळातील अगदी मर्यादित भक्तांबरोबर बाप्पांना निरोप देऊन अगदी मनोभावे पण साध्या पद्धतीने हा उत्सव साजरा करावा. या काळात कोरोनाबाधीतांची संख्या आटोक्यात राहण्यासाठी प्रशासनाला मदत करावी.

गणेशोत्सवाबरोबरच गौरींचाही सण आला आहे. घरोघरी गौरींचं आगमन झाले आहे. कोरोना संकटामुळे या वर्षी गौरी पूजनाच्या दिवशी हळदी-कुंकवाला आपल्या सख्यांना बोलावणे टाळले तर बरे होईल. आपल्या गौरी-गणपतीचे फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर टाकूया. आपण आणि आपल्या कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठी घरातच राहून कुटुंबासमवेतच गौरी-गणपती हे सण साजरे करावे.