कोरोनाशी मुकाबला – अमेरिकेचे काय चुकले?

966

>> अभिपर्णा भोसले

कोरोनासारख्या भयंकर संसर्गजन्य आजाराचा प्रादुर्भाव अमेरिकासारख्या देशात एवढा कसा वाढला, हा येत्या काही वर्षांत अभ्यासाचा विषय असेल. फक्त अमेरिकन जनतेलाच नाही तर तेथील केसेसची आणि मृत्यूंची आकडेवारी फक्त बातम्यांमध्ये पाहणाऱया इतर देशांतील चिकित्सकांनाही हा प्रश्न पडलेला आहे. अमेरिकेतील प्रशासन, आरोग्य व्यवस्था आणि संबंधित अधिकारी यांनी जो हलगर्जीपणा वेळोवेळी सिद्ध केला त्याचे परीक्षण करण्यासाठी पुढेमागे एखादी कमिटी बसेलही. सार्वजनिक आरोग्य, अर्थशास्त्र आणि आपत्ती व्यवस्थापन यातील तज्ञांची उणीव अमेरिकेसारख्या राष्ट्रात कधीपासून निर्माण झाली, असा विचार मनात यावा इतकी चिंताजनक परिस्थिती आहे.

कोविड-19 बद्दल कुठलीही चर्चा होत असताना विषय परत परत चीनकडे आणणे, हा राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या भाषणाचा अविभाज्य घटक बनला आहे. चीनने सुरुवातीला कुठलीच माहिती समोर येऊ दिली नाही आणि नंतरही महत्त्वाच्या बाबींपासून जगाला अनभिज्ञ ठेवले, हेच अमेरिकेच्या कोरोनाविरुद्धच्या लढय़ाला आलेल्या अपयशामागचे मुख्य कारण असल्याचे ट्रम्प वारंवार अधोरेखित करू पाहतात. तरीही दक्षिण कोरिया आणि व्हिएतनामसारख्या विकसनशील देशांनी आपल्या आरोग्यविषयक रणनीतींच्या सहाय्याने कोरोना आटोक्यात आणण्यासाठी केलेले प्रयत्न अमेरिकेसारख्या बलाढय़ राष्ट्रासाठी मोठा धडा ठरू शकतात.

अमेरिकेत पहिली कोरोना केस 22 जानेवारीला सापडली. तेव्हा राष्ट्राध्यक्ष ट्रम्प ‘परिस्थिती संपूर्ण नियंत्रणाखाली आहे’ असे म्हणाले आणि अमेरिकन नागरिक गाफील राहिले. 10 फेब्रुवारीला अमेरिकेतील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 11 झाली होती. त्या वेळी ‘आमच्याकडे 11 पॉझिटिव्ह आहेत आणि 11 ही जण बरे होत आहेत’ असे आश्वासन देऊन ट्रम्प यांनी सकारात्मकता पेरली. उपराष्ट्राध्यक्ष आणि कॅबिनेट सदस्यांनी संपूर्ण फेब्रुवारी महिना ट्रम्प यांचीच री ओढली. फेब्रुवारीच्या शेवटी जागतिक बाजारातील घसरण पाहून अमेरिकन नागरिक घाबरू लागले तेव्हाही ट्रम्प अतिआत्मविश्वासाने म्हणाले होते- ‘तुम्ही कोरोना व्हायरसबद्दल काही विचाराल तर आपल्या देशात तो पूर्णतः नियंत्रणाखाली आहे.’ 27 फेब्रुवारीला ट्रम्प कोरोनाला ‘चमत्कार’ म्हणाले आणि एके दिवशी इतर दैवी चमत्कारांप्रमाणेच तोसुद्धा गायब होईल, अशी मिश्कील टिप्पणीसुद्धा त्यांनी केली. 6 मार्च रोजी अटलांटा येथील Centres for Disease Prevention and Control येथे भाषण देत असताना ट्रम्प यांनी साक्षात कहर केला आणि ते म्हणाले, ‘ज्याला चाचणी करायची असेल, त्याची चाचणी केली जाईल. चाचणी करणारे लोक उपलब्ध आहेत आणि या चाचण्या सुंदर (!) आहेत.’

देशाच्या राजकीय नेतृत्वाकडून इतक्या स्पष्टतेने पुनःपुन्हा जाणीवपूर्वक केवळ शाब्दिक सकारात्मकताच जनतेवर थोपवली जात असेल तर ‘परिस्थिती अजिबात नियंत्रणाखाली नाही’ हे लक्षात यायला वेळ लागत नाही. प्रत्यक्षात प्रशासनही राष्ट्राध्यक्षांप्रमाणेच डोळ्यांवर पट्टी बांधून कोरोनासोबत आंधळी कोशिंबीर खेळत होते. परिणामी, सुरुवातीला दोन अंकी असलेले पॉझिटिव्ह रुग्ण सहा आठवडय़ांत एक लाखांवर गेले आणि व्यवस्थेचे डोळे उघडले. वस्तुतः अमेरिकेच्या एकूण लोकसंख्येच्या प्रमाणात टेस्टिंग फारच कमी झाले होते आणि संपूर्ण देशभरात किती लोकांना Covid-19 ची बाधा झाली आहे, याची प्रशासनाला मुळीच कल्पना नव्हती.

प्राथमिक इशाऱ्यांकडे दुर्लक्ष

नॉव्हेल कोरोना व्हायरसचा सगळ्यांत पहिला प्रादुर्भाव चीनमधील वुहान येथे डिसेंबरच्या सुरुवातीला झाला. चीनमधील आरोग्य अधिकाऱयांनी डिसेंबरच्या शेवटी न्यूमोनियासदृश आजाराची जागतिक आरोग्य संघटनेकडे नोंद केली; पण हा आजार हवेमार्फत एका मानवापासून दुसऱया मानवास होऊ शकतो, या वस्तुस्थितीचा उल्लेख करण्याचे टाळले. चीनच्या अशा प्रकारच्या परिस्थितींमधील एरव्हीची भूमिका पाहता इतर देशांतील सार्वजनिक आरोग्य क्षेत्रांत काम करणारे तज्ञ सावध झाले होते. कोरोनाचा संसर्ग झालेल्यांची वाढती संख्या पाहून अमेरिकेतील Centres for Disease Control and Prevention (CDC) येथील अधिकाऱयांनी अमेरिकन नागरिकांनी चीन प्रवास टाळावा, असे सूचित केले. तसेच चीनप्रमाणे वैद्यकीय आणीबाणीची परिस्थिती उद्भवण्याची शक्यता विचारात घेऊन आरोग्य यंत्रणा, संसाधन पुरवठा आणि माहितीचे संकलन यांचे व्यवस्थापन करण्यास सुरुवात केली. आरोग्य आणि मानवी सेवा विभागाचे सचिव ऍलेक्स अझार यांनी हाती आलेल्या माहितीनुसार कोरोनाचे संकट अमेरिकेत पाऊल ठेवण्याच्या कित्येक दिवस आधी वारंवार ट्रम्प यांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. पण त्यांचे प्रयत्न फोल ठरले.

Indigenous टेस्टिंग किटचा आग्रह आणि निसटून गेलेला निर्णायक वेळ

जागतिक आरोग्य संघटनेने जानेवारीमध्ये जर्मन टेस्टिंगपद्धती स्वीकारली आणि टेस्टिंगसंबंधी नियमावली प्रसिद्ध केली. यानुसार देश एकतर स्वतःचे टेस्टिंग किट संशोधित करू शकत होते किंवा जागतिक आरोग्य संघटनेच्या टेस्टिंग किटचा वापर करू शकत होते. CDC ने अमेरिकन आरोग्य सेवेस सुलभ ठरेल असे किट तयार करण्याचा चंग बांधला. ‘इतर देशांकडे स्वतःच्या टेस्ट्स तयार करण्याच्या क्षमता असतीलच असे नाही. त्यांनी जागतिक आरोग्य संघटनेची मदत घेण्यास हरकत नाही. अमेरिकेस त्याची गरज नाही,’ असेही एका वरिष्ठ तज्ञांनी स्पष्ट केले. CDC ने खाजगी आरोग्य संस्थांची मदत घ्यावी, जेणेकरून मोठय़ा प्रमाणावर टेस्टिंग किट्स तयार करून लवकरात लवकर मास टेस्टिंग करता येईल, असे काही जागरूक अधिकाऱयांचे मत होते. पण ण्अ ने या सूचनेकडे दुर्लक्ष केले.

CDC चे किट्स जानेवारी महिन्याच्या शेवटी उपलब्ध झाले; पण त्यांच्या टेस्टिंगसाठीच्या अटी पुरेशा नव्हत्या. केवळ वुहानमधून नुकताच प्रवास करून आलेले नागरिक आणि त्यांच्या संपर्कात आलेले इतर यांनाच स्वतःची टेस्ट करता येऊ शकत होती. 31 जानेवारीला अझार यांनी ‘सार्वजनिक आरोग्य आणीबाणी’ जाहीर केली आणि चीनमधून अमेरिकेत येणाऱया नॉन-अमेरिकन्सना अमेरिकेत प्रवेश निषिद्ध करण्यात आला. पण या आणीबाणीच्या घोषणेमुळे Food and Drug Administration कडून टेस्टिंग किटचा वापर करण्यासाठी परवानगी घेणे आवश्यक होऊन बसले. CDC लाही परवानगी लगेच मिळाली, पण त्यांच्याकडे पुरेसे किट्स नव्हते. मास किट्सचे उत्पादन घेईल आणि नंतर ते वेगवेगळ्या राज्यांतील टेस्ट लॅब्समध्ये पाठवेल, अशी योजना होती. प्रत्यक्षात ण्अ कडे पुरेसे किट्स नव्हते, शिवाय ज्या लॅब्सनी स्वतःचे किट्स तयार केले होते त्यांना ते FDA च्या विशेष परवानगीशिवाय वापरता येणार नव्हते. तसेच सार्वजनिक दवाखान्यातील लॅब्समध्येही टेस्टिंग करण्यास परवानगी दिली गेली नाही. कोरोनाची लक्षणे असलेल्या व्यक्तीची टेस्टिंग ही केवळ CDC मध्येच आणि CDC च्या टेस्टिंग किटनेच होऊ शकत होती.

CDC ने 6 आणि 7 फेब्रुवारीला राज्यांतील लॅब्समध्ये टेस्टिंग किट्स पाठवले. 12 फेब्रुवारीला टेस्टिंगचे रिझल्ट्स अचूक येत नसल्याचे CDC ने जाहीर केले. तोपर्यंत केवळ 11 च व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले होते. दोन आठवडय़ांनंतर नवे टेस्टिंग किट तयार करण्यात आले. या दोन आठवडय़ांतही ना इतर लॅब्सना किट बनवण्याची परवानगी देण्यात आली, ना निर्बंधांमध्ये बदल करण्यात आले. फेब्रुवारीच्या शेवटी CDC सोडून संपूर्ण अमेरिकेतील केवळ बारा टेस्ट लॅब्सना टेस्टिंगची परवानगी दिली गेली होती!

16 फेब्रुवारीपर्यंत अमेरिकेत केवळ 800 लोकांच्या टेस्ट्स झाल्या होत्या. म्हणजे एक दशलक्ष लोकसंख्येमागे केवळ 2.4 व्यक्तींची टेस्ट झाली होती. अमेरिकेत ज्या दिवशी पहिली केस सापडली त्याच दिवशी दक्षिण कोरियातही पहिली केस सापडली होती. मात्र 16 फेब्रुवारीपर्यंत दक्षिण कोरियामध्ये जवळपास 8,000 टेस्ट्स झाल्या होत्या आणि एक दशलक्ष लोकसंख्येमागे 154.7 व्यक्तींची टेस्ट झाली होती. पुढच्याच आठवडय़ात कोरोनाच्या community spread टप्प्याला सुरुवात झाली. परिस्थिती हाताबाहेर जाणार हे स्थानिक आरोग्य अधिकाऱयांच्या लक्षात आले आणि इतर देशांनीही हा आजार साथीचा (endemic) असल्याचे घोषित केले. दुर्दैव असे की, या परिस्थितीतसुद्धा सार्वजनिक आरोग्य सुविधांनी FDA च्या परवानगीशिवाय कुठल्याही प्रकारचे टेस्टिंग करू नये, असा इशारा ण्अ ने दिला. शेवटी 24 फेब्रुवारीला राज्यांतील सार्वजनिक आरोग्य सुविधांतील लॅब्सनी CDC ला टेस्टिंग करण्यासाठी परवानगी मागितली. 29 फेब्रुवारीला FDA ने टेस्टिंगवरचे निर्बंध रद्द केले आणि 3 मार्चला कुणाची टेस्ट करावी यावर असलेले निर्बंधही हटवले. त्यावेळी अमेरिकेतील कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंची संख्या 13 होती. अशा प्रकारे दवाखाने आणि खाजगी लॅब्सना सुरुवातीलाच लांब ठेवल्याची फार मोठी किंमत अमेरिकेने मोजली.

आरोग्य साधनांची कमतरता

जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना हा pandemic आजार असल्याचे घोषित केले तेव्हाच प्रत्येक राष्ट्राला उपलब्ध असलेली आरोग्य साधने अपुरी असल्याची जाणीव झाली होती. सामान्य नागरिकांना वापरण्यास लागणारे मास्क, आरोग्य क्षेत्रात काम करणाऱया कर्मचाऱयांना लागणारे संरक्षण आणि रुग्णाचा जीव वाचवण्यासाठी आवश्यक असलेले व्हेंटिलेटर्स यांचा तुटवडा जाणवणार, हे स्पष्ट होते. अशा परिस्थितीतही अमेरिकेत ट्रम्प आणि न्यूयॉर्कचे गव्हर्नर यांच्यात आरोग्य सेवकांना वापरण्यास लागणाऱया मास्कच्या पुरवठय़ावरून जवळपास दोन महिने शाब्दिक युद्ध सुरू असल्याचे संपूर्ण जगाने पाहिले. FDA ves Remdesivir नावाच्या औषधाची मागणी केली होती; पण प्रत्यक्ष रुग्णांच्या प्रमाणात पुरवठा झाला नसल्याचे आता समोर आले आहे. CNN च्या वृत्तानुसार 70 मधील केवळ 4 रुग्णांना देता येऊ शकेल इतकाच या औषधाचा साठा उपलब्ध असताना कुणाला औषध द्यायचे हे ठरवण्यासाठी लॉटरी पद्धतीचा वापर करावा, असे कॅलिफोर्निया सरकारने दवाखान्यांना सुचवले होते!

रिक ब्राईट या सार्वजनिक आरोग्य अधिकाऱयाने US काँग्रेसमध्ये आपली बाजू मांडताना अमेरिकेतील आरोग्य सेवकांना N95 मास्क मिळू न शकल्याबद्दल खंत व्यक्त केली, तसेच आयात केलेले मास्क हे पुरेसे सुरक्षित नसल्याने वापरास योग्य नसल्याचेही कबूल केले.

अमेरिकेतील मृत्युदर आणि इतर राष्ट्रांशी तुलना

दर एक लाख लोकसंख्येमागे किती लोकांचा कोविडने मृत्यू झाला, हे अभ्यासणे साथीच्या आजाराचे मूल्यमापन आणि भविष्यातील सार्वजनिक आरोग्य योजना आखण्यासाठी महत्त्वाचे असते. सद्यस्थितीत वेगवेगळ्या देशांतील एकूण लोकसंख्या, लोकसंख्येची घनता आणि कोरोनाचा मृत्यूदर यांची माहिती दररोज अद्ययावत करणे, हा या अभ्यासाचा एक महत्त्वाचा हिस्सा आहे. नुकतेच ट्रम्प यांनी असे विधान केले की, ‘प्रति एक लाख लोकसंख्येमागे कोरोनामुळे झालेल्या एकूण मृत्यूंची तुलना करता अमेरिका आणि जर्मनी या दोन देशांची कामगिरी चांगली आहे.’ हे अर्थातच खरे नाही. अशी अनेक विकसनशील राष्ट्रे आहेत जिथे लोकसंख्येच्या प्रमाणात कमी लोक कोरोनामुळे मृत्यू पावले आहेत. जर्मनी आणि अमेरिकेची तुलनाही चुकीची आहे.

हॉपकिन्स संस्थेच्या अंदाजानुसार 12 मेपर्यंत अमेरिकेत प्रति एक लाख लोकसंख्येमागे 24.66 लोक कोविड-19 मुळे मृत्यू पावले आहेत. जर्मनीमध्ये हाच दर 9.24 आहे. म्हणजेच अमेरिकेतील मृत्युदर जर्मनीतील मृत्युदराच्या जवळपास अडीचपट आहे. इथेच राष्ट्राध्यक्षांच्या विधानातील फोलपणा आणि वारंवार जनतेला आश्वस्त करण्याची बेजबाबदार वृत्ती दिसून येते.
कॅनडा, दक्षिण कोरिया, इराण, रशिया, पोलंड आणि स्वित्झर्लंड येथील मृत्युदर पाहता अमेरिकेची परिस्थिती अधिक भयावह वाटते. कोलंबिया विद्यापीठाचे पर्यावरण आरोग्य विज्ञानाचे प्राध्यापक जेफ्री शॅमन यांच्या मते कोरोनाशी लढा देत असलेल्या जगातील बहुतांश राष्ट्रांपेक्षा अमेरिकेतील मृत्युदर जास्त असण्याची शक्यता आहे. दिसत असलेल्या आकडेवारीनुसार हे सत्य आहे. स्पेन आणि इटलीचा अपवाद वगळता इतर सर्वच राष्ट्रांच्या तुलनेत अमेरिकेची स्थिती वाईट आहे. Our World in Data या माहितीच्या क्षेत्रातील अग्रगण्य संस्थेने सादर केलेल्या सांख्यिकीनुसार 12 मे रोजी जगातील एकूण लोकसंख्येतील कोविडने मृत पावलेल्या लोकांचा दर 36.66 प्रती दशलक्ष लोकसंख्या असा आहे, तर अमेरिकेत हाच दर 243.76 आहे.

मुळात कोविड-19 मुळे होणाऱया मृत्यूंची गणती करण्यात बऱयाच राष्ट्रांमध्ये पारदर्शकता नाही. अमेरिकेत सुरुवातीच्या सहा-सात आठवडय़ांत टेस्टिंगच्या बाबतीत जो गोंधळ झाला, त्यावरून तेथील बहुतांश केसेस या नोंदवल्या गेल्या नसणार, हे स्पष्ट आहे. पुरेशा चाचण्या न झाल्याने संसर्ग झाल्याची शक्यता असणाऱया रुग्णांचीच संख्या अचूक ठाऊक नाही. ज्यांची चाचणी झाली नाही त्यांचे कोरोनामुळे झालेले मृत्यूही नेमके याच व्हायरसमुळे झाले असावेत, असेही प्रतिपादन करता येत नाही. त्यामुळे जर्मनीसारख्या मोठय़ा प्रमाणावर टेस्टिंग केलेल्या राष्ट्राची अमेरिकेसारख्या टेस्टिंगकडे दुर्लक्ष केलेल्या राष्ट्राशी तुलना करणे गैरलागू ठरते.

आपली प्रतिक्रिया द्या