Dean Jones – देवाने चिक्की खाल्ली

>> द्वारकानाथ संझगिरी

माणसाचं आयुष्य क्षणभंगुर आहे असं म्हटलं जातं आणि नंतर विसरलंसुद्धा जातं. पण डीन जोन्ससारखा मृत्यू पाहिला की त्यातलं गांभीर्य कळतं. एका क्षणी तो मस्त कलंदर माणूस गप्पा मारत उभा होता आणि दुसऱयाच क्षणी संपला? या जगातून नाहीसा झाला? त्याच्या क्रिकेटच्या आयुष्यात तो इतक्या तडकाफडकी कधीही बाद झाला नसावा. असा फक्त फ्यूज जाऊ शकतो, पण फ्यूज बदलला की दिव्यांचं आयुष्य पुन्हा सुरू होतं. इथे संपलं की संपलं.

मी हादरलोय. तसा डीन जोन्स माझा कुणीही नव्हता. बऱयाचदा आम्हा प्रेसमधल्या मंडळींची आणि कॉमेंट्रीवाल्या मंडळींची डायनिंग रूम एकच असते. काही वेळा तिथे त्याची भेट व्हायची. गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनूनची देवाणघेवाणही होत असे. खेळाबद्दल दोन-चार प्रश्न कधीतरी विचारले जात. बस्स. बाकी माझा आणि त्याचा व्यक्तिगत संबंध काहीही नव्हता. पण उत्साही कारंज्याप्रमाणे उसळणाऱया डीन जोन्सकडे पाहताना त्या उत्साहाचे चार थेंब आपल्या अंगावरही पडायचे.

कॉमेंटेटर डीन जोन्स आजच्या पिढीने भरपूर पाहिलाय. पण मी फलंदाज डीन जोन्सच्या प्रेमात होतो. तो रूढ अर्थाने कधीही महान वगैरे नव्हता. 80 च्या दशकाच्या अखेरीस ज्याला वन डे फलंदाजीचं मर्म कळलं होतं त्यात व्हिव रिचर्डस्, जावेद मियांदाद, मार्टिन क्रो वगैरेंबरोबर तो जागतिक दर्जा दाखवत होता. त्यांच्यापैकी व्हिव रिचर्डस् हा अतुलनीय होता. कधीही लाव्हा वाहील असं वाटायचं. जावेद मियांदादने त्याच्या स्वतःच्या तंत्रात खडूसपणा मिसळून स्वतःला जागतिक स्तरावर आणलं होतं. मार्टिन क्रोची फलंदाजी म्हणजे क्लासिकल सौंदर्यशास्त्राची व्याख्या होती. डीन जोन्सची आक्रमकता त्याच्या फलंदाजीत दिसायची आणि तितकीच त्याच्या रनिंग बिटविन द विकेटमध्ये. त्या काळामध्ये तो वन डेत आक्रमक फलंदाजीची मास्टर्स डिग्री घेऊन डॉक्टरेट करत होता. त्याच्यासारखं आक्रमक रनिंग बिटविन द विकेट मी आधी फक्त एकदाच पाहिलं होतं. 1977 साली एक कसोटी सामना पाकिस्तान जिंकताना आसिफ इक्बाल आणि जावेद मियांदादने ज्या धावा चोरल्या होत्या त्यावेळी आपण लुटले जातोय ही भावना होत असतानासुद्धा धावा कशा चोराव्यात याचं शिक्षण मिळतंय असं वाटत होतं. आपल्याकडे एका धावेचं महत्त्व जेवढं सुनील गावसकरने अधोरेखित केलं तेवढं आधी कुणीच केलं नव्हतं. पण डीन जोन्सने धाव कशी आक्रमकपणे घेता येते हे दाखवलं. तो इतक्या आक्रमकपणे धावायचा की, तो धाव काढताना क्षेत्ररक्षकावर दबाव टाकायचा. त्या दबावाखाली क्षेत्ररक्षक चुकायचा आणि एखादी अधिक धाव तो डीन जोन्सला देऊन टाकायचा. क्षेत्ररक्षकांचा धसका त्याने कधीच घेतला नाही. उलट क्षेत्ररक्षकांनीच त्याच्या फलंदाजीचा, त्याच्या रनिंग बिटविन द विकेटचा धसका घेतला. मला खरं तर डीन जोन्स आणि जॉण्टी ऱहोडस् यांचं द्वंद्व पाहायला मजा आली असती. कुणी कुणावर दबाव टाकला असता? पाहायला मात्र मजा नक्कीच आली असती.

बऱयाचदा असं व्हायचं की डीन जोन्सने एक धाव पूर्ण केलेली असायची आणि दुसरी धाव त्याने अर्धी घेतलेलीसुद्धा असायची. केवळ समोरचा फलंदाज रिस्पॉन्स देत नाही म्हणून ती धाव पुरी व्हायची नाही. बऱयाचदा क्षेत्ररक्षक त्यामुळे दबावाखाली यायचा. टिपिकल ऑस्ट्रेलियन असल्यामुळे फलंदाजीतसुद्धा ती आक्रमकता ठासून भरलेली असायची. त्याचं ते चेन्नईचं टाय टेस्टमधलं द्विशतक तर माझ्या डोळ्यासमोर आहे. ते ऊन, ते घामाने निथळणं आणि मग भडाभडा ओकणं.! तरीही उभं राहून खेळत राहणं. अप्रतिम फटके मारणं. त्याचं क्रेडिट थोडंसं कर्णधार ऍलन बॉर्डरलासुद्धा द्यायला हवं. खरं तर डीन जोन्सला सुरुवातीला ‘रिटायर्ड ईल ’म्हणून पॅव्हेलियनमधे जायचं होतं, पण बॉर्डरने त्याचा इगो डिवचला. तो असं म्हणाला, ‘की जर तुला उष्ण हवेत फलंदाजी करता येत नसेल ना तर मला तसं सांग. माझा जो क्विन्सलॅण्डचा खेळाडू आहे ग्रेग रिची जो तुझ्यानंतर येणार आहे ना त्याला खेळायला बोलवतो.’ ऑस्ट्रेलियामध्ये क्विन्सलॅण्ड ही जागा जास्त उष्ण असते. जोन्स हा व्हिक्टोरियाचा. ते जोन्सला प्रचंड लागलं. तो एकाबाजूला ओकत गेला आणि दुसऱया बाजूला खेळत राहिला. ती मॅच टाय झाली. त्यांनतर त्याला सलाईनवर ठेवलं गेलं इतकं शरीरातलं पाणी त्याच्या निघून गेलं होतं.

मला त्याच्या फलंदाजीचा ऑस्ट्रेलियन ढंग आवडायचा. ऑस्ट्रेलियन फलंदाजांची एक फूट वर्कची परंपरा होती. विशेषतः फिरकी गोलंदाजीला खेळताना ते पॉपिंग क्रिझची मर्यादा झुगारून बॅले डान्सरच्या पायाने जाऊन चेंडूला वाटेत भेटत. नील हार्वे, इयान चॅपेल, रेडपाथ, किम ह्यूज वगैरे फलंदाज ते लीलया करत. डीन जोन्स त्यातला एक. अलीकडे फलंदाज पुढे येऊन चेंडू फेकून देतात. त्यावेळी तो चेंडू सुंदरपणे गवतालगत मारला जायचा. ते पाहणं हा एक वेगळा आनंद होता.

डीन जोन्सचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधला रेकॉर्ड खूप चांगला आहे. 80 च्या दशकात कसोटी क्रिकेट खेळताना त्याची 46.36 अशी सरासरी आहे आणि वन डेत तर ती सरासरी 44.61 आहे. म्हणजे नुसत्या वन डेतल्या सरासरीचा जर विचार केला ना तर तो सहज जागतिक दर्जाचा फलंदाज मानला गेला पाहिजे. इंग्लंडच्या वातावरणामध्ये कसोटीत त्याने आपला ठसा उमटवलाय. 1989 च्या ऍशेस सीरिजमध्ये त्याने धमाल केली होती. ‘विस्डेन’च्या पंचकात त्याचं नाव होतं. 1987 च्या वर्ल्ड कपमध्ये त्याने 44 धावांच्या सरासरीने आणि 3 अर्धशतकं ठोकत 341 धावा केल्या होत्या. बून, मार्श आणि तिसऱया क्रमांकावर येणाऱया जोन्सने ऑस्ट्रेलियन संघाच्या धावांचा पाया त्या वर्ल्ड कपमध्ये घातला होता. लक्षात घ्या त्या काळामध्ये जे नियम होते ते आजच्याप्रमाणे फलंदाजधार्जिणे नव्हते. त्यामुळे धावा काढणं ही आजच्या एवढी सोपी गोष्ट नव्हती. हिंदुस्थानविरुद्ध त्याने चौकार ठोकला. खरं तर तो षटकार होता. त्याला दिला गेला होता चौकार. लंचनंतर तो षटकार ठरवला गेला. ऑस्ट्रेलियाला 2 रन्स वाढवून दिल्या गेल्या. ऑस्ट्रेलियाने ती मॅच 1 धावेने जिंकली आणि प्रचंड वाद निर्माण झाला. अर्थात डीन जोन्स हा नेहमीच वादात राहिलेला माणूस आहे. आणि त्याने एक्झिटही अशी घेतली की, ज्याला तो टेररिस्ट म्हणाला त्या अमलाच्या मनालासुद्धा चटका लागला असावा. असं काय घडलं म्हणून देवाला त्याला इतक्या तातडीने बोलवावं लागलं?. आयुष्याच्या खेळपट्टीवर देवाने त्याला इतक्या लवकर आऊट द्यायला नको होतं. देवाने त्याला खोटं आऊट दिलं. माझ्या लहानपणी अंपायरने एखाद्या फलंदाजांला खोटं आऊट दिलं तर त्याला अंपायरने चिक्की खाल्ली असं म्हटलं जायचं. इथे चक्क देवाने चिक्की खाल्ली.

आपली प्रतिक्रिया द्या