>> नीलेश कुलकर्णी, [email protected]
शेजारच्या मध्य प्रदेशात शतप्रतिशत भाजपा असताना प्रभू रामचंद्राच्या अयोध्येसह इतर ठिकाणी भाजपाचे झालेले पानिपत संशयकल्लोळाला भरपूर वाव देणारे ठरले. मोदींच्या बहुमताचा घोडा गंगेच्या काठी अडला. गेल्या आठेक वर्षांपासून मोदी–शहा विरुद्ध योगी या संघर्षांच्या नाटय़ाचा पहिला अंक आता पाडापाडीच्या राजकारणातून पार पडला आहे. उर्वरित अंकात काय घडते ते यथावकाश कळेलच..
तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतानाची मोदींची बॉडीलँग्वेज बरेच काही सांगून जाणारी होती. लोकसभा निवडणुकीपूर्वी उत्तर प्रदेशात मोदी-योगी की ‘डबल इंजिन सरकार’ असा जोरात डंका वाजवला जात होता. प्रत्यक्षात ही इंजिने परस्परविरोधी धावत होती, हे निकालानंतर स्पष्टच झाले. ‘आप’चे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांनी मोदी बहुमताने सत्तेवर आले की योगींना मुख्यमंत्रीपदावरून हटवतील, असे विधान केले होते. त्यामुळे अगोदरच सावध असणारे योगीबाबा अतिसावध झाले. ‘ना तूने सिग्नल तोडा ना मैने सिग्नल तोडा’ म्हणत योगीबाबांनी मोदींची बहुमताची गाडी पार ट्रकवरून खाली आणली.
योगी आदित्यनाथ हे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अगदी अपघाताने झाले आणि पाहता पाहता दिल्लीच्या महाशक्तीला नाकापेक्षा मोती जड झाले. हिंदुत्वाचे ‘नवे पोस्टर बॉय’ बनण्याचा योगींचा खटाटोप हा दिल्लीकरांच्या संतापाचे प्रमुख कारण होता. त्यातच योगींची बनलेली बुलडोझरबाबा ही प्रतिमा, पंतप्रधानपदासाठी सुरू असलेले त्यांचे प्रमोशन, योगींची ठाकूर लॉबी या बाबी दिल्लीला खटकणाऱ्या होत्याच. त्यामुळे सुरुवातीला पंतप्रधान कार्यालयातील अधिकारी अरविंद शर्मा यांना उत्तर प्रदेशच्या राजकारणात उतरवून योगींच्या महत्त्वाकांक्षाना वेसण घालण्याचा प्रयत्न झाला, मात्र तो असफल ठरला. त्यानंतर बसपातून भाजपात घेत बृजेश पाठक यांना केशवप्रसाद मौर्यांच्या साथीने उपमुख्यमंत्री करून योगींची तकडबंदी करण्यात आली. तरीही योगी दाद देईनात हे लक्षात आल्यानंतर योगींच्या ठाकूर कार्डाला प्रत्युत्तर म्हणून वादग्रस्त बृजभूषण सिंह याला दिल्लीने ‘शरण’ दिली. इतके आरोप होऊनही दिल्लीने बृजभूषण यांची पाठराखण केली. त्याचे कारण म्हणजे योगी व बृजभूषण यांच्यातील छत्तीसचा आकडा. राजा भैया, बृजभूषण, धनंजय सिंह या मवाल्यांची ठाकूर गँग बनवून योगींविरोधात मोठी आघाडी दिल्लीच्या आशीर्वादाने उभारण्यात आली. तिकीट वाटपात योगींना विश्वासात घेतले गेले नाही. त्यामुळे आपल्या राजकीय भवितव्याचा अंदाज आलेल्या योगींनी भाजपाच्याच उमेदवारांचा ‘टप्प्यात कार्यक्रम’ केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
पंजाब व हरयाणाचा अपवाद वगळता उत्तर हिंदुस्थानात भाजपाची चांगली कामगिरी झाली. मात्र उत्तर प्रदेशने सर्वात मोठा उलटफेर घडवून आणला. आता कोणी पाडापाडी केली याचा महाशक्ती त्यांच्या त्यांच्या पद्धतीने अभ्यास करत आहे. त्यानंतर संशयकल्लोळ नाटकाचा ‘दुसरा अंक’ सुरू होईल. त्यातूनच नव्या भाजपाध्यक्षांची निवड व उत्तर प्रदेशच्या नेतृत्वावरही निर्णय होईल. मोदी संसदीय पक्षाचे नेते बनल्यानंतर विविध नेत्यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन केले. सेंट्रल हॉलमध्ये योगींनी मोदींना पुष्पगुच्छ दिल्यानंतर मोदींनी त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली. ही थाप कौतुक म्हणून शाबासकी खचितच नव्हती. ‘अच्छा गेम किया,’ असा मोदींचा आविर्भाव होता. ही थाप बरीच सांकेतिक आहे. या थापेची ‘गूंज’ दूरवर उमटणार आहे.
राष्ट्रपती भवनातील श्वान आणि कंगना
पंतप्रधान मोदींच्या शपथविधी सोहळय़ावर अपयशाचे सावट यावेळी प्रकर्षाने जाणवले. मंत्र्यांच्या चेहऱ्यावर आनंदापेक्षा सरकार टिकेल की नाही हे काळजीचे सावट होते. भाजपाच्या लोकांचे चेहरे आक्रसले होते. याउलट चंद्राबाबू व नितीशबाबूंचे चेहरे ‘मन मे लड्डू फूट रहे’ अशा पद्धतीचे होते. या सगळय़ा घडामोडीत शपथविधी सोहळय़ात राष्ट्रपती भवनात बंद दरवाजाआड सतत हालचाल करत असलेल्या एका श्वापदावरून राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आले आहे. मंत्री शपथ घेत असताना ते श्वापद इकडून तिकडे व तिकडून इकडे करायचे. त्याची उंचीही भली थोरली असल्याने कुणी तो बिबटय़ा असेल तर कोणी मोठय़ा उंचीचा कुत्रा असेल असे तर्क लावले आहेत तर कुणी ती मांजर असावी असा अंदाज लावला आहे. या श्वापदाचे व्हिडीओ मोठय़ा प्रमाणावर व्हायरल झाल्यानंतर तर तर्कवितर्कांना अधिकच उधाण आले आहे. मात्र राष्ट्रपती भवनाकडून त्यावर अधिकृत स्पष्टीकरण आलेले नसल्याने गोंधळात भरच पडली आहे. शपथविधीवेळी असे प्राण्याचे इकडून तिकडून उंडारणे हे ‘शुभसंकेत’ नाहीत, अशी भविष्यवाणी काही पंडितांनी केली आहे. त्यामुळे भाजपाईंचे चेहरे अधिकच काळवंडले आहेत. या सगळय़ा श्वापदाच्या गदारोळापूर्वी चंदिगड विमानतळावर एका शेतकरी कन्येकडून मुस्काटात बसल्यानंतर पंगा क्वीन कंगना राणावत हिचा तोरा काहीसा उतरलेला दिसला. सेंट्रल हॉलमध्ये लगबगीने जात असलेल्या कंगना यांना काही पत्रकारांनी बोलते करण्याचा प्रयत्न केला, मात्र कंगना एक शब्दही बोलल्या नाहीत. एरव्ही नको त्या विषयावर बाष्कळ बडबड करणाऱ्या कंगना यांनी पहिल्याच भेटीत पत्रकारांची निराशा केली, मात्र त्यांच्या सोबतीला असलेल्या एकाने ‘मॅडम को मीडिया से कुछ भी बोलने के लिए अभी मना किया है,’ अशी माहिती पत्रकारांना देऊन टाकली. बघूयात बडबोल्या कंगनांचा ‘म्यूट’ आवाज किती दिवस तसाच राहतो ते.
नशीब म्हणतात ते यालाच..!
राजकारणात बऱ्याचदा कर्तबगारीपेक्षा नशीबच महत्त्वाचे असते. याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे केरळचे भाजपा नेते जॉर्ज कुरियन. मोदींचे सरकार आले म्हणून कुरियन शपथविधी सोहळय़ाला उपस्थित राहण्यासाठी शनिवारी दुपारी दिल्लीत आले. रात्री झोपतानादेखील त्यांच्या मनाला आपण मंत्री होऊ असा विचारही शिवला नसेल. याचे कारण म्हणजे हे कुरियन महाशय संसदेच्या कोणत्याही सभागृहाचे सदस्य नाहीत. त्यामुळे शपथविधीचा पास उद्या मिळवावा, अशी खूणगाठ मनाशी बांधून कुरियन झोपले. त्यांची झोपमोड झाली ती राष्ट्रपती भवनातून आलेल्या फोनमुळे, मात्र त्यानंतर त्यांना मोदींच्या घरीदेखील चहापानासाठी बोलावणे आले व त्यांच्या मंत्रीपदावर शिक्कामोर्तब झाले. नशीब नशीब म्हणतात ते हे!! मंत्रिमंडळात आलेले दुसरे नशीबवान गृहस्थ म्हणजे रवनीतसिंग बिट्टू. पंजाबमध्ये शेतकऱ्यांनी भाजपाचा धुव्वा उडवला. तिकडे एकही जागा भाजपा जिंकू शकली नाही. बिअंतसिंग यांच्यासारख्या दिग्गज नेत्याचा नातू असूनही रवनीत यांनी काँग्रेसमधून भाजपात केलेला प्रवेश जनतेला पटला नाही. त्यांचा जनतेने दारुण पराभव केला. मात्र पंजाबमधील शेतकऱ्यांमध्ये ‘गुडविल’ निर्माण करण्याच्या उद्देशाने मोदींनी ऐनवळी रवनीत बिट्टू यांना मंत्री बनविण्याचा निर्णय घेतला. ‘आप मंत्री बनेंगे. पीएम हाऊस चाय के लिए आमंत्रित है’ असा निरोप आल्यानंतर रवनीत यांच्या ‘अश्रूंची अचानकच फुले’ झाली. त्यांनी तातडीने दिल्ली गाठली खरी, मात्र पीएम हाऊसला जाताना ते प्रचंड ट्रफिक जाममध्ये अडकले. पंतप्रधानांना वेळेत भेटणे तर गरजेचे होते. त्यावेळी रवनीत यांनी चक्क रस्त्यावरून पळत जात पीएम हाऊस गाठले. कुरियन यांना नशिबाने मंत्रीपदाचे ताट आयतेच मांडले तर रवनीत यांना त्यासाठी थोडी ‘पळापळ’ करावी लागली एवढेच!