श्रीदिगंबरदास महाराज

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> विवेक दिगंबर वैद्य

थोर सत्पुरुष ‘श्री. विठ्ठलराव गणेश जोशी ते श्रीदिगंबरदास महाराज’ या वाटचालीच्या पूर्वार्धाचा परिचय करून देणारा लेख.

रत्नागिरी शहरापासून आठ कि.मी. अंतरावर असलेल्या पोमेंडी बुद्रूक या निसर्गसंपन्न खेडेगावात, नारळ-पोफळी आणि आमरायांनी वेढलेल्या टुमदार कौलारू घरात गुण्यागोविंदाने नांदणाऱया ‘जोशी’ या सुखवस्तू कर्तबगार कुटुंबातील एका सत्पुरुषाची ही कथा.

शांडिल्य गोत्री जोशी घराणे मूळचे संगमेश्वर, वरवडे भागात वसलेले. वरवडे गावातील धाक जोशी यांना तीन मुले. त्यातील थोरल्या ‘राम’ची कृष्ण (कान) आणि केशव (केस) ही मुले ज्योतिषशास्त्रात पारंगत होती. जंजिऱयाच्या सिद्दीला अचूक भविष्य सांगून संकटमुक्त करणाऱया या बंधुद्वयांपैकी कान जोशींना सिद्दीने संतुष्ट होऊन पोमेंडी बुद्रूक गावाची सालाना 1200 रुपयांची खोतपदाची सनद दिली आणि तेवढीच जमीन केस जोशी यांना गुहागर तालुक्यातील पालशेत येथे दिली. वरवडय़ाचे कान जोशी पुढे पोमेंडी येथे स्थलांतरित झाले. आमराई, नारळी-पोफळीच्या बागा तसेच ज्योतिष आणि याज्ञिकीच्या जोरावर ते चांगलेच स्थिरस्थावर झाले.

जोशी घराण्याच्या आठव्या पिढीतील सखारामपंत गावचे खोत होते. निगुतीने प्रपंच आणि परमार्थाचा गाडा हाकणाऱया सखारामपंतांना काशीनाथ, विष्णू, नारायण, गणेश आणि हरी अशी पाच मुले होती. त्यांच्यातील नारायण आणि गणेश हे अल्पायुषी होते. उर्वरित तिघांपैकी विष्णुपंत आणि हरिपंत शिक्षणासाठी घराबाहेर पडले. त्यांनी माधुकरीच्या बळावर शिक्षण पूर्ण केले. विष्णुपंतांची वकिली सनद मिळवण्याची इच्छा दुर्दैवाने अपूर्ण राहिली तेव्हा त्यांनी मुंबईला रेल्वेमध्ये नोकरी पत्करली. हरिपंतांनी मात्र रत्नागिरीत राहूनच शिक्षण पूर्ण केले आणि वकिली व्यवसाय केला. पुढे कामाच्या व्यापामुळे त्यांना पोमेंडी येथील दैनंदिन कामकाजावर लक्ष ठेवणे, जाणे-येणे शक्य झाले नाही म्हणून विष्णुपंत मुंबई सोडून पोमेंडीला आले आणि घराची जबाबदारी पाहू लागले. विष्णुपंतांचा विवाह चिंचखरीच्या लक्ष्मीबाई गोडबोले हिच्यासोबत झाला. त्यांना लक्ष्मण आणि गणेश ही दोन मुले झाली. हरिपंतांचा विवाह आनंदीबाई यांच्याशी झाला. त्यांना अनसूया नावाची एकच मुलगी होती. या अनसूयेचा विवाह नारायण केशव रानडे यांच्याशी झाला. नारायणराव, पुण्याचे सद्गुरू श्रीरामानंद बीडकर महाराज यांचे शिष्य होते. हा विवाह पुढे जाऊन जोशी कुटुंबीयांसाठीच नव्हे, तर बीडकर महाराज परिवारासाठीदेखील वेगळी दिशा देणारा ठरला.

विष्णुपंत आणि हरिपंतांनी एकत्र येऊन कुटुंबाला ऊर्जितावस्था मिळवून दिली. शेतीवाडी आणि जमीनजुमला वृद्धिंगत केला. गावातील देवळांचे जीर्णोद्धार केले. पोमेंडी येथे घरालगत आराध्यदैवताचे, श्रीरामाचे देवालय बांधले. या मंदिरात श्रीरामनवमीचा उत्सव थाटामाटात साजरा होत असे. पुढे हा उत्सव विष्णुपंत आणि हरिपंत यांच्या रामभक्तीप्रेमाचा, औदार्याचा, ऐश्वर्याचा अन् अपार आतिथ्यशीलतेचे प्रतीक बनला. घरी सुबत्ता नांदत होती. विष्णुपंतांचा संसार सुखाने चालला होता, मात्र थोरला विवाहित पुत्र लक्ष्मण आजारपणाचे निमित्त होऊन दगावल्यामुळे बी.ए.पर्यंत शिकलेला दुसरा मुलगा गणेश घरची शेतीभाती आणि व्यवहार पाहू लागला. गणेशपंतांचा विवाह रत्नागिरीच्या गोरे वकिलांची कन्या रमा हिच्यासोबत झाला. मात्र तिला अल्पकाळ संसारसुख लाभले. महादेव, दत्तात्रय, विठाबाई आणि नारायण ही चार अपत्ये गणेशपंतांच्या हाती सोपवून रमाबाई मरण पावल्या म्हणून पंतांनी लेकरांच्या संगोपनार्थ सोमेश्वर येथील नारायण दाजी सोवनी यांच्या गंगू या कन्येसोबत दुसरा विवाह केला. तिचे नाव जानकी ठेवण्यात आले. जानकीबाईंना एक मुलगी झाली, मात्र ती केवळ चार वर्षे जगली. जोशी कुटुंबीयांचे मनोधैर्य खचविणाऱया काही घटना नित्यनेमाने घडत असल्या तरी आनंदाचे क्षण आणि भाग्याचे संकेत देणारी एक गोष्टही त्याच सुमारास घडली.

अक्कलकोटनिवासी श्रीस्वामी समर्थ संप्रदायाचे पुणे येथील थोर सत्पुरुष श्रीरामानंद बीडकर यांचे शिष्योत्तम श्रीरामचंद्र अप्पाजी तथा रावसाहेब सहस्रबुद्धे यांची बदली रत्नागिरी येथे झाली. सिद्धावस्थेतील रावसाहेब प्रत्यक्षात स्थापत्य अभियांत्रिकी शाखेचे अभियंता असून सार्वजनिक बांधकाम खात्यात ओव्हरसियर पदावर कार्यरत होते. श्री बीडकर महाराजांच्याच पुढाकाराने त्यांचा विवाह जुन्नरच्या विष्णुपंत बोडसांची कन्या दुर्गा हिच्यासोबत झाला. विवाह झाल्यानंतर रावसाहेबांची बदली रत्नागिरी येथे झाली. रत्नागिरीला त्यांची सोय योग्य त्या ठिकाणी व्हावी म्हणून श्री बीडकर महाराजांनी विचारणा केली असता विष्णुपंत बोडस यांनी पोमेंडीच्या हरिपंत जोशींचा संदर्भ दिला. त्यानुसार रावसाहेब आपल्या पत्नीसह हरिपंत आणि विष्णुपंत जोशींच्या घरी राहावयास आले. या दोघांना रावसाहेबांविषयीची पूर्वमाहिती देण्यात आली असल्यामुळे त्यांनी रावसाहेबांची उत्तम प्रकारे सेवा केली. निस्सीम श्रद्धाभावनेने केलेली ही सेवा लवकरच फळाला आली.

गणेशपंतांची पत्नी जानकीबाई गुरुवार 27 ऑक्टोबर 1912 रोजी प्रसूत झाली. जोशी कुटुंबास पुत्ररत्नाचा लाभ घडला. नवजात बालकाचे नाव ‘विठ्ठल’ ठेवण्यात आले मात्र येत्या काळात हेच बालक ‘श्रीदिगंबरदास महाराज’ या नावाने सर्वत्र सर्वदूर ख्यातकीर्त झाले.

दिगंबरदासांचे बालपण विशेषकरून वडिलांच्या देखरेखीखाली गेले. बालपणी जलोदराच्या विकारातून ते कसेबसे वाचले, तोच एकदा खेळताना कपाळावर मध्यभागी टोकदार काठी घुसली. खोल जखम झाल्यामुळे दिगंबरदासांची प्रकृती गंभीर झाली. महत्प्रयासाने त्यांच्या चुलत आजीने (हरिपंतांची पत्नी आनंदीबाई) तीन दिवस अखंड शुश्रूषा करून दिगंबरदासांचा जीव वाचविला. त्या काळी गावात डॉक्टर्स किंवा उत्तम वैद्यकीय इलाज मिळण्याची वानवा होती. अशा परिस्थितीत आनंदीबाई सर्वांच्याच मदतीला धावून जात असत. भविष्यकाळात दिगंबरदासांनी भव्य सुसज्ज हॉस्पिटल बांधले त्यांचे मूळ कुठेतरी त्यांच्या त्या चुलतआजीच्या, आनंदीबाईंच्या सेवावृत्तीत दडलेले असावे.

अल्पावधीतच पाठचा बंधू केशव आणि आई जानकीबाई यांचा वियोग सहन करावा लागल्याने अवघ्या बाराव्या वर्षी दिगंबरदासांच्या नशिबात पोरकेपण आले. त्यांना त्यांच्या शांत व सोशिक आईविषयी अपार जिव्हाळा होता. जानकीबाईचे माहेर ‘सोमेश्वर’च्या सोवनींकडचे. या ‘वत्स’ गोत्राच्या सोवनी कुटुंबातील ‘दाजी सोवनी’ हे भाग्यशाली गृहस्थ अक्कलकोटास श्रीस्वामीदर्शनार्थ गेले असता त्यांच्या हातावर श्रीस्वामींनी दोन खारका ठेवल्या. त्या प्रसादानुसार दाजींना दोन मुलगे झाले. नारायण आणि गोविंद या त्या दोन्ही सुपुत्रांवर बाळेकुंद्रीच्या श्रीपंत महाराजांचाही कृपावरदहस्त होता. यांतील नारायणराव हेच जानकीबाईंचे वडील आणि दिगंबरदासांचे आजोबा होते.

(पूर्वार्ध)

[email protected]