असा कसा मी?

1694

>> शिरीष कणेकर

सोनी नावाच्या एका मराठी युवकानं केनयामध्ये मला सहज स्वरात विचारलं होतं, ‘‘मगर खाणार?’’
‘‘मगर?’’ मी चमकून विचारलं, ‘‘मगर आपल्याला क्रोसिनच्या गोळीसारखी गिळते, आपण कुठे तिला खातो? बायकोला बोलण्यात नाही खाऊ शकत तो मगर खाईल?’’
‘‘बायकोला किंबहुना तिच्या माहेरच्या कुणालाच मी बोलण्यात नाही खाऊ शकत. म्हणूनच असेल कदाचित, मी माझं सगळं ‘फ्रस्ट्रेशन’ मगरीवर काढतो. येता का मगर खायला, सांगा’’ सोनी बोलला.
‘‘कशी लागते?’’ मी केवळ ऍकेडेमिक इंटरेस्टनं’ विचारलं.
‘काही खास नाही.’

अरे, काही खास नाही तर आग्रह का करतोस? मी खास म्हटल्या जाणाऱया विदेशी पदार्थांना (‘डिशेस’हो!) हात लावत नाही. मला अजिबात आवडत नाहीत. पोटाची खळगी भरण्यासाठी तरी दोन घास खाऊन वेळ मारून न्यावी असं मला वाटत नाही. मी सरळ टाकून देतो (माझं उष्ट आनंदानं व भक्तिभावानं खाणारी कुठं भेटेल? की तीच ती मगर?) देशाबाहेर गेलं की, माझ्या ताटात काय पडेल या विचारानं माझ्या पोटात गोळा येतो (यालाच पोटचा गोळा म्हणतात का?), माझा मित्र (कै.) रमेश भाटकर मात्र जाईल तिथं तिथलं अन्न हाणायचा आणि मनापासून एंजॉय करायचा. परत आल्यावर रंगवून रंगवून मिटक्या मारीत तो माझ्या जवळ त्याच्या उदरभरणाचं वर्णन करायचा. माझा चेहरा सुतकी का? असा त्याला प्रश्न पडायचा. सोन्यासारखं अन्न याला का आवडत नाही हे त्याला कळायचं नाही व असला कचरा तो चवीनं कसा खातो हे मला कळायचं नाही. ‘वन मॅन्स मीट इज अनदर मॅन्स पॉयझन’, पण इथं तर मला सगळंच ‘पॉयझन’समान होतं. खाण्याबाबत इतकं अति चोखंदळ कोणी असतं का? बाजारातल्या खिमा पॅटिसमध्ये खिम्याच्या गुठळय़ा असल्या तर तो मी खात नाही. बटाटेवडय़ाचं आवरण जाड असेल तर तो मला चालत नाही. हॉटेलातला उपमा तुपानं माखलेला असेल तर ‘‘तुम्हीच खा’’ असे मी इतरांना सांगतो. कोणाच्याही घरचे पोहे फडफडीत असतील तर भरलेली बशी मी तशीच टेबलावर ठेवतो. बेसनाचा लाडू तोंडात फुटला तर तोंडातला तुकडा तरी खायचा की तोही थुकून टाकायचा? असा मला प्रश्न पडतो. कोलंबीच्या खिचडीत तिला सुरमट करण्यासाठी नारळाचं दूध घातलेलं नसेल तर ती गुराढोरांना घालायची गोष्ट आहे. तेदेखील ‘नारळाचं दूध नाही?’ असं तोंडानं विचारू शकत नाहीत म्हणून. मुकी जनावरं बिचारी. अनेक बायकांना आपल्या पतिदेवांनी मुकं जनावर व्हावं असंच वाटत असतं. भात खिमटासारखा मऊ झाला तर माझे पणजोबा ताट भिरकावून द्यायचे अशी आख्यायिका आहे (त्या काळी बायका गरीब गाईसारख्या होत्या का हो? शिंगं रोखून त्या अंगावर कधीपासून यायला लागल्या? माझ्या पणजीचा फोटो आत स्वयंपाकघरात व पणजोबांचा बाहेर दिवाणखान्यात लावून ठेवावा म्हणतो).

 अमेरिकेतील (माझ्या दृष्टीनं) अत्यंत बेचव खाद्य पदार्थ तिथले लोक तर चवीनं खातातच, पण आपली मराठमोळी माणसंही त्यांचा आस्वाद घेताना दिसतात. अरे, चिंबोरीचं कालवण ओरपणारा पांचट, मिळमिळीत, सपक खाऊच कसं शकतो? माझा छोटा नातू ‘क्लॅम चाऊडर’ हे शिंपल्यापासून बनवलेलं सूप अमृत असल्यागत पितो (त्याचा आजोबा मान खाली घालून तुकडे तोडतो. माझे पणजोबा ताटाचा वापर सुदर्शन चक्रासारखा कसा करत असतील?). खरं सांगायचं तर अमेरिकेपाशी स्वतःची अशी खाद्य संस्कृती नाही. पिझ्झा, बर्गर, पास्ता… सगळी उधार उसनवारी. त्यांना जमणं शक्य नाही म्हणून, नाही तर पुरणपोळी, वडीचं सांबारं, शेवळाची कणी, निनावं, बोंबलाची भजी, थालीपीठ, वालाचं बिरडं हे जिन्नस आमचेच आहेत असे ट्रंपची माणसं दडपून सांगत फिरली असती. सोडे घातलेल्या वांग्याच्या भाजीची महती यांना काय कळणार? दस्तुरखुद्द पु.लं.नी लिहून ठेवलंय- ‘वांगी आणि सोडापुढे व्हिस्की आणि सोडा झक् मारतो.’

 माझा एक अमेरिकेतला जवळचा मित्र (मूळ गाव देवरुख, जिल्हा रत्नागिरी) मला जपानी ‘सुशी’ खाण्यासाठी प्रचंड आग्रह करीत होता. फक्त मला आडवं पाडून भरवायचं त्यानं बाकी ठेवलं होतं. मी एक घास खाल्ला व रिवाजाप्रमाणे लगेच थुंकला. त्यामुळे जपान्यांचा अपमान होऊन तिसऱया महायुद्धाला तर तोंड फुटणार नाही ना? की माझ्या एकटय़ाचंच तोंड फोडून जपान महायुद्ध टाळेल?…

नैरोबी (केनया) एअरपोर्टवर मला सोडायला आलेल्यात सोनी (‘मगर’फेम) होता. तो म्हणाला, ‘‘या वेळेला मगरीचं राहून गेलं. नेक्स्ट टाइम.’

मी पुन्हा केनयाला गेलो नाही ते बहुधा मगरीच्याच धाकानं. साबुदाण्याची खिचडी खावी तशी इथली माणसं मगर खात असतील का?

या सगळय़ांचा सूड म्हणून मी एखाद्या वेदशास्त्रसंपन्न, हरीभक्तपरायण, पुण्यश्लोक महामानवाला संकष्टीला विचारणार आहे, ‘‘साप, गरूड, गेंडा यातलं काही खाणार का?…’’

 [email protected]

आपली प्रतिक्रिया द्या