आभाळमाया : मंगळावर ‘द्राक्षायणी?’

>> वैश्विक, khagoldilip@gmail.com

आपल्या पृथ्वीचे दोन शेजारी ग्रह म्हणजे अंतर्ग्रह शुक्र आणि बहिर्ग्रह मंगळ. शुक्र सूर्यापासून सुमारे 10 कोटी, पृथ्वी 15 कोटी आणि मंगळ 22 कोटी किलोमीटर अंतरावर आहे. म्हणजे शुक्र-मंगळ पृथ्वीपासून साधारण सारख्याच अंतरावर आहेत. मग यापैकी मंगळाकडेच आपण संभाव्य वसतिस्थान म्हणून का बघतो? दोन शेजाऱ्यांमध्ये असा पक्षपात का? त्याची कारणं स्पष्ट आहेत.

विसाव्या शतकाच्या सातव्या दशकात या दोन्ही ग्रहांकडे अंतराळयान पाठवण्याइतकी अंतराळ-संशोधन क्षमता आपल्याकडे आली. शुक्रावर प्रचंड तापमान असून तो सल्फ्युरिक ऑसिडच्या ढगांनी वेढलेला आहे. या ढगांमधून जो ऑसिडरेन होतो त्याची तो शुक्राच्या पृष्ठभागावर पोहोचण्यापूर्वीच वाफ होते आणि शुक्राच्या आकाशात कोंडून राहते. त्यामुळे शुक्रपृष्ठावर उभं राहिलं तरी आपल्याला रात्री दिसतं तसं ताऱ्यांनी खच्चून भरलेलं मोहक आकाश दिसणार नाही. शुक्रावरही पृथ्वीप्रमाणेच प्लेट-टॅक्नॉनिक आहेत का? पृथ्वीच्या गाभ्यातील लोहरसावर भक्कम असं सुमारे बारा ‘प्लेट्स’चं जे दगडी कवच आहे ते इतकं जाड आहे की, आतील उष्णतेचा परिणाम न होता आपण सुखाने भूपृष्ठावर जगू शकतो. शुक्रावर अशा जाड प्लेट नाहीत. शुक्र हा एकूण गोलाकार (फुटबॉलसारख्या) अखंड ‘प्लेट’ किंवा पृष्ठभाग असलेला ग्रह आहे. आपला चंद्र आणि बुध ग्रहसुद्धा असे एकसंध पृष्ठभागाचे गोलक आहेत. ‘मॅजेलेंन’ने घेतलेला चित्रांनुसार शुक्रावर काही किलोमीटर परिघाची प्रचंड विवरं मात्र आढळतात. शुक्राचा आताचा पृष्ठभाग सुमारे 50 कोटी वर्षांपूर्वी आकाराला आला. चंद्र-बुधाचा त्यापूर्वीच तयार झाला. त्या तुलनेत आपल्या पृथ्वीचाच पृष्ठभाग तरुण आहे. शुक्राच्या गाभ्यातही तप्त लोहरस असला तरी त्यालामॅग्नेटिक फिल्ड जवळजवळ नाहीच. याचं कारण त्याची स्वतःभोवती फिरण्याची मंदगती. गंमत म्हणजे शुक्राचा दिवस (स्वतःभोवती फिरणे) हा त्याच्या एका वर्षांपेक्षा (सूर्याभोवतीची फेरी) मोठा आहे! दुसरी गोष्ट अशी की, शुक्राचा अक्ष 178 अंशात कललेला असल्याने तिथे सूर्य आपल्या तुलनेत पश्चिमेला उगवतो! शुक्र जवळपास पृथ्वीएवढाच तर मंगळ थोडा लहान, परंतु त्याचा पृष्ठभाग टणक आहे. तोसुद्धा एकसंध दगडी कवचाचा बनलाय. शुक्रावर सल्फ्युरिक ऑसिडचा (अतिउष्णतेमुळे) पाऊस पडतो. त्याची लगेच वाफ होते व मंगळावर कार्बनडायऑक्साईड गोठलेल्या अवस्थेत दिसतो. मंगळाच्या ध्रुवीय कॅप याच गोठलेल्या बर्फाच्या आहेत. शुक्राच्या वातावरणाचा दाब पृथ्वीच्या वातावरणीय दाबापेक्षा 90 पट आहे. या ग्रहावर 96 टक्के कार्बनडायऑक्साईड आणि नायट्रोजन आहे. त्यामुळे शुक्रावरचा ‘ग्रीनहाऊस’ परिणाम निसर्गातच प्रचंड असतो.

मंगळ ग्रह मात्र अत्यंत थंड आहे. वातावरण अत्यंत विरळ असून माणसाला तिथे जाऊन राहायचं असेल तर पृथ्वीसदृश कृत्रिम वातावरण निर्माण करावं लागेल. मंगळपृष्ठावरची धूळ मात्र अत्यंत सूक्ष्म कणांची, पावडरसारखी आहे. विरळ वातावरणामुळे ताशी 6 ते 10 किलोमीटर वेगाने वारे वाहत असले तरी पृथ्वीवर ताशी 100 किलोमीटर वेगाने वाऱ्यांचा जसा परिणाम होतो तसा वादळी परिणाम मंगळावर होतो. त्यावरची ‘फाइन-डस्ट’ आसमंतात विखुरते. अशा वेळी पृथ्वीवरूनही मंगळाची छटा पिवळसर-लाल दिसते. पृथ्वीवर उन्हाळय़ात, वाळवंटात जशी वाळूची वादळं उठतात तशी मंगळ पृष्ठावर कायम होत असतात. त्याना ‘डस्टडेव्हिल’ असंच नाव पडलंय. एवम् गुणविशिष्ट मंगळावर 2006 पासून उतरलेल्या व्हायकिंग मोहिमांनी मोठीच संशोधन मालिका सुरू केली. त्यानंतर आतापर्यंत पाथफाइन्डर आणि इतर शोधक रोव्हरनी मंगळाचा पृष्ठभाग खणून तेथील दगड-मातीची परीक्षणं केली. मंगळावर कधीकाळी भरपूर पाणी होतं. आताही मंगळ पृष्ठाखाली ते आहे अशा बातम्या अधूनमधून येतच असतात.

हा सर्व आटापिटा मंगळ हे पुढचं वसतिस्थान करण्याचा माणसाचा इरादा स्पष्ट करतो. अतितप्त बुध-शुक्रावर किंवा वायुरूप गुरू-शनीवर वस्ती शक्यच नाही. तेव्हा दोन शेजाऱ्यांपैकी बाह्य कक्षेतला मंगळ आपल्या वैज्ञानिकांना सतत खुणावतोय. तिथे जायची तयारी इलॉन मस्कसारख्या महत्त्वाकांक्षी उद्योजकाच्या खासगी कंपनीलाही करावीशी वाटतेय. त्यासाठी ट्रेनिंग-बुकिंग सुरू झाल्याचंही कानावर येतं. अंतराळ प्रवास थरारक, विलक्षण वगैरे असला तरी स्पेसक्राफ्टही पूर्ण निर्जंतुक नसतील तर पंचाईत व्हायची. मध्यंतरी ‘नासा’नेच स्पेसस्टेशनमधील सूक्ष्म जीव आणि बुरशी वगैरेंबाबत चिंता व्यक्त केलीय. पृथ्वीवरचे रोग आणि जंतू तिकडे नेऊन चालणार नाही. शिवाय कोटय़वधी किलोमीटरच्या अंतराळ प्रवासाने माणसाच्या मनापासून ते हाडांपर्यंत कोणते विपरीत परिणाम संभवतात त्याचीही पडताळणी करावी लागेल. अशा सावधगिरीच्या सूचना मिळत असल्या तरी मंगळपृष्ठावर कोबीपासून द्राक्षापर्यंत विविध पिके घेण्याचे प्रयोग (इथे पृथ्वीवर) सुरू आहेत. हे द्राक्षोत्पादन कशासाठी तर उद्या मंगळावर ‘रेड वाईन’ बनवण्यासाठी! अमेरिकेतील जॉर्जिया राज्याला द्राक्षाची वाईन (द्राक्षायणी) बनवण्याचा प्राचीन वारसा आहे. द्राक्षांची ‘वाईन’ तिथे पहिल्यांदा तयार झाली असं म्हणतात. आता हे जॉर्जियन मळेवाले मंगळावर बहरतील अशा द्राक्षवेली वाढवण्याच्या तयारीत असून या प्रकल्पाला ‘नासा’चा पाठिंबा आहे!

मंगळासारख्या थंड, पण लाल ग्रहावर बऱ्याच काळासाठी राहायचं असेल तर तिथेच कोणती पिके घेता येतील याविषयीची लोकांना आवाहन केल्यावर, गेली 8000 वर्षे द्राक्षांची वाईन तयार करणाऱ्या जॉर्जियाकरांनी ते मनावर घेतलं आणि आंतरग्रहीय (इन्टरप्लॅनेटरी) द्राक्षोत्पादन कसं शक्य होईल यावर विचार सुरू केला. इथेच आपल्या दोन शेजाऱ्यांपैकी मंगळ शुक्राच्या पुढे गेला. पृथ्वीवरच्या माणसाला जगायला विश्वासार्ह वाटेल आणि आनंददायी वसतिस्थान होईल असा मंगळच आहे. शुक्राची तेजस्वीता पृथ्वीवरून पाहण्यातच मजा!