मुद्दा – पावसाळी पर्यटनः आनंद आणि खबरदारी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> टिळक उमाजी खाडे

मोसमी  पाऊस  आता सर्वदूर पसरला आहे. आता सर्वांनाच वेध लागतील ते पावसाळी पर्यटनाचे, तनामनाला चिंब भिजवणाऱ्या वर्षा विहाराचे ! कोकणातील व पश्चिम महाराष्ट्रातील उंचच उंच गिरीशिखरे, हिरव्यागार पर्वतरांगा, फेसाळणारे धबधबे, ओसंडून वाहणारे नदी – नाले, तलाव, धरणे पर्यटकांना साद घालतात. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने पावसाळी पर्यटनाकडे अजूनपर्यंत पुरेशा गांभीर्याने हवे तसे लक्ष दिलेले नाही आणि म्हणूनच पावसाळी पर्यटकांना अनेक असुविधांना व अपघातांना सामोरे जावे लागते. दरवर्षी पावसाळी पर्यटनातील अपघाती मृत्यूच्या बातम्या ऐकून अंगावर शहारे येतात. योग्य नियोजन व योग्य कार्यवाही केल्यास हे टाळता येऊ शकते. केवळ कलम 144 चा मनाई आदेश लागू करून पर्यटनावर बंदी घालणे हा अगदी टोकाचा उपाय झाला .यातून सुवर्णमध्य काढल्यास पर्यटनाला चालना मिळेल, महसूलात वाढ होईल, स्थानिकांना रोजगार मिळेल आणि त्याबरोबरच पर्यटकांचा आनंदही द्विगुणित होईल. पर्यटकांनीही पावसाळी पर्यटनाचा आनंद घेताना अधिक जबाबदारीने वागले पाहिजे.

हल्ली बऱ्याचशा सरकारी व खासगी आस्थापनांमध्ये पाच दिवसांचा आठवडा झाल्यामुळे ‘वीकेंड’ ही संकल्पना उदयास आली आहे. त्यात शनिवार आणि रविवारला जोडून एखादी सुट्टी आली तर मग पाहायलाच नको. पावसाळी पर्यटनस्थळे गर्दीने फुलून जातात. विशेषतः शहरातील पर्यटकांची पावले या पर्यटनस्थळांकडे वळतात. मुंबई – गोवा महामार्ग तसेच मुंबई – पुणे द्रुतगती मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या दिसतात. तसेच काही पर्यटनस्थळांच्या ठिकाणी रस्त्याच्या दुतर्फा वाहने कशीही पार्क केली जातात. यातून वाहतुकीची कोंडी होते. काही दंगेखोर पर्यटक पर्यटनस्थळांवर मद्यपान करून विनाकारण वाद निर्माण करतात, तर काही पर्यटक टिंगलटवाळी करून महिलांशी असभ्य वर्तन करतात .याचे पर्यवसान मारामारीमध्ये होते. अतिउत्साही पर्यटक धोकादायक डोंगरमाथे, दऱ्या, समुद्राच्या लाटा यांमध्ये सेल्फी काढण्याच्या नादात जीव गमावून बसतात. काही बेफिकीर पर्यटक स्थानिकांशी वा पोलिसांशी हुज्जत घालून वाद ओढवून घेतात. या सर्व गोष्टींमुळे पर्यटनाच्या निखळ आनंदावर  विरजण पडते  व हिरमोड होऊन सर्वांनाच मनस्ताप होतो. त्या पर्यटनस्थळाच्या लौकिकालाच गालबोट लागते. काही ठीकाणी स्वच्छतागृहांचा अभाव असल्याने घाणीचे साम्राज्य असते. काही बेजबाबदार पर्यटक प्लॅस्टिकच्या बाटल्या, दारूच्या बाटल्या व इतर कचरा पर्यटनस्थळांवर टाकून पर्यटनस्थळांचे सौंदर्य बिघडवतात.

पर्यटनस्थळांची ही दुर्दशा व पर्यटकांची ही गैरसोय टाळून त्यांना पर्यटनाचा निखळ आनंद देण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ व स्थानिक प्रशासन यांनी पुढाकार घ्यायला हवा. पर्यटनातील विघ्ने दूर करण्यासाठी वाहतुकीचे नियमन, पार्किंग, स्वच्छतागृहे , दिशादर्शक फलक , माहिती व सूचना फलक, योग्य तेथे संरक्षक कठडे, सुरक्षित सेल्फी पॉइंट्स, प्रथमोपचार व वैद्यकीय मदत केंद्रे, कचरा कुंडय़ा, स्थानिक व व्यावसायिक वाटाडे (गाईड), स्थानिक खाद्य संस्कृती जपणारी हॉटेल्स यांसारख्या गोष्टींची पूर्तता पावसाळी पर्यटनस्थळांवर केल्यास पर्यटकांचा आनंद द्विगुणित होऊन पर्यटनाला चालना मिळून स्थानिक अर्थकारण अधिक गतीमान होईल.